पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस मध्ये भेट घेतली. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना प्रेमाची मिठी मारली. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आतल्या गाठीच आशा ठरल्या की ज्या सुटणे या मिठ्यांमधूनही कठीण आहे.
मोदी आणि ट्रम्प भेटीत भारत अमेरिका द्वीपक्षीय संबंधांना वेगळ्या उंचीवर नेण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. 2030 पर्यंत 500 बिलियन डॉलर्स व्यापार वाढविण्याच्या शपथा घेतल्या. ऑइल, गॅस, डिफेन्स क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढीच्या देखील शक्यता तपासल्या. हे सगळे सकारात्मक घडले. दोन्ही देशांसाठी ही win – win सिच्युएशन असल्याचेही बोलले गेले. त्यात तथ्य नव्हते असे बिलकुल नाही, पण म्हणून मोदी – ट्रम्प भेटीमध्ये सगळेच काही गोडी गुलाबीचे होते असेही समजण्याचे कारण नव्हते, तशी काही उदाहरणे समोर आली.
मोदींच्या भेटी आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना फोन करून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. पुतीन यांच्याशी त्यांनी तब्बल 90 मिनिटे फोनवर चर्चा केल्याच्या बातम्या आल्या. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर बोलताना भारताचा पक्ष स्पष्टपणे सांगितला. भारत रशिया – युक्रेन युद्धात तटस्थ नाही. तो शांतीच्या बाजूने आहे. ही युद्धाची वेळ नव्हे, शांततेची वेळ आहे. कुठल्याही समस्येचा तोडगा युद्धभूमीवर निघू शकत नाही. तो वाटाघाटीच्या टेबलवरच निघू शकतो, असे आपण राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना देखील सांगितले, असे उद्गार मोदींनी काढले.
पण भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे दोघेही रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धात शांततेची भूमिका घेऊन ते युद्ध थांबविण्याचा भूमिकेत स्पष्ट दिसले असताना प्रत्यक्षात रशियाने युक्रेन मधल्या चेर्नोबिल अणुभट्टीवर ड्रोन हल्ला केल्याची बातमी समोर आली. याचा अर्थ रशियाने युद्ध थांबवण्याचे “क्रेडिट” भारत किंवा अमेरिकेला मिळू देण्यापेक्षा आपल्या टायमिंग नुसार युद्ध किंवा शांतता निवडल्याचेच यातून दिसले.
मोदींच्या भेटी आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी जास्त जादा टेरिफ रेटवरून भारताला सुनावले. भारतासह कोणत्याही देशाने अमेरिकन प्रॉडक्ट वर जास्त टेरिफ लावले, तर अमेरिका ही तसेच करायला मागेपुढे पाहणार नाही, असे सांगितले. पण त्या पलीकडे जाऊन ट्रम्प यांनी भारत सदस्य देश असलेल्या “ब्रिक्स” देशांचा समाचार घेतला. “ब्रिक्स” समूह मूळातच चांगल्या हेतूने तुम्ही बनविला नव्हता, तर केवळ अमेरिकन डॉलरशी टक्कर घेण्यासाठी बनवला होता. पण ते त्यांना जमले नाही. ज्या क्षणी मी म्हणेन, त्या क्षणी “ब्रिक्स” संपुष्टात येईल, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली. या टिप्पणीतून त्यांनी एकाच बाणात चीन आणि भारत यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींना त्यांनी बांगलादेशासंदर्भात निर्णय घेण्याची “सूट” जरूर दिली. तिथली डीप स्टेटची इन्व्हॉलमेंट नाकारली. पण हळूच भारत आणि चीन सीमा वादात मध्यस्थी करायची तयारी दाखवली, जी भारताने ठामपणे फेटाळून लावली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारताची भूमिका वॉशिंग्टन मध्येच स्पष्ट केली. भारत – चीन द्वीपक्षीय संबंधांमध्ये तिसऱ्या कोणाची मध्यस्थी नको, असे त्यांनी अमेरिकेला ठणकावले.
या सगळ्या उदाहरणांमधून भारत आणि अमेरिका यांनी आपापल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचा विचार केला, इतकेच काय पण रशियाने देखील विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन आपल्या हितसंबंधांना भारत आणि अमेरिका या दोन बड्या देशांना बाधा आणू दिली नाही, हेच ट्रम्प मोदी यांच्या हस्तांदोलनापलीकडचे आणि मिठीपलीकडचे राजकीय वास्तव ठरले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App