विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली. महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन नमूद होते. त्याविषयी मंत्रालय पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, निकषात बसणाऱ्यांनाच 2100 रुपये मिळतील. ही वाढीव रक्कम नेमकी कधीपासून महिलांच्या खात्यात जमा होईल, या प्रश्नावर त्यांनी ‘आधी आर्थिक स्रोताची व्यवस्था करून रक्कम वाढवू’ असा दावा केला. CM Fadnavis
फडणवीसांनी सांगितले की, शेतकरी सन्मान योजना जेव्हा सुरू केली तेव्हा अनेक सधन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता. मात्र, सरकारच्या आवाहनानंतर सधन शेतकऱ्यांनी तो लाभ सोडला होता. मग ही योजना स्थिर झाली. त्याप्रमाणेच लाडकी बहीण योजनाही स्थिर होईल. मात्र, या योजनेत काही लाडक्या बहिणी निकषाच्या बाहेर असतील त्यावर विचार करू.
विरोधी पक्षनेता नसण्याचे संकेत
विरोधकांकडे नियमानुसार अपेक्षित संख्याबळ नसले तरी मविआतर्फे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे, असे निदर्शनास आणून दिले असता फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो. तो सरकारचा निर्णय नसतो. त्यामुळे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. लोकसभेतही 10 वर्षे विरोधी पक्षनेतेपद नव्हते तरीदेखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला लोकसभेने विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार दिले होते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला, तर तोही मान्य असेल.
Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पार्थ चॅटर्जी भ्रष्ट व्यक्ती, स्वत:ला इतर आरोपींसारखे म्हणताना लाज वाटली पाहिजे
या योजनांवर भर देणार
१. पायाभूत सुविधा, २. १६ हजार मेगावॅटची सौरऊर्जा निर्मिती, ३. नदीजोड प्रकल्प, ४. जलयुक्त शिवार या योजनांवर भर 5. मुलींना १०० टक्के शैक्षणिक शुल्क देण्याचा प्रयत्न असेल. निवडणुकीच्या पूर्वी महायुतीने दिलेल्या वचननाम्यातील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही फडणवीस यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्येच विरोध, चर्चेतून मार्ग काढू
नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन, तर कोल्हापूर जिल्ह्यात विरोध आहे. शेतकऱ्यांचा विरोध पत्करून आणि त्यांच्या जमिनी घेऊन विकास करण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढू. समृद्धीमुळे जसे मराठवाड्यातील चित्र बदलले तसेच शक्तिपीठमुळे अनेक भागांचे चित्र बदलेल, असे सांगत फडणवीस म्हणाले की, शक्ती कायद्यातील काही तरतुदींसंदर्भात सुप्रीम कोर्टाने काही विसंगत निर्णय दिले. यानंतर केंद्र सरकारने तीन कायदे आणले. त्यात आपले कायदे विसंगत होताहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी बोलणी करू.
मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन मोदी, शाहांचे आभार मानले. ते म्हणाले की, मी सीएम असताना स्वत:ला कॉमन मॅन समजत होतो. आता मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे. सामान्य माणसाच्या सेवेसाठी समर्पित झालो आहे. मला सीएम असताना फडणवीसांनी जसे सहकार्य केले तसेच मी त्यांना करणार करणार आहे, असा दावाही शिंदेंनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App