विशेष प्रतिनिधी
मुंबई : मजूरांच्या रेल्वे वाहतूकीच्या प्रश्नावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टाकलेल्या “यादी गुगलीवर” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार “क्लीन बोल्ड” झाल्याचे आजच्या राजकीय घटनाक्रमांवरून आणि घडामोडींवरून स्पष्ट झाले.
मजूरांच्या प्रवासासाठी रेल्वे मंत्रालय सहकार्य करत नाही. पुरेशा रेल्वेगाड्या उपलब्ध करून देत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला ताबडतोब ट्विटरवरून उत्तर देत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रवासी मजूरांची आणि त्यांना पोहोचविण्याच्या गावांची यादी द्या, १२५ रेल्वेगाड्या ताबडतोब मंजूर करतो, असे स्पष्ट केले होते. त्याला महाआघाडी सरकारकडून उत्तर आले नाही. पियूष गोयल यांनी तासाभरानंतर लगेच ट्विट केले, “प्रवासी मजूरांच्या यादीची वाट बघतोय. अजून रेल्वे मंत्रालयापर्यंत यादी पोहोचली नाही.”
यानंतर कालची अख्खी रात्र उलटली. दिवस उजाडला. सकाळ उलटून गेली. पण प्रवासी मजूरांची यादी महाआघाडी सरकार देऊ शकले नाही. दुपारी २.३० वाजता शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पत्रकारांना लाइव्ह उत्तरे दिली. त्यात त्यांना प्रवासी मजूरांच्या यादीबद्दल विचारल्यानंतर राऊतांनी वेगळीच मखलाशी केली. “रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याच राज्याला मजूरांची यादी मागितलेली नाही. मग महाराष्ट्रालाच का यादी मागताहेत?” त्यावरही पत्रकारांनी मजूरांची यादी रेल्वे मंत्रालयाला का दिली नाही?, असा प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनी पुन्हा तेच उत्तर दिले आणि ते राज्यपाल – शरद पवार भेटीच्या प्रश्नाकडे वळले.
या सगळ्या राजकीय घटनाक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा… पण प्रवासी मजूरांच्या यादीच्या प्रश्नावर ते अडले. मग त्यांनी काल रात्रभर आणि आज सकाळ उलटून गेली तरी त्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. दुपारी मात्र संजय राऊतांमार्फत मखलाशीपूर्ण उत्तर देऊन यादीच्या प्रश्नातून सुटका करवून घेण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत उशीर झाला होता… रेल्वेमंत्र्यांनी टाकलेल्या “यादी गुगलीवर” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार “क्लीन बोल्ड” झाले होते…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App