नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकी संदर्भात परखड आत्मपरीक्षण केले. त्यांनी खोट्या नॅरेटिव्ह पासून ते भाजपचे नेमके काय चुकले?? याविषयी सविस्तर सांगितले. परंतु, त्या पलीकडे जाऊन ज्या लोकसभा निवडणुका होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर महायुतीतल्या घटक पक्षांकडून होणाऱ्या विविध नव्या चुकांचे काय करायचे??, हा खरा सवाल तयार झाला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला??, याविषयी पुन्हा एकदा परखड आत्मपरीक्षण केले. लोकसभेची निवडणूक हायपर लोकल झाली. देशाचे मुद्दे बाजूला पडले. नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिकांचे मुद्दे पुढे आले. स्थानिक पातळीवर निवडणूक लढली गेली. त्याचा अंदाज आम्हाला आला नाही. लोकसभेच्या 12 जागांवर भाजपचा 50000 मतांच्या आत मधल्या फरकाने पराभव झाला. या मतदारसंघांमध्ये प्रत्येक बूथ वर कमीत कमी 2 – 3 मते जास्तीत जास्त 20 मते मिळवली असती, तर भाजपचा 12 जागांवर विजय झाला असता आणि भाजपची टॅली 12 + 9 = 21 झाली असती, असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांच्या आत्मपरीक्षणात सत्य आणि तथ्य आहेच. कारण आकडेवारी देखील तसेच सांगते, पण मुद्दा त्या पलीकडचा आहे. लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. महाराष्ट्रातल्या नद्यांमधून बरेच राजकीय पाणीदेखील वाहून गेले आहे. अशा स्थितीत महायुतीतल्या नेत्यांच्या नव्या चुका होत आहेत. त्या कशा टाळायच्या??, त्यातून कसा मार्ग काढायचा??, हा खरा सवाल आहे.
अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर राजकीय अस्वस्थता वाढली. या वस्तुस्थितीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केले असले, तरी भाजपच्या मधल्या आणि खालच्या पळीतल्या कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष झालेले नाही. ती अस्वस्थता तळागाळापर्यंत पोहोचली आहे. त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी विरोधकांवर हल्लाबोल करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर हल्लाबोल करतात आणि भाजपचे नेते मात्र “डिफेन्सिव्ह मोड” मध्ये जातात, हे चित्र चांगले नाही. मालवण मधला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे असो, अथवा वेगवेगळे सामाजिक मुद्दे असोत, यामध्ये भाजपने आक्रमकपणे महाविकास आघाडीचा प्रतिवाद केलेला केल्याचे चित्र अद्याप दिसले नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप खोट्या नॅरेटिव्हला बळी पडला, असे आत्मपरीक्षण देवेंद्र फडणवीस यांनी केले, पण गेल्या तीन महिन्यांमध्ये मराठी माध्यमांचा खोटा मराठी बिनतोड युक्तिवादाने तोडून काढण्यात भाजपच्या नेत्यांना मर्यादित यश आले असे म्हणण्यासारखी स्थिती आहे.
लाडकी बहीण योजना, तिच्यातला श्रेयवाद या मुद्द्यावर भाजप + शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन खरं म्हणजे विरोधकांवर तुटून पडायला हवे होते. परंतु, मर्यादित अपवाद वगळता तसे फारसे घडले नाही. उलट अजितदादांचे गुलाबी जॅकेट आणि त्यांच्या पक्षाचे ब्रॅण्डिंग वाढत गेल्याचे दिसले. त्या तुलनेत भाजपचे नेते “डिफेन्सिव्ह मोड” मध्येच राहिले. भाजपच्या नेत्यांचे पराभवाचे निदान अचूक, पण रोगावर उपाययोजना मात्र जालीम नाही. ही स्थिती आता बदलायला हवी. देवेंद्र फडणवीसांच्या सूरात सूर मिसळून महायुतीच्या नेत्यांनी आता आक्रमक व्हायला हवे.
DCGI : चष्म्याशिवाय वाचण्यास मदत करणाऱ्या आयड्रॉपवर बंदी; प्रिस्क्रिप्शनसह विक्रीस होती परवानगी; कंपनीने चुकीचा प्रचार केला
हिंदुत्वाचे डायल्यूशन नको
महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते रोज काहीतरी चुका करतात आणि त्यावर पांघरून घालण्यात भाजपच्या नेत्यांचा वेळ जातो, हे महाराष्ट्रात निर्माण झालेले चित्र फारसे चांगले नाही. भाजपने हिजाब बंदी विषयी संपूर्ण देशभर वातावरण निर्मिती केली. भाजपशासित राज्यांमध्ये कायदे केले आणि इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांनी भायखळ्यात बुरखा वाटप केले. ही राजकीय विसंगती खरं म्हणजे टाळता आली असती, पण ती टळली नाही. याचा अर्थ भाजपच्या नेत्यांची महायुतीवर “पोलिटिकल ग्रीप” नाही, असा जर कोणी काढला तर तो गैर मानता येणार नाही. यामिनी जाधव यांनी केलेल्या बुरखा वाटपावर आमदार अशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली, तरी देखील यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपाचे समर्थन केले. हे चित्र महायुतीसाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी बिलकुल चांगले नाही. एकीकडे हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरेंना ठोकायचे आणि दुसरीकडे बुरखा वाटप करायचे ही राजकीय विसंगती शिंदे सेनेसाठी देखील चांगली नाही.
भाजपची पीछेहाट कशी टाळायची??
महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधली विसंगती टाळण्यासाठी तिन्ही घटक पक्ष प्रवक्ते नेमके त्यांचीच वक्तव्य अधिकृत मानली जाते, असे मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. परंतु, प्रत्यक्षात निर्णायक आणि आक्रमक राजकीय कृती आता केली पाहिजे. भाजपचे हिंदुत्व आणि विकासाचे सगळे मुद्दे जेन्युईन आहेत, पण ते आक्रमकपणे पुढे रेटण्यात भाजप आणि त्याचे मित्र पक्ष कमी पडतात हे चित्र बदलण्याची जबाबदारी महायुतीच्या सगळ्या नेत्यांवर आहे, ती त्यांनी चोख पार पाडावी, याची जाणीव भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी सर्वांना करून द्यायला हवी, तसे झाले तर विधानसभा निवडणूक महायुतीला “जड” जाणार नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App