विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : निवडणुकीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम ( Dharmraobaba Aatram ) यांचे घर फोडण्याचा डाव आखला आहे. यावरून आत्राम यांनी लेकीलाच जाब विचारला आहे. जी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार असा सवाल त्यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री अत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीच्या या निर्णयावर धर्मरावबाबा अत्राम यांनी गडचिरोलीत झालेल्या जनसन्मान यात्रेतील सभेमध्ये कठोर शब्दांत टीका केली. मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांच्याशी संबंध संपल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले, वारे येत-जात राहतात. लोक पक्ष सोडून जात असतात. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमच्या घरचे काही लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. ४० वर्षं लोकांनी पक्षफोडीचे कार्यक्रम केले. आता घरफोडी करून माझ्या मुलीला माझ्याविरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाचे लोक करत आहेत. त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका. जी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार? या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे. त्यांना बाजूच्या प्राणहिता नदीत सगळ्यांनी फेकून दिलं पाहिजे. हे काय चाललंय? सख्ख्या मुलीला बाजूला घेऊन तिच्या बापाच्या विरोधात उभं करत आहात. जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची कशी होऊ शकेल? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. ती काय लोकांना न्याय देणार आहे? राजकारणात ही माझी मुलगी आहे, भाऊ आहे, बहीण आहे हे मी काही बघणार नाही.
एक मुलगी गेली तरी चालेल, पण दुसर मुलगी माझ्याबरोबर आहे. माझा मुलगाही माझ्या मागे आहे. माझा एक सख्खा भाऊही माझ्यामागे आहे. माझ्या चुलत भावाचा मुलगाही माझ्या पाठीशी आहे. पूर्ण घर माझ्यामागे एकत्र झालं आहे”, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी भाग्यश्री अत्राम यांना वेगळा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं. “आख्खं कुटुंब धर्मरावबाबांच्या बरोबर आहे. एकाला त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण त्या आता धर्मरावबाबांच्याच विरोधात उभ्या राहायला निघाल्या. आता काय म्हणायचं याला. कुस्त्या खूप चालतात आपल्याकडे. नेहमी वस्ताद त्याच्या हाताखाली जो शिकतो, त्याला सगळे डाव शिकवत नाही. एक डाव राखून ठेवतो. बाकीचे सगळे शिकवतो. मला त्यांना सांगायचंय की अजूनही चूक करू नका. तुमच्या वडिलांबरोबर राहा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more