विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन चिनी कंपन्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या रॅपीड अँटीबॉडी टेस्टींग कीटचा वापर थांबवण्याचा भारताच्या निर्णयवार चीनने मंगळवारी (दि. 28) कडक शब्दात नाराजी व्यक्त केलीय. जगातल्या अनेक देशांमध्ये निर्यात होणारी आमची उत्पादने दर्जेदार असल्याचा दावा चीनने केलाय.:
चीनी दुतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी मंगळवारी पहाटे तातडीनं या संदर्भातलं निवेदन प्रसिद्धीला दिलं. ”चीनमधून निर्यात होणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांच्या दर्जाला आमचे प्राधान्य असते. असे असताना काही ठरावीक घटकांनी आमच्या उत्पादनांवर ‘सदोष’ असा ठपका ठेवणं हे बेजबाबदारपणाचं आणि गैर आहे. पूर्वग्रहदुषीतपणातून हे मत व्यक्त करण्यात आलं आहे, ” अशी तिखट प्रतिक्रीया चीननं भारताचं नाव न घेता भारताविरोधात नोंदवलीय.
गुंआँगझो वंडफो बायोटेक आणि झुहाई लिव्हझॉन या चिनी कंपन्यांकडून उत्पादीत होणाऱ्या रॅपीड अँटीबॉडी कीट्सचा वापर भारत सरकारनं थांबवला पाहिजे, अशी विनंती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) काही तासांपुर्वीच भारत सरकारला केली. या चिनी कंपन्यांच्या कीट्सचा वापर केल्यानंतर अनेक राज्यांनीही त्यांच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली होती. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत सरकारला वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आयसीएमआरची भूमिका कळीची असल्यानं त्यांच्या या सूचनेवर चीन सरकार खवळलं आहे.
चिनी दुतावासापाठोपाठ या दोन्ही चिनी कंपन्यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. वंडफो आणि लिव्हझॉन यांनी म्हटलं आहे की,चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादन व्यवस्थापनाकडून (एनएमपीए) आमच्या उत्पादनांची तपासणी केली जाते. चीन आणि आमच्या निर्यातदार देशांच्या निकषांची पूर्तता आमची उत्पादने करतात. आयसीएमआरने देखील पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) माध्यमातून आमच्या उत्पादनांवर मान्यतेची मोहोर उमटवलेली आहे.
कोरोना विषाणूची चाचणी घेणारी चिनी कंपन्यांची ही किट्स युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांना निर्यात होत आहेत.
दरम्यान, जी रोंग यांनी म्हटलं आहे की, ‘चीनच्या सद्भावना आणि प्रामाणिकपणाचा’ आदर ‘नवी दिल्ली’ करेल अशी ‘बीजींग’ला आशा आहे, या शब्दात जी रोंग यांनी भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. वास्तवाच्या आधारावर आणि संवादाच्या माध्यमातून चिनी कंपन्यांसोबतचा मुद्दा ‘नवी दिल्ली’ व्यवस्थीत हाताळेल, अशी आशा ‘बीजींग’ला आहे, असेही त्यांनी नमूद केलं आहे.
चीनी कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या कीट्सची वाहतूक, साठवणूक करण्याच्या नियमांचं काटेकोर पालन झालं पाहिजे. व्यावसायिक कौशल्यानं या उत्पादनांची हाताळणी झाली नाही तर त्यांच्या उपयुक्ततेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या अचूकतेत बदल घडू शकतो, असेही रोंग यांनी स्पष्ट केलं. कोरोना विषाणू हा समस्त मानवजातीचा शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी चीन कटिबद्ध आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात चीन भारताच्या सोबत आहे आणि भारताची वैद्यकीय आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याच्या कामात आम्ही सहभागी होऊ इच्छितो, असा दावा त्यांनी केला.
वादग्रस्त ठरलेल्या टेस्टिंग कीट्सची भारताने हजारोंच्या संख्येने चीनकडे मागणी नोंदवली आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिगत सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या पीपीई कीट्सची आयातदेखील भारत चीनकडूनच करतो आहे. दरम्यान, चिनी कंपन्यांकडून येणाऱ्या उत्पादनांबद्दल अनेक राज्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.
एप्रिलच्या 16 तारखेला चीनमधून साडेसहा लाख टेस्टिंग कीट्स गुऑंगझो विमानतळावरुन भारताला निर्यात झाली. तत्पुर्वी 27 मार्चला देखील आयसीएमआरच्या माध्यमातून भारत सरकारने पाच लाख कीट्सची मागणी नोंदवली होती. सर्वच राज्यांनी चाचण्यांची संख्या वाढवल्यानं आणखी लाखो कीट्सची गरज भारताला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने या कीट्सची किंमत दुप्पट केल्याचा आरोप आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App