विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात विविध मार्गांवर धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास तब्बल ९ दिवस घेत आहेत, अनेक रेल्वेगाड्या आपला मार्गच विसरल्या, अशाप्रकारची वृत्ते काही माध्यमे देत आहेत. मात्र, प्रसारमाध्यमांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून अशा प्रकारच्या फेक न्यूज देऊ नयेत, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी पत्रकारपरिषदेत केले.
यादव म्हणाले, काही प्रसारमाध्यमांनी गोरखपूर येथे जाणारी रेल्वे आपला मार्ग विसरल्याने ओरिसात पोहोचली, अशी फेन न्यूज दिली होती. रेल्वे आपला मार्ग असा कसा विसरेल, असा प्रश्न विचारत यादव म्हणाले की, गोरखपूर येथे जाणारी रेल्वे काही तासांचा उशिर होऊन आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली होती. त्यास विलंब झाला कारण त्या मार्गावरची गाड्यांची मागणी जास्त होती. त्यामुळे गोरखपुर येथे जाणारी रेल्वे आम्ही छपरामार्गे सोडली. त्यामुळे रेल्वे आपला मार्ग चुकली, असा प्रकारच्या फेक न्यूज देणे योग्य नाही, त्यामुळे आमच्या १२ लाख रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे यादव यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे आतापर्यंत एकुण ८ हजार ८४० पैकी केवळ ७१ गाड्यांचा (१.८ टक्के गाड्या) मार्ग २० ते २४ मे दरम्यान बदलावा लागला. या चार दिवसात श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांची सर्वाधिक म्हणजे ८० टक्के मागणी ही उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून होती. त्यामुळे तो मार्ग व्यस्त असल्याने या मार्गावरील गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या. त्याचप्रमाणे आसाममध्ये जाणाऱ्या रेल्वेने तेथे भुस्खलन झाल्याने १२ तासांपेक्षा जास्त वेळ घेतला. त्याचप्रमाणे केवळ ४ रेल्वे गाड्यांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी ७२ तासांपेक्षा जास्त वेळ लागला आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेत झालेल्या वायुगळतीच्या घटनेमुळे तेथून येणाऱ्या गाड्या आम्हाला विलंबाने सोडाव्या लागल्या आहेत. मात्र, भारतीय रेल्वे मजुर बांधवांची काळजी घेण्यास कोणतीही हयगय करीत नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
महिन्याभरात ५२ लाख मजुर पोहोचले स्वगृही
देशात १ मे ते २८ मे या जवळपास महिन्याभरात आतापर्यंत एकुण ३ हजार ८४० श्रमिक विशेष रेल्वे धावल्या आहेत. त्याद्वारे देशाच्या विविध भागात अडकलेल्या ५२ लाख मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले आहे. आठवड्याभराच्या कालावधीत म्हणजे २२ ते २८ मे दरम्यान १ हजार ५२४ गाड्यांमार्फत २० लाख मजुर स्वगृही पोहोचले आहेत. राज्यांच्या मागणीनुसार रेल्वे धावत असून त्यांची मागणी असेपर्यंत रेल्वे सुरू राहणार आहेत. राज्यांसोबत रेल्वे सतत संपर्कात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यांची मागणी कमी होत असून सध्या राज्यांकडून ४५० श्रमिक विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे भारतीय रेल्वेचे १२ लाख कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे देशातील शेवटचा मजुर त्याच्या घरी पोहोचेपर्यंत कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही विनोद कुमार यादव यांनी दिली.
प्रवासासाठी आवश्यक त्या प्रोटोकॉलचे रेल्वेकडून कटाक्षाने पालन केले जात असल्याचे यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, आरोग्य तपासणी, प्रवासात न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, पिण्याचे पाणी यांची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ८५ लाख भोजन आणि १.२५ कोटी पाण्याच्या बाटल्या रेल्वेने विनामूल्य पुरविल्या आहेत. रेल्वे विभागांनी स्थानिक आचारी, बेकरी यांच्या मदतीन भोजनाची सोय केली आहे, त्यामध्ये अनेक एनजीओदेखील मदत करीत आहेत.
विशेष म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही अनेक ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करून मजुर बांधवांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सध्याच्या संकटाच्या काळातही भारतीय रेल्वे कार्यरत आहे, समस्यांचा अभ्यास करून दररोज आमच्या कार्यशैलीमध्ये सुधारणाही करीत आहोत. त्याचवेळी राज्यांनी आपल्या राज्यात असलेल्या मजुरांशी संपर्क साधणे, त्यांची नेमकी आकडेवारी आम्हाला कळविणेदेखील गरजेचे असल्याचे यादव यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App