महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकापाठोपाठ एक अशा दोन आलेल्या सर्वेक्षणांमधून एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते आहे, ती म्हणजे भाजप सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेत 100 पेक्षा जास्त जागा मिळवून स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. Devendra fadnavis popularity is shortcomings of NCP leadership
1980 च्या दशकात काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणात जे बळकट स्थान होते, ते स्थान भाजपकडे येऊन ते दृढमूल होण्याच्या बेतात आहे आणि हीच नेमकी शरद पवार यांच्यासारख्या प्रादेशिक कर्तृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्व अशा नेत्यासाठी राजकीय कंबख्ती आहे!!
भाजपची महाराष्ट्रातील सुरुवात चौथ्या – पाचव्या क्रमांकाचा पक्ष म्हणून झाली होती. 1980 च्या दशकात भाजपला 15 – 16 आमदारच निवडून आणता यायचे. 1990 च्या दशकात प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने भाजप – शिवसेना युती झाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमुळे हिंदुत्वाला बरे दिवस आले. त्यामुळे भाजपची टॅली 40 – 45 च्या वर दिसायला लागली. त्यानंतर मात्र 2014 पर्यंत भाजप टप्प्याटप्प्याने 55 – 60 – 65 इथपर्यंत पोहोचला.
2014 च्या निवडणुकीत भाजपला खऱ्या अर्थाने स्वतंत्र ब्रेक मिळाला आणि भाजपने स्वबळावर 124 आमदार निवडून आणले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा होता. त्या काळात भाजपकडे महाराष्ट्रातले गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व असले तरी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचे निधन झाल्याने महाराष्ट्र भाजपची संपूर्ण धुरा मोदी – शाह यांनी निवडलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली. त्यांनी 5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली आणि त्याचा परिणाम 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसला. विधानसभा निवडणुकीत भाजपने अखंड शिवसेनेशी युती करून पूर्ण बहुमत तर मिळवलेच पण स्वतःची टॅली देखील पुन्हा एकदा शंभरी पार म्हणजे 105 आमदारांची करून दाखवली.
मात्र उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वकांक्षेने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस अमित शाह यांनी डाव उलटवला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपचे सरकार पुन्हा स्थापन केले. याला 11 महिने उलटले आहेत.
आता जेव्हा झी न्यूज आणि न्यूज एरिना इंडिया या दोन वृत्तसंस्थांचे सर्वेक्षण लागोपाठ आले आहे, त्या सर्वेक्षणात शिवसेना – भाजप युतीला बहुमत मिळेल असे स्पष्ट निरीक्षण तर नोंदवले आहेच, पण भाजपला 125 पेक्षा अधिक जागा मिळून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता इतर सर्व नेत्यांना मागे टाकणारी 35 % एवढी दाखविली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत आणि हीच नेमकी शरद पवार यांच्या नेतृत्वासाठी राजकीय कंबख्ती आहे!!
प्रादेशिक कर्तृत्व – राष्ट्रीय नेतृत्व
शरद पवारांना त्यांच्या राजकीय आयुष्यात समाजवादी काँग्रेस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस असो महाराष्ट्र विधानसभेत कधीही शंभरी गाठता आलेली नाही. पवारांची राजकीय ताकद 50 ते 60 आमदार निवडून आणण्या एवढीच राहिली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वोत्तम आकडा 2004 मध्ये 72 एवढाच राहिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण पवार आजपर्यंत थांबवू शकलेले नाहीत. मध्यंतरी पवारांनी भरपूर भाकऱ्या फिरवून पाहिल्या. उलटून – पालटून त्याच तव्यावर टाकल्या. पण राष्ट्रवादीचा निवडणूक परफॉर्मन्स ते कधीही सुधारू शकले नाहीत. पवारांचे राजकीय कर्तृत्व प्रादेशिक किंबहुना पश्चिम महाराष्ट्र पुरते उपप्रादेशिक पण प्रतिमा मात्र मराठी माध्यमांमुळे राष्ट्रीय नेतृत्वाची, असेच राहिले आहे.
फडणवीसांची नेतृत्व गती
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व विशिष्ट गतीने महाराष्ट्रात उदयाला आले आहे. ते पवार विरोधी नेतृत्व आहे. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण कधी पवारांना आवडले नाहीत, तसेच भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील पवारांचे नावडते आहेत.
… आणि आता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता बाकी सर्व समकालीन नेत्यांना मागे सारून प्रथम क्रमांकाची होत आहे, त्यावेळी “पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्री” साध्या रेसमध्ये पण नाहीत!!
न्यूज एरिना इंडियाच्या सर्वेक्षणात देवेंद्र फडणवीस 35 %, अशोक चव्हाण 24 %, अजित पवार 14 %, एकनाथ शिंदे 12 % आणि उद्धव ठाकरे 9 % अशी क्रमवारी आहे. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत पवारांच्या मनातले सुप्रिया सुळे हे नावही नाही.
पवारांचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी अजितदादांवर मात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता चौपट मोठी आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीत पोस्टर्सवर तर बरेच मुख्यमंत्री चढले. पण पवारांना प्रत्यक्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही करता आलेला नाही. झी न्यूज आणि न्यूज एरिना इंडियाचे सर्वेक्षणे बघितली, तर पवारांना आपल्या विरोधातलाच मुख्यमंत्री सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. ही खऱ्या अर्थाने पवारांची कारकीर्दीच्या अखेरीस आलेली राजकीय कंबख्तीच आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more