विशेष प्रतिनिधी
सातारा : केंद्र सरकारने लोकहिताच्या अनेक योजना आणल्या. त्याला राज्य सरकारनेही लाडकी बहीणसारख्या योजनांची जोड दिली. अशा समाजहिताच्या योजनांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा जनता मतपेटीतून एन्काउंटर करेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजना कोणीही माय का लाल बंद पाडू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.
पाटण विधानसभा मतदार संघातील विकासकामांच्या लोकार्पणानंतर आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने विकासाचं काम केलं, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, अशा जनताभिमुख योजना आणल्या. मात्र, विरोधक त्याच्या विरोधात बोलत आहेत. अशा दुष्ट आणि दुटप्पी लोकांपासून जनतेनं सावध राहावं.
विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडायचा प्रयत्न केला. आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद पाडू, असंही विरोधक म्हणाले. परंतु, हा तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी सुरू केलेली नाही. कोणीही आलं तरी ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा शब्द मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसंच ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नही सुनता’, असा डायलॉगही त्यांनी मारला.
सरकार सर्वसामान्यांसाठी असतं. हे सरकार देखील सर्वसामान्यांचं सरकार आहे. केंद्राच्या योजनांना राज्य सरकारने लोकाभिमुख योजनांची जोड दिली आहे. परंतु, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना पंधराशे रूपयांचं मोल काय कळणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App