विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या ( Sharad Pawar )डोक्यात काय चाललंय??, त्यांच्या मनात मुख्यमंत्री पदासाठी कुणाचे नाव आहे वगैरे मुद्द्यांवरून मराठी माध्यमांमध्ये चर्चा घडवून महाराष्ट्रातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी पवारांच्या मुत्सद्देगिरीच्या गप्पांची राळ उडवून दिली. पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी नसल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला फोडणी दिली. त्यावर जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी पवारांच्या मनातले त्यांच्या बायकोलाही कळत नाही. पवारांच्या मनात काय चालले ते कळायला शंभर जन्म घ्यावे लागतील वगैरे बाता मारल्या.
पण या सगळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणातला एक “पठ्ठा” असा निघाला, की ज्याने एका वाक्यातच पवारांच्या मनात काय चाललंय या गप्पांची हवाच काढून घेतली. आमचं काम आम्ही करतोय. पवारांच्या मनात काय चाललंय, आम्हाला काय करायचेय?? अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संजय राऊत, जितेंद्र आव्हाड वगैरे नेत्यांची टर उडवली आणि आपले वडील शंकररावांचा कडक “बाणा” दाखवून दिला.
शंकरराव चव्हाण हे असेच कठोर आणि कडक नेते होते, की ज्यांनी पवारांचे राजकीय वर्चस्व कधीच जुमानले नाही. किंवा पवारांच्या तथाकथित मुत्सद्देगिरीची कधी टिमकी वाजू दिली नाही. पवारांपेक्षा केंद्रीय राजकारणामध्ये शंकररावांची चलती जास्त होती. पवारांपेक्षा केंद्रीय राजकारणात शंकरराव चव्हाणांनी जास्त पदे भूषवून आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले होते. अशोक चव्हाण यांनी पवारांच्या मनात काय चालले आम्हाला काय देणे घेणे आहे??, असे स्पष्ट शब्दांत सांगून शंकररावांचाच कठोर बाणा दाखवून दिला.
जालना जिल्ह्यातील परतुर मध्ये भाजपचा मेळावा झाला त्या मेळाव्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
– अशोक चव्हाण म्हणाले :
– आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही. कोणाचं आरक्षण काढून घेणे एवढे सोप नाही. मनोज जरांगेंचे अनेक गैरसमज दूर केले आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबर मध्ये मतदान होईल असा अंदाज आहे.
– कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही, मराठा समाजाला स्वतंत्र 10 % आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू असून त्यांचे अनेक गैरसमज दूर झालेत.
– ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. 8) शरद पवारांच्या डोक्यातले कळायला देवेंद्र फडणवीस यांना 100 जन्म घ्यावे लागतील, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय?? याचं आम्हाला काय करायचं??, असा खोचक सवाल करून अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य उडवून लावले.
– माझी आणि बावनकुळे साहेबांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की, मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय मानसिकता आहे. त्या भागातील लोकांचं काय मत आहे. हे मी जाणतो समजतो. मला परतूर मतदारसंघामध्ये जाण्यास आवडेल, असं मी बावनकुळ यांना आवर्जून सांगितले.
– महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत अशोक चव्हाण यांनी आज दुपारी परतूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघातील अठरा पगड जातींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकिकडे मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे फटका बसल्यानंतर अशोक चव्हाण मराठवाड्यात सक्रिय झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App