विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी काही तातडीच्या घोषणा केल्या. त्यानुसार, सरकारने पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 thousand to the flood victims, 4 lakh each to the families of the deceased; Ajit Pawar’s announcement
मागील 8 दिवसांपासून राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकजण पुरात वाहूनही गेलेत. विशेषतः अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे घरांचीही मोठी पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत काही तातडीच्या घोषणा केल्या आहेत.
शासनाकडून मदतीचा हात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सरकार 10 हजार रुपयांची तातडीची मदत करणार आहे. यात पुरामुळे दुकानांचे नुकसान झाल्यास 50 हजार रुपयांची मदत केली जाईल. तसेच पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल.
19 जुलै रोजी राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये 110 नागरिकांना एनडीआरएफने सुरक्षित स्थळी हलवले. याकामी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली, असे अजित पवार यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले.
तातडीने पीक पंचनाम्यांचे निर्देश
बुलडाणा जिल्ह्यात 102 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे तेथील नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये 139.7 मिलीमीटर पाऊस झाला. सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत मदतकार्य करण्यासाठी काही पथके तैनात केली आहेत. या पावसात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिलेत. घरात पुराचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीसाठी 5 ऐवजी 10 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मदत देण्याचे निर्देश देण्यात आलेत, असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
स्वस्तात अन्नधान्याचे वाटप
पुरामुळे शेतजमीन खरडून गेली असेल, तर तिथे पंचनामे करुन पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी सरकार योग्य तो निर्णय घेणार आहे. पीडित व्यक्तींना स्वस्त दरात अन्नधान्याचे वाटप केले जाईल. यासंबंधीचे योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more