विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूरमधील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाला. ठाणे क्राइम ब्रॅचचं एक पथक अक्षय शिंदेला घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात होतं. त्याचवेळी शिंदेने एका पोलिसाकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात आरोपी ठार झाल्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक अशी राजकीय चकमक सुरू झाली. काही लोकांनी या पोलीस चकमकीचं, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं समर्थन केले, तर अनेकांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. Badlapur Rape Akshay shinde encounter
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मात्र “बदला पूर्ण झाला”, अशा आशयाची पोस्ट फेसबूकवर केली आहे. तसेच या हत्येनंतर विरोधकांनी राज्य सरकार पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या विरोधकांवरही अमित ठाकरे यांनी फेसबूक पोस्टद्वारे टीका केली आहे. यासह ज्या शाळेत लैंगिक शोषणाची घटना घडली, त्या संस्थेचे संस्थाचालक व इतर काही आरोपी फरार आहेत. त्यावरून अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं आहे.
अमित ठाकरे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे की “बदला… पुरा… बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची बातमी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर पाहिली. एन्काउंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता, पहिला विचार जो आला, तो एकच… त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळाला… या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील. एन्काउंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील. अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करूच शकत नाही, पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला, असे अनेक तर्कवितर्क लढवले जातील. परंतु, जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो, त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं?”
महिला सुरक्षेकडे लक्ष वेधलं
अमित ठाकरे म्हणाले, मला त्या विषयाच्या खोलात जायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्यांची वेगवेगळी राजकीय विचारधारा असू शकते. मुळात मला आपल्या सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे वेधायचे आहे की महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु, अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. राज्यात महिला सुरक्षेबाबत उदासीनता दिसून आली आहे, मग सरकार कोणाचेही असो”.
संस्थाचालक अद्याप फरार
मनविसे प्रमुख म्हणाले, बदलापूर प्रकरणातसुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का झाली नाही? याचे उत्तर गृहमंत्री आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलेच पाहिजे. ‘शक्ती कायदा’, जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पारित झाला आहे, त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही पक्षातर्फे करत आहोतच. परंतु, इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही? याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?
…तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल : अमित ठाकरे
अमित ठाकरे म्हणाले, मागच्या वेळी सुद्धा राजसाहेबांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहे. या अगोदरही या शाळेत अशीच काही प्रकरणे घडली आहेत का? शाळा कोणाच्या मालकीची आहे? संस्थाचालक राजकीय पक्षाशी निगडित असल्याने त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही का? असे अनेक प्रश्न उभे राहतात. अक्षय शिंदेसारख्या नराधमाला त्याने केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली आहेच, परंतु, ज्या शाळेत अत्याचार घडले, त्या शाळेच्या संबंधित संस्थाचालक आणि या गुन्ह्यांत सामील असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन झालेच पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App