- फंडिंग कायमचे बंद करण्याचे WHO प्रमुखांना पत्र; संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याचाही इशारा
- अमेरिकेचे WHO ला फंडिंग ४५ हजार कोटी डॉलर; चीनचे वार्षिक फंडिंग ३.३ कोटी डॉलर
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : येत्या महिनाभरात WHO ने चीनधार्जिणे धोरण सोडा, अन्यथा संघटनेचे आर्थिक फंडिंग कायमचे बंद करीन, असा गंभीर इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
WHO संघटना चीनच्या दबावाखाली काम करत असल्याची जंत्रीच ट्रम्प यांनी चार पानी पत्रात दिली आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी २१ जानेवारी रोजी WHO ला जागतिक महामारी संदर्भात इशारा जारी करण्यापासून रोखले. WHO च्या प्रमुखांनी त्यांचा सल्ला मान्य केला. त्यामुळे जगाला वेळीच कोरोना विरोधात उपाययोजना करण्यात विलंब झाला, असा आरोप ट्रम्प यांनी पत्रात केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून WHO जागतिक आरोग्य संघटना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाब्दिक चकमक सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता फक्त आरोप – प्रत्यारोपांपुरता हा संघर्ष मर्यादित राहिलेला नाही. WHO ला चीनने २ अब्ज डॉलरच्या मदतीचे आश्वासन दिले असले तरी जगातील सर्व देश विरोधात गेल्यावर एकट्या चीनच्या मदतीने संघटना चालविणे WHO ला अवघड जाईल.
यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO वर आरोपही केले होते. तसेच निधी रोखण्याचाही इशारा दिला होता. पण ताजा इशारा अधिक गंभीर आणि थेट कारवाईचा आहे. WHO ला ट्रम्प यांनी ३० दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा अमेरिका कायमसाठी त्यांचा निधी कायमचा रोखेल. WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांच्या चुकांची शिक्षा संपूर्ण जग भोगत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
“जगाला बरीच किंमत मोजावी लागणार्या कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी WHO आणि आपण वारंवार चुकीची पावले उचलली आहेत हे स्पष्ट झाले आहे. चीनपासून आपण स्वतंत्र आहोत हे सिद्ध करणे हा संघटनेला पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या जागतिक संघटनेत सुधारणा करण्यासाठी माझ्या प्रशासनाने तुमच्याशी चर्चा सुरू केली आहे. परंतु त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवून चालणार नाही,” असेही ट्रम्प यांनी पत्रात नमूद केले आहे.
करोनामुळे अमेरिकेत ९० हजार मृत्यू
“फार कमी वेळात हे संकट सर्वासमोर आलं आहे. करोनामुळे अमेरिकेत ९० हजार तर जगभरात ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा निकाल उत्तम मिळाला आहे. परंतु आतापर्यंत या संकटावर कोणतेची ठोस उपचार नाहीत. संयुक्त राष्ट्राचा हा आरोग्य विभाग चीनच्या हातचे बाहुले बनला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर आम्ही निर्बंध घातले नसते तर देशातील आणखी नागरिकांचा मृत्यू झाला असता. याचा आरोग्य संघटनेनं विरोध केला होता. ही संघटना चीन केंद्रीतच आहे,” असेही ट्रम्प यांनी पत्रात म्हटले आहे.
आरोग्य संघटनेचा होता विरोध
“WHO ने अतिशय अयोग्य काम केले आहे. अमेरिका दरवर्षी संघटनेला ४५ कोटी डॉलर्सची मदत करतो, तर चीन केवळ ३.८ कोटी डॉलर्सची मदत करतो. आम्ही चीनमधील नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर निर्बंध घातले. परंतु WHO ने त्याला विरोध केला होता.
अमेरिका खुप कठोर पावले उचलत आहात असे त्यांनी म्हटले होते. परंतु WHO चे म्हणणे चुकीचे असल्याचे गेल्या दोन महिन्यांतील घटनांवरून सिद्ध झाले,” असेही ट्रम्प यांनी पत्रात नमूद केले आहे.
Array