विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथे लाडक्या बहीणींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेला विरोधक नाव ठेवत आहेत, यावर अजित पवारांनी चांगलाच निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे. लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले, एवढी चांगली योजना आम्ही सुरू केली. मात्र मागच्या महिन्यातच एका कॉंग्रेसच्या नेत्याने बोलताना सांगितले की आम्ही ही लाडकी बहीण योजना बंद करू. पण का? महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी आम्ही देत आहोत, मात्र हे या विरोधकांना नको आहे. ही योजना चालू ठेवायची की नाही हे माऊलींनो तुमच्या हातात आहे. येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा. ही योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवेल हा माझा शब्द आहे.Ajit Pawar
तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे?
अजितदादा म्हणाले की, काही त्यांचे बगलबच्चे सांगत आहेत, अरे आता पगारच होणार नाही. अरे आता यांच्याकडे पैसेच राहणार नाहीत. अरे शहाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे की माझ्या हातात आहे? का लोकांना खोटे बोलतो? तुम्ही संसार करत असताना, तुमच्या खिशात आणि तुमच्या तिजोरीत पैसे किती आहेत हे तुम्हाला माहीत असते की बाहेरच्या लोकांना माहीत आहे? आज यांना लोकांच्यापुढे जायला तोंड नाही, चेहरा नाही म्हणून हे लोकांना सांगतात यांची कॉंट्रॅक्टरची बिले थकलीत, यांचे पुढचे पगारच होणार नाहीत, हे सगळे दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, मागे लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा जनतेच्या मताने कौल दिला. परंतु, आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. घटनेचा शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि मतांचा अधिकार दिला आहे. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहेच आणि कायम राहणार. परंतु काही वेगळ्या गोष्टींचा प्रचार केला गेला आणि त्याची किंमत महायुतीला मोजावी लागली, असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारल्यावर ते अतिशय गतीने कामाला लागले. पहिल्या शंभर दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये प्रकल्प मंजूर केले तसेच महाराष्ट्राला देखील करोडो रुपयांच्या योजना त्यांनी आपल्या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिल्या. आपल्या सोलापूरचे विमानतळ देखील काही काळापर्यंत दुर्लक्षित झाले मात्र केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने पुन्हा ते स्थिरस्थावर करण्यात आला आहे. हवाई वाहतुकीची सोय महाराष्ट्रात असावी ही भूमिका महायुती सरकारची आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App