प्रतिनिधी
मुंबई : दसरा मेळावे संपले… पण माध्यमांचे ललित शेपटासारखे लांबले असे म्हणायची खरंच वेळ आली आहे…!! कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे संपून 24 तास उलटले तरी, गर्दी कोणी, कशी, किती जमवली!!, कोणी, कसे, कुणाला, टोले लगावले!!… कुणाच्या भाषणामुळे कमी प्रदूषण झाले, कुणाच्या भाषणामुळे जास्त प्रदूषण झाले!! मेळाव्याला जमलेल्यांना कोणी काय खायला दिले!! कोणी कसे बाळावरून राजकारण केले वगैरे बातम्यांचा रतीब मराठी माध्यमांनी 24 तास घातलाच आहे आणि अजूनही हा बातम्यांचा रतीब आटायला तयार नाही. Dasara Rallies : marathi media gave extra large coverage to Shivsena factions
कालपासून जगात शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांखेरीज दुसरे काही नव्हतेच आणि दुसरे काही घडलेच नाही, अशा थाटात मराठी माध्यमांनी शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या बातम्यांचा रतीब घातला आहे. वास्तविक दसऱ्यानिमित्ताने काल राजकीय कार्यक्रम झाले पाच. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नियमित दसरा मेळावा, स्वयंसेवकांचे संचलन, पंकजा मुंडेंचा भगवान भक्तिगडावरील मेळावा नागपूरमधील धम्मचक्र प्रवर्तन दिन असे कार्यक्रम झाले. पण त्यांच्या बातम्या माध्यमांनी दोन-चार वेळा चालवल्या. पण शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या बातम्या मात्र हे मेळावे संपून 24 तास उलटून गेले तरी अजून थांबलेल्या नाहीत. कोणी काही किरकोळ ट्विट केले कुणी काही कोणाविषयी बोलले तर त्याच्या लांब लांब बातम्या वेगवेगळी वेब पोर्टल वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या अजूनही देत आहेत.
याबाबत चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनी छोटीशीच पण मार्मिक पोस्ट लिहिली आहे. कोणाची भाषणे रंगली आपल्याला काही कळले नाही. आपल्याला आपली झोप महत्त्वाची, असे मार्मिक भाष्य त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केले आहे.
दोन्ही दसरा मेळाव्यांवरून सोशल मीडियात देखील मिम्सचा पाऊस पडला आहे. यात दोन्ही शिवसेनेच्या समर्थकांनी एकमेकांचे पुरते वाभाडे काढले आहेत.ङ पण या सगळ्यात सर्वसामान्यांचा दसरा कसा साजरा झाला याच्या बातम्या मात्र झाकोळल्या गेल्या आहेत दसरा म्हणजे सोने खरेदी. सराफा बाजारातली रेलचेल, फुल बाजारातली उलाढाल वगैरे सर्वसामान्यांना माहितीपूर्ण ठरतील अशा बातम्या पूर्वी असायच्या. या बातम्या माध्यमांनी दिल्या पण दसरा मेळाव्याच्या राजकीय बातम्यांमध्ये मात्र त्या पूर्ण झाकल्या गेल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App