विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात देवेंद्र 3.0 पर्व सुरू झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तत्पूर्वी, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी विरोधकांना पुन्हा माफ केले, हाच माझा बदला. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्यापूर्वी केलेले हे विधान चर्चेत आले आहे. विरोधकांनी आपल्यावर पातळी सोडून टीका केली, पण आता ते सगळे विसरून काम करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
2022च्या सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली होती. त्यावर भर विधानसभेत बोलताना विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आताही एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांना आताही विरोधकांनी आपली भरपूर बदनामी केली. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले.
Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पार्थ चॅटर्जी भ्रष्ट व्यक्ती, स्वत:ला इतर आरोपींसारखे म्हणताना लाज वाटली पाहिजे
माझी प्रतिमा खलनायकासारखी तयार केली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी माझ्यावर बदनामीजनक टीका-टिप्पणी केली. मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार आहे. पण याहीवेळी त्यांना मी माफ केले असून त्यांना माफी हाच माझा बदला असल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली, पण आता ते सगळे विसरून काम करणार आहे. मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय कधीच कुणाचा द्वेषी नव्हतो. काहींनी आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी माझी खलनायकासारखी प्रतिमा तयार केली. पण जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या सगळ्यांना परस्पर सडेतोड उत्तर दिले, असेही फडणवीस म्हणाले.
विरोधकही लोकप्रतिनिधी, त्यांचा आवाज दाबणार नाही
आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी असली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तेदेखील लोकप्रतिनिधीच आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी दिली जाईल. त्यांच्या भूमिकांकडे दुर्लक्ष करणार नाही. महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला, आम्ही त्याविरोधात संघर्ष केला होता, आता आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांचा आवाज दाबायचा हे मला मान्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App