शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी आपल्या शैलीत, “तुमचा दाऊद, तर आमचा गवळी”, असे आव्हान शरद पवारांना दिले होते. पण ते राजकीय आव्हान होते. या आव्हानाला बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांनी, “तुमचे भिडे, तर आमचे नेमाडे”, असे प्रतिआव्हान हिंदुत्ववाद्यांना दिले आहे. पण या आव्हानात ज्ञानवापीचे सत्य बाहेर येताना, त्याचा अपलाप आणि विपर्यास करणारी “पवार – नेमाडे बुद्धी” दडली आहे!! Bhalchandra nemade selectively praise aurangjeb, distorting Peshwa history
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सांगत संभाजी भिडे गुरुजी आपल्या गडकिल्ल्यांची मोहीम राबवून हिंदुत्वाचा वारसा पुढे नेतात. पण मध्येच त्या वारशात महात्मा गांधींच्या बदनामीची पूड मिसळून ते हिंदुत्व अनावश्यक कलुषित करतात. वास्तविक हिंदुत्व मांडणीत आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या इतिहास मांडणीत महात्मा गांधींच्या बदनामीची पूड मिसळायचे काहीच कारण नाही. पण भिडे गुरुजी ते करून हिंदुत्ववाद्यांना अनावश्यक आरोपांच्या पिंजऱ्यात ढकलतात. महाराष्ट्रातल्या पवार बुद्धीच्या पुरोगाम्यांना, “तुमचे भिडे, तर आमचे नेमाडे”, असा नॅरेटिव्ह चालविण्याची संधी देतात.
पण भिडे आणि नेमाडे यांच्यात नेमाडे जास्त चतुर आहेत. किंबहुना गेल्या 75 वर्षांच्या राज्यकर्त्यांच्या खलबुद्धीचा ते प्रलाप आहेत. नेमाडे कोणताही युक्तिवाद करताना त्यात त्याला विशिष्ट बौद्धिक डूब देतात. कोणतेही डावे विचारवंत नॅरेटिव्ह चालवताना उजव्या विचारवंतांपेक्षा अधिक हुशार भासतात. ते कोणतेही “सत्य” मांडताना इतरांना “कॅन्सल कल्चर”मध्ये गुंतवून टाकतात. आपली मांडणी सत्य भासवण्यासाठी त्याला जागतिक तर्क देतात. ते हिंदुत्ववाद्यांना जमत नाही.
आज जेव्हा ज्ञानवापीचे सत्य आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणातून बाहेर येत आहे, त्यावर कोणतीही थेट टीका टिप्पणी नेमाडे करीत नाहीत, तर ज्ञानवापीचे सत्य बाहेर येण्याचे टाइमिंग साधून औरंगजेबाचे महिमा मंडन करतात. त्यासाठी खोटा इतिहास बिंधास्त दडपून देतात. त्याचवेळी शरद पवार आणि भालचंद्र मुणगेकर हे आपल्या शेजारीच असतील याची पुरती दखल घेतात!! ही राजकीय चतुराई यायला 75 वर्षांच्या राज्यकर्त्यांची खलबुद्धीच लागते, इतरांचे ते काम नाही!!
– औरंगजेब म्हणे समाज सुधारक
नेमाडेंनी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई मराठी ग्रंथालयात औरंगजेबाचे महिमा मंडन केले. त्याला सती प्रथेचे उच्चाटन करणारा समाज सुधारक ठरविले. पण त्याचवेळी नानासाहेब पेशव्यांची बदनामी करण्याचे “पवार बुद्धीचे” मूळ कारस्थान ते विसरले नाहीत. वास्तविक मध्ययुगात भारतीयांचा दृष्टिकोन सरसकट प्रतिगामीच होता हे म्हणणे सत्याचा अपलाप आहे. त्याला आजच्या आधुनिक कसोट्या लावल्या, तर तो अधिक प्रतिगामी भासतो हे उघड आहे. पण नानासाहेब पेशव्यांनी कोवळ्या मुली मागवण्यासाठी गोविंदवंत बुंदेले यांना पत्र लिहिले असा “निवडक” इतिहास सांगणारे नेमाडे कुणबिणी खरेदीची प्रथा माधवराव पेशव्यांनी रामशास्त्री प्रभुण्यांच्या साह्याने संपुष्टात आणली होती, हे सत्य मात्र सांगायला सोयीस्कर रित्या विसरतात. इथेच नेमाडेंची पुरोगामी “निवडक” विचार प्रवृत्ती दिसते!!
आज जेव्हा ज्ञानवापीचे सत्य आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणातून बाहेर येत आहे, तेव्हा ते सत्य दडपता तर येणार नाही. कारण ते जगासमोर खुले झाले असेल, मग करायचे काय??, तर सत्याचा अपलाप आणि विपर्यास करण्याची आपल्याला संधी आहे, हे ओळखून नेमाडे सत्याचा अपलाप करत आहेत. अन्यथा एकाच वेळी समाज सुधारक म्हणून औरंगजेबाचे महिमा मंडन आणि पेशव्यांची बदनामी याची संगती लागत नाही. पण पवारांच्या उपस्थितीत नेमाडेंचे भाषण होते, यात “ही” राजकीय संगती निश्चित लागते!!
महाराष्ट्रात सनदी अधिकारी राहिलेल्या काही साहित्यिकांना जसा 2014 नंतर देशात अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा “साक्षात्कार” झाला, तसाच औरंगजेबाच्या सुधारकी इतिहासाचा “साक्षात्कार” नेमाडेंना पवारांच्या उपस्थितीत झाला आहे, हे खरे इंगित आहे.
– आऊटडेटेड प्रौढांचा खेळ
महाराष्ट्रात पूर्णपणे हिंदुत्व विचारांचे सरकार सत्तेवर असताना त्यात अजितदादांसह अख्खी राष्ट्रवादी सत्तेच्या वळचणीला येऊन बसली. त्यामुळे आपल्या हातात काही उरले नाही ही पवारांची हतबलता आहे… मग करायचे काय??, हा खरा प्रश्न आहे. “प्रौढत्वी निजशैवास जपणे हा कवीचा बाणा असे”, हे खरेच… पण राजकीय नेते म्हणून किंवा विचारवंत म्हणून जे “प्रौढ” होतात, ते तो बाणा जपू शकतील, असे नाही… म्हणून मग महाराष्ट्रात भिडे – नेमाडे आणि पवार अशा आऊटडेटेड वृद्धांचा खेळ सुरू आहे. त्यात इतिहासासकट महाराष्ट्राचे वाटोळे चालले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App