विशेष प्रतिनिधी
पुणे : महाविकास आघाडीत निर्णायक ठरणार “संख्याबळ”, असे सांगून शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या मनातले मुख्यमंत्री पद एकदाचे काँग्रेसला “सरेंडर” करून टाकल्यावर प्रचंड उत्साह संचारलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole ) यांना पुण्यात खांद्यावर घेऊन भावी मुख्यमंत्री नाना पटोलेंचा जयजयकार केला.
कोल्हापूरातल्या पत्रकार परिषदेत पवारांनी अखेर संख्याबळाचा निकषच निर्णायक असल्याचे सत्य मान्य केले. यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचे पंख कापलेच, पण त्याचवेळी खुद्द पवारांच्या पक्षाचेही संख्याबळ तेवढे कधी भरलेच नसल्याने आपल्या पक्षातल्या पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यांचेही पंख आपोआप छाटले गेले आणि काँग्रेसला मुख्यमंत्री पद सरेंडर करून टाकावे लागले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातून पवारांच्या संख्याबळाच्या वक्तव्याला दुजोरा दिला. महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्याच्या संख्याबळाच्या विचार मुख्यमंत्री निवडताना केला जाईल, हे शरद पवारांचे वक्तव्य योग्य असल्याचे नानांनी पुण्यात सांगितले.
पुण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या समर्थकांनी नानांना खांद्यावर उचलले आणि भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा जयजयकार केला. नानांनी आबा बागूल यांना भावी आमदार जाहीर करून टाकले. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या समोर नाना आणि आबांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
– काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे परफॉर्मन्स अव्वल आहे. त्यांचे 14 खासदार निवडून आले. त्यामुळे काँग्रेसचे नेते अपबीट मूडमध्ये आले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा निकष संख्याबळ असला पाहिजे, याची व्यूहरचना केंद्रीय स्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत लावली. उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून आले तरी फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही.
खुद्द पवारांच्या मनात जरी आपली मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांपुढे उघडपणे बोलून दाखवण्याची त्यांनी अजून शामत दाखवली नाही. संख्याबळाच्या निकषावर तर पवार तिसऱ्या नंबर वर आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. विशेषतः काँग्रेस पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याची सुताराम शक्यता नाही. अशा स्थितीत संख्याबळ हा निकष अन्य करण्याशिवाय पवारांना पर्यायच नव्हता. त्यामुळे त्यांनी तो मान्य करून टाकला.
संख्याबळ निकष मान्य करून पवारांनी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाचे पंख छाटलेच पण अप्रत्यक्षपणे काँग्रेसला ते मुख्यमंत्रीपद स्वतःहून “सरेंडर” करून टाकले. आज तरी पवारांच्या मनातले मुख्यमंत्री पवारांच्या मनातच राहिल्याचे त्यामुळे चित्र दिसले. पण त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहात आले आणि नाना भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चढले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more