विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी हे नाव नाकारून “परिवर्तन महाशक्ती” निर्माण करणाऱ्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्या तिसऱ्या आघाडीत खेचण्याचे नुसतेच दावे केले. परंतु, प्रत्यक्षात 11 उमेदवार जाहीर करून आंबेडकरांनी त्यांच्या पुढे पाऊल टाकले. परिवर्तन महाशक्तीचे नेते पत्रकार परिषदांमध्येच अद्याप गुंतून राहिलेत.
स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे नेते वामनराव चटप, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली. पण स्वतःला “तिसरी आघाडी” हे नाव घेणे नाकारले. त्याऐवजी त्यांनी परिवर्तन महाशक्ती हे नाव घेतले. त्याच पत्रकार परिषदेत या सगळ्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत खेचून आणायचे दावे केले. पण प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकरांनी त्या दाव्याकडे दुर्लक्ष करून वंचित बहुजन आघाडीचे 11 उमेदवार जाहीर केले.
कुणाला उमेदवारी?
वंचित बहुजन आघाडीने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील या ट्रान्सजेंडर असून, लेव्हा पाटील आहेत. सिंदखेड राजा येथून पक्षाने सविता मुंढे यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय वाशिम येथून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून नीलेश टी. विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली मतदारसंघात डॉ. अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण येथे फारुख अहमद यांना, लोहा विधानसभेत शिवा नरंगळे यांना, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने शेवगाव विधानसभेची उमेदवारी किसन चव्हाण यांना दिली आहे. तर खानापूर विधानसभेसाठी वंचितने संग्राम कृष्णा माने यांना मैदानात उतरवले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार #VBAforIndia pic.twitter.com/z8h85Ir1SN — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2024
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार #VBAforIndia pic.twitter.com/z8h85Ir1SN
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2024
मित्र पक्षांच्या 2 उमेदवारांची घोषणा
वंचितने आपल्या आघाडीतील भारत आदिवासी पार्टी (बीएपी) व गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी) या 2 पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचीही घोषणा केली आहे. वंचितने बीएपीच्या अनिल जाधव यांना चोपडा (एसटी) या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर जीजीपीच्या हरीश उईके यांना रामटेक येथून मैदानात उतरवले आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे वंचितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जातीय समीकरण साधायाचा प्रयत्न
वंचित बहुजन आघाडीने या यादीद्वारे जातीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाने या यादीच्या माध्यमातून लेव्हा पाटील, वंजारी, बुद्धिस्ट, लोहार (ओबीसी) धीवर, मुस्लीम, लिंगायत, मराठा, पारधी (आदिवासी) व वडार समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App