विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दाखल होणार्या ‘कोकणच्या राजा’चे आगमन यंदा लांबले आहे. देश-विदेशात विख्यात असलेला हापूस आंबा ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळखला जातो. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची आवक खर्या अर्थाने सुरु होत असते. मात्र कोरोना विषाणूने हापूसची वाट अडवून धरल्याने गुढी पाडव्याचा हापूसचा मुहूर्त चुकला आहे.
‘राष्ट्रीय लॉकडाऊन’मुळे स्थनिक तसेच आंतरजिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आंबा ग्राहकांपर्यंत पोहचू शकला नाही. शिवाय, बाजार समित्यांनीही 31 मार्च पर्यंत बंद ठेवला आहे. परिणामी कोकणातील आंबा उत्पादकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
केवळ मुहूर्त गाठण्यासाठी म्हणून पुण्या-मुंबईच्या काही व्यापार्यांनी फळ विक्री चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिस कारवाईच्या भीतीने वाहतूकदार त्यांची वाहने रस्त्यावर आणण्यास राजी नाहीत.
दरम्यान, आंब्याची तुरळक आवक मार्च उजाडल्यापासून चालू झाली. प्रामुख्याने आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तळकोकणातून आंबा येण्यास सुरुवात झाली. मुंबईत रोज सुमारे अनुक्रमे दहा हजार पेट्यांची तर पुण्यात अगदीच नगण्य आंबा आवक सुरु झाली होती. मात्र कोरोनामुळे त्याला अडथळा आला आहे. संचारबंदीमुळे इंधन, गाडी चालकाचे जेवण, गाडी दुरुस्ती आदी सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतूकदारांनी गाड्या न सोडणे पसंत केले आहे.
वाहतुक व्यवस्था कोलमडून गेल्याने आंबा निर्यातही थांबली आहे. बंदरातून होणारी जहाज वाहतूक आणि विमाने बंद असल्याने निर्यातीला वाव नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणात आंबा उतरवणार्या परप्रांतिय मजुरांचा यावेळी मोठा तुटवडा जाणवत आहे. बाजार समित्यांमध्येही कामगार नाहीत. ऐन हंगामाच्या तोंडावर कोरोनामुळे आंबा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App