पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!!


पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!!, असे खरे राजकीय चित्र महाराष्ट्रात तयार झाले आहे. मग पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांना कितीही “उचलून” धरो, त्याने फरक पडणार नाही, असाच स्पष्ट इशारा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे. तसा इशारा देण्याखेरीज या दोन्ही नेत्यांना पर्याय नव्हता. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता शरद पवारांच्या मनानुसार ठरत नसून, तो मोदी – शहांच्या दिल्लीच्या मनानुसार ठरतो ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे!! BJP leadership encircles political future of sharad pawar, by clipping wings of ajit pawar

अजितनिष्ठांना झापले

अजितदादांना भाजपने आपल्याकडे वळवून घेऊन उपमुख्यमंत्री केल्यानंतर अतिउत्साहात आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री पदाची मनमानी भाजपच्या नेतृत्वाने काही काळ सहन केली. पवारनिष्ठ नॅरेटिव्ह देखील काही काळ सहन केला. पण जेव्हा पाणी राजकीय दृष्ट्या डोक्यावरून जायला लागले, तेव्हा “मोदी कार्ड” ऍक्टिव्हेट झाले आणि मोदींनी एकनाथ शिंदे यांना “राजकीय अभय” दिले. त्यातून अजितदादांना पुरेसा “पॉलिटिकल मेसेज” गेला आणि अजितदादांनी पोस्टरवर आपली भावी मुख्यमंत्री म्हणून नावे लिहिणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मुख्यमंत्र्यांसमोर झापले किंबहुना त्यांना झापावे लागले!!

खरी राजकीय मेख

अजितदादांचे हे झापणे कमी पडले म्हणून की काय देवेंद्र फडणवीस यांनी “समजदार को इशारा काफी है, असे सांगून अजितनिष्ठ आमदारांना आणि कार्यकर्त्यांना गंभीर इशारा दिला आणि इथेच महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी राजकीय मेख आहे!! ही मेख पवारनिष्ठ मराठी माध्यमे आज मान्य करणार नाहीत. पण ती त्यांना मान्य करावी लागेल.कारण पवारनिष्ठ नॅरेटिव्ह नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता बदलणार नाहीत आणि तसे करण्याचा प्रयत्न झाला तर मोदी – शाह ऐकणार नाहीत, ही बाब आता पुरेशी स्पष्ट झाली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण मोदींना महाराष्ट्रात कुठलीही अस्थिरता नको आहे आणि महाराष्ट्रात अस्थिरता ठेवणे हा पवारांच्या राजकारणाचा आवडता छंद आहे. महाराष्ट्रात जेवढी राजकीय अस्थिरता तेवढे पवारांचे फावणार हा इतिहास आहे आणि मोदी – शाहांना हे बिलकूल आता घडू द्यायचे नाही.

– अजितनिष्ठांचे औधत्य सहन करायला मोदी – शाह हे काँग्रेसचे नेते नव्हेत

एकतर स्वतःवरच्या ईडी – सीबीआय केसेसच्या भीतीने भाजपच्या आश्रयाखाली सत्तेची वळचणीला यायचे आणि वर माध्यमांमधून पवारनिष्ठ नॅरेटिव्ह चालवत स्वतःकडे जनतेचा कोणताही कौल नसताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा घडवायच्या, असली राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची “राजकीय नाटके” सहन करायला मोदी – शाह हे काही खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसचे नेते नाहीत. ते बळकट भाजपचे नेते आहेत. स्वतःच्या हिंमतीवर ते राज्य चालवत आहेत. कोणत्याही माध्यमांच्या आधारे स्वतःचे नॅरेटिव्ह चालवून महत्त्व टिकवून धरणारे ते “महाराष्ट्र लिमिटेड चाणक्य” नव्हेत!!

अजितदादांची दादागिरी हा आता इतिहास

आतापर्यंत अजित पवार हे काँग्रेसच्या राजवटीत आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या राजवटीत उपमुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांची “दादागिरी” चालायची. पवारच राज्य चालवतात, असा नॅरेटिव्ह मराठी माध्यमे चालवायची. पण आता ती वस्तुस्थिती उरलेली नाही. मग भले अजितदादा शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी माध्यमांनी तसले नॅरेटिव्ह चालवले असतील, लोकमत सारख्या समूहाने तर भाजपने सरकार चालवणे हे अजित दादांकडे आऊटसोर्स केले आहे, असा नॅरेटिव्ह चालवला असेल, पण भाजपच्या नेतृत्वाने त्यांची डाळ शिजू दिलेली नाही!!

भाजप कार्ड ऍक्टिव्हेट

अजितदादाच महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ चालवतात सरकार चालवतात असा नॅरेटिव्ह चालू झाल्याबरोबर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातले नेतृत्व खऱ्या अर्थाने ऍक्टिव्हेट झाले आणि पवारनिष्ठ नॅरेटिव्ह मोडून काढण्यासाठी फडणवीस पुढे आले. स्वतः अजितदादांना आपल्या आमदारांना झापावे लागले. शरध पवारांना जरी महाराष्ट्रात अस्थिरता हवी असली तरी मोदी – शाहांना ती बिलचूल नको आहे आणि म्हणूनच पवारनिष्ठ नॅरेटिव्ह उध्वस्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने चाप लावला आहे!!

पवारांची बूज राखली पण…

काँग्रेसच्या राजवटीत पवार इकडून तिकडे वाटेल तसे राजकारण फिरवू शकायचे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना चाप लावला होता. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो चाप घट्ट झाला. पण तरीही त्यावेळी मोदींनी पवारांची बूज राखली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून पवारांनी महाराष्ट्रावर राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा उभ्या – आडव्या – तिरक्या चाली खेळल्या. मोदी – शाहांना ते आडवे गेले आणि इथे खऱ्या अर्थाने “खटकी” पडली!!*

त्यामुळे आता जे काही “डील” होईल, ते आपल्याच टर्म्स अँड कंडिशन्सवरच होईल हे मोदी – शाहांनी ठरवले आणि म्हणूनच पहिल्यांदी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फुटली. अन्यथा पवारांना इतक्या मोठ्या प्रमाणात सोडून जाण्याची राष्ट्रवादीच्या आमदारांची हिंमत झाली नसती. पण ती हिंमत झाली, याचा अर्थच पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली हा आहे आणि आता राष्ट्रवादीचे हेच आमदार पवारांना भाजपबरोबर सत्तेच्या वळचणीला येण्यासाठी मजबूर करत आहेत.

तब्येतीचा विषय काढून सिंपथी वेव्ह!!

दरम्यानच्या काळात मराठी माध्यमांनी पवारांच्या तब्येतीचा विषय चालवून “सिंपथी वेव्ह” तयार करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. पण हा तर खऱ्या अर्थाने पवारांच्या मूलभूत राजकारणाचा पराभव आहे. कारण पवारांनी आपण म्हातारे झालो नाहीत. 82 च काय, पण 92 वर्षाचे झालो तरी आपण राजकारणात कायम राहणार, असे उद्गार काढले होते. या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमे जर पवारांचा तब्येतीचा विषय चालवून “सिंपथी वेव्ह” तयार करणार असतील, तर तो पवारांच्याच राजकारणाचा खरा पराभव आहे हे त्यांना मान्य करावे लागेल!!… कारण वाढते वय आणि आजारपण हे मुद्दे पवारांनाच मान्य नाहीत.

पण आता पवारांचे उघडपणे कोणी ऐकणार नाही. पण त्याचबरोबर ते सत्तेचा वाटा मिळूनच देऊ शकणार नसतील तर उपयोग काय??, असे म्हणून पवारांचे आमदारच त्यांना मोदी शरणागत करण्याच्या स्थितीत आले आहेत. म्हणून मग मोदी आणि शाहांबरोबर पवार कोणतेही “डील” करोत, ते “डील” त्यांच्या स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स वर असणारच नाही. ते मोदी – शाहांच्या स्टम्स अँड कंडिशन्स वर असेल!!

– पवारांच्या नव्हे, मोदी – शाहांच्या टर्म्स अँड कंडिशन्स

तसेही मोदी – शाह आता पवारांबरोबर कोणते तरी “डील” करत आहेत. पुण्यातल्या कार्यक्रमात चार बडे नेते एकत्र येणार आहेत. तेथे पवारांना कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न होणार आहेत, अशा राजकीय पुड्या बातम्यांच्या स्वरूपात मराठी माध्यमांना सोडाव्या लागत आहेत. पण अशा पुड्या कितीही सोडल्या तरी, सध्या कुंपणावर बसलेले पवार यशवंत मार्गाने फार तर सत्तेच्या दिशेने येऊ शकतील, पण ही सत्ता पवारांच्या टर्म्स अँड कंडिशन्स वरची नसेल, तर ती मोदी – शहांच्या टर्म्स अंड कंडिशन्स वर मिळणारी असेल,… आणि हाच खऱ्या अर्थाने पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांचे पंख छाटताना थोरल्या पवारांना भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप ठरणार आहे!!

BJP leadership encircles political future of sharad pawar, by clipping wings of ajit pawar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*