विनायक ढेरे
मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे जागतिक राजकारणातल्या एका महत्त्वाच्या कालखंडातला ऐतिहासिक दुवा निखळला आहे. त्यांच्या पिढीतले जगाच्या राजकारणावर छाप पडणारे बहुतेक राजकारणी आणि नेते आधीच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे “अखेरचा रोमन”ही काळाच्या पडद्याआड गेला.
ग्लासस्नोत आणि परस्त्रोही का
1980 च्या दशकात कम्युनिस्ट सोवियत युनियनच्या पोलादी पडद्याला “ग्लासस्नोत” आणि “पेरेस्त्रोईका” अर्थात “खुलेपणा” आणि “सुधारणा” अशा खिडक्या आणि दारे पाडणाऱ्या नेत्याचे नाव होते मिखाईल गोर्बाचेव्ह. 1960 च्या दशकातल्या दशकानंतरच्या शीतयुद्धकालीन रशिया आणि अमेरिका या दोन ध्रुवांमध्ये विभागलेले जग मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या “ग्लासस्नोत” आणि “पेरेस्त्रोईका” यांनी काही काळ तरी एकत्र आणले. जगाला शांततेची आस आणि आशा दाखवली. शीतयुद्धकालीन कोंडी फोडण्यासाठी नेमके कोण पुढाकार घेणार?? हेन्री किसिंजर प्रणित दीर्घद्वेषी परराष्ट्र धोरण राबविणारी अमेरिका की कम्युनिस्ट पोलादी पडद्याच्या आड आपली हिंस्र नखे वाढविणारा रशिया?? हा त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चेचा विषय असायचा.
– शीतयुद्धाची कोंडी फोडली
पण शीतयुद्धकालीन कोंडी फोडण्याचे धाडस “लोकशाहीवादी” अमेरिकेने नव्हे, तर “कम्युनिस्ट” सोवियत युनियनने मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखाली दाखवले होते. गोर्बाचेव्ह यांना या धाडसाबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळाले होते. पण “ग्लासस्नोत” आणि “पेरेस्त्रोईका” याची गोर्बाचेव्ह यांना फार मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली होती. किंबहुना सोवियत युनियनलाच ही किंमत चुकवावी लागली.
– सोवियत युनियन फुटले
1990 च्या दशकात सोवियत युनियन फुटून 7 देश स्वतंत्र झाले. ज्या कम्युनिस्ट क्रांतीने 1917 मध्ये वेगवेगळ्या वांशिक गटांना आणि देशांना सोवियत युनियनच्या पोलादी पडद्याच्या आतमध्ये करकचून बांधून ठेवले होते, ते बंध कृत्रिमच होते. “ग्लासस्नोत” आणि “पेरेस्त्रोईका”मुळे आधी ते बंद सैल झाले आणि नंतर तुटून गेले. गोर्बाचेव्ह यांनी आपल्या निर्णयाची ही राजकीय किंमत देखील चुकवली. ते रशियाच्या राजकारणातून कायमचे दूर गेले. पण तरीही जगाच्या लक्षात मात्र नक्की राहिले. कारण रशियाला, रशियन नागरिकांना त्यांनी प्रगत पाश्चात्य जग दाखविले, तर प्रगत पाश्चाच्या जगताला त्यांनी रशिया उघडून दाखविला.
– भारताशी उत्तम संबंध
मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे भारताशीही उत्तम संबंध होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते दोनदा भारत दौऱ्यावर आले होते. राजीव गांधी देखील रशियाच्या दौऱ्यावर दोन वेळा गेले होते. या दोन्ही नेत्यांची “पॉलिटिकल केमिस्ट्री” उत्तम जमली होती. भारतीय उपखंडातील कोंडी लवकरच सुटेल, असा आशावाद गोर्बाचेव्ह यांनी भारत दौऱ्यात व्यक्त केला होता.
गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे रशियाच्या इतिहासातला रशियन नागरिकांना खुला श्वास घेऊ देणारा एक महान नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App