प्रतिनिधी
मुंबई : काही लोक इतिहास घडवतात, काही लोक पळवतात. कॉंग्रेसने या देशाचा इतिहास पळवला आणि आपल्याला हवा तसा लिहून घेतला. त्यांनी भारतीयांना इतिहासाची एकच बाजू दाखवली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. Congress ran history, wrote itself as it wanted; Chief Minister’s attack from Savarkar Memorial
गुरुवार, २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ज्येष्ठ उदय माहूरकर लिखित आणि पत्रकार उदय निरगुडकर अनुवादित “वीर सावरकर फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, सावरकरांमुळे देशाची फाळणी झाली, असा अपप्रचार कॉंग्रेस वारंवार करते. पण हे पुस्तक म्हणजे त्याला पुराव्यानिशी दिलेले चोख प्रत्युत्तर आहे. सावरकरांची देशभक्ती, त्याग, त्यांचे कार्य शब्दांत मांडणे कठीण आहे. त्यांचे वर्णन शब्दांच्या पलिकडचे आहे. त्यामुळे नव्या पिढीला सावरकर समजून घ्यायचे असतील, तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
काही लोक वीर सावरकरांची जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. संधी मिळेल तिथे या देशभक्ताचा अपमान करण्याचे काम ते करीत आहे. अशा काळात या महापुरुषाच्या कार्यासंबंधी पुस्तक आणणे ही कौतुकाची बाब आहे. त्याबद्दल उदय माहुरकर आणि उदय निरगुडकर यांचे मी अभिनंदन करतो. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही, संपूर्ण देशाचे दैवत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्त्व प्राणाहून प्रिय होते. पण त्यांचा वारसा सांगणारे आज राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालत आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.
काही लोक इतिहास घडवतात, काही लोक पळवतात. कॉंग्रेसने या देशाचा इतिहास पळवला आणि आपल्याला हवा तसा लिहून घेतला. कॉंग्रेसने भारतीय नागरिकांना इतिहासाची एकच बाजू दाखवली. परंतु, २०१४ साली या देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे जागरण सुरू झाले. राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात भारतात लोकशाही धोक्यात आहे. परंतु, या देशात जर लोकशाही नसती, तर तुम्ही भारत जोडो यात्रा काढू शकला असता का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
सावरकर राष्ट्रीय सुरक्षेचे नास्त्रेदमस
आज भारतात सावरकर युगाची सुरुवात झाली आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे ३७० कलम हटवले जाणे, राम मंदिराची उभारणी आणि भारत सर्व क्षेत्रात प्रगती करत असणे हे याचे द्योतक आहे. या पुस्तकातून आम्ही वीर सावरकर यांचे नवीन पैलू समोर आणले आहेत. वीर सावरकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे विचार स्वातंत्र्य काळात अमलात आणले असते, तर भारत आर्थिक महासत्ता बनला असता. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वीर सावरकर यांनी जे विचार मांडले होते त्यावरून ते राष्ट्रीय सुरक्षेतील नास्त्रेदमस होते, असे केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर म्हणाले.
चीनने भारतावर आक्रमण करण्याआधी वीर सावरकर यांनी भारताने अण्वस्त्रधारी बनले पाहिजे असे म्हटले होते. चीनसोबतच्या युद्धानंतरही नेहरूंनी चीनशी सलगी करण्याचे विचार मांडले, त्यावेळी वीर सावरकर यांनी चीनशी सलगी करू नका, तो तिबेटवर कब्जा करेल, भारताची भूमी हडप करेल, असे सांगितले आणि तसेच झाले. वीर सावरकर यांनी सैनिकी शक्ती वाढवावी, असे सांगितले होते. त्याचे महत्व आज लक्षात येते. आज तालिबानसारखा देश भारताला आव्हान देतो, पण चीन तिथे मुसलमानांवर अत्याचार करत असूनही त्याला तालिबान धमकावत नाही, असे उदय माहुरकर म्हणाले.
आसामबाबतही वीर सावरकर यांनी तेव्हा तेथील सीमा बंद करा असे म्हटले होते. त्यावेळीही नेहरूंनी दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्यावेळी आसाममध्ये १० टक्के असलेले मुसलमान आज ३५-४० टक्के झाले आहेत. वीर सावरकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे जे विचार मांडले त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले त्याचे परिणाम भारताला भोगावे लागले, असे उदय माहुरकर यांनी सांगितले.
आजही सावरकर जिवंत : निरगुडकर
माणूस किती जगला, हे त्याच्या मृत्यूची तारीख ठरवत नाही. तर, त्याचा विचार त्याच्या मृत्यूनंतर अनुयायांनी किती काळ जागवत ठेवला, यावर ठरत असते. त्या अर्थाने आजही सावरकर जिवंत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.
निरगुडकर म्हणाले, याच मंचावर या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करताना मी सांगितले होते, हे पुस्तक मी मराठीत आणीन. आज तुमच्या साक्षीने हे वचन मी पूर्ण केल्याचा आनंद आहे. हे पुस्तक माझ्यासाठी एक भाषांतराची असाइन्मेंट नव्हती, तर वैचारिक जबाबदारी होती. सावरकर नावाची लस माझ्यासारख्या अनेकांना लहानपणीच टोचली गेली होती. त्यामुळेच आम्ही वैचारिक दृष्ट्या जिवंत आहोत.
राष्ट्रपित्याचे दिवस अनुभवायला मिळालेल्या या देशाला आता राष्ट्र नायकाचे दिवस अनुभवायचे भाग्य मिळते आहे, याला फार महत्त्व असेही निरगुडकर म्हणाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे सत्य आहेच, पण त्याच्या आदल्या दिवशी देशाची फाळणी झाली, हेही तेवढेच कटू सत्य आहे. त्याआधी १०० वर्षांपूर्वीही या देशाचे 7 वेळा तुकडे झाले. तो सर्व अखंड भारत पुन्हा एकत्र येईल, त्यावेळेलाच या पुस्तकात लिहिलेले सावरकर प्रत्यक्षात आले असे म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App