राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणूक लवकर घेण्याचा घटनात्मक मार्ग काढला आहे. पण या निमित्ताने झालेल्या राजकारणात सिल्वर ओकने मजा पाहून घेतली, मातोश्रीने आपले हसे करून घेतले आणि सामनाकारांचाही मुखभंग झाला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘सामना’कारांनी टीकेचे बाण सोडले, हवेत शब्दांच्या फैरी झाडल्या, होता नव्हता तो दारूगोळा राजभवनावर पाखडून घेतला… पण राजभवनाचा केसही वाकडा झाला नाही आणि ‘मातोश्री’चा विधान परिषदेत शॉर्टकटने नियुक्तीचा मनसूबा पूर्ण होऊ शकला नाही.
सामनाच्या अग्रलेखातून दररोज राजभवनाला झोडपायचे आणि शेवटी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी त्यांच्याच दारात जायचे. तेही जमले नाही म्हणून थेट ७ लोककल्याण मार्गाला फोन लावायचे “प्रयोगही” मातोश्रीने करून झाले. पण ना राजभवन बधले, ना ‘७ लोककल्याण मार्ग’ बधला. शेवटी घटनात्मक तरतुदींचे पालन करूनच निवडणुकीद्वारे मातोश्रीला विधान परिषदेत पाऊल टाकावे लागेल हे निश्चित.
राज्यपालांनी घटनेच्या तरतुदींचे पालन करत राज्यात येऊ घातलेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्याचे पाऊल उचलले. त्यांनी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक लवकर घेण्याचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले. या घटनाक्रमात मुख्यमंत्र्यांची अब्रू जाता जाता वाचली, पण ‘सामना’कारांचा चांगलाच मुखभंग झाला.
‘सिल्वर ओक’च्या नादी लागून लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये राजभवनावर आगपाखड तर भरपूर होती पण नेमक्या घटनात्मक तरतूदी काय आहेत, याचे बारकावे एकदाही तपासून पाहिले गेले नाहीत. तशी गरज ना सामनाकारांना वाटली, ना सिल्वर ओकला…!! आणि सिल्वर ओक तरी कशाला या प्रकरणात घटनात्मक तरतूदींच्या बारकाव्यात शिरेल?
थोडीच त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती? त्यांना काय त्याचे देणे घेणे होते? प्रतिष्ठा तर मातोश्रीची पणाला लागली होती. पण या सर्व प्रकारात मातोश्रीने स्वत:च्या हाताने पुरती नाचक्की करवून घेतली. राजभवनाकडे दोनदा मंत्रिमंडळाची शिफारस आणि पंतप्रधानांना थेट फोन. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी अशा घटना महाराष्ट्रात कधीही घडल्या नव्हत्या. मात्र हा “गौरवशाली” इतिहास आता मातोश्रीच्या नावावर नोंदविला जाईल.
राज्यपालांच्या एका पत्राने अनेकांना धक्के बसले असले तरी नियुक्त सदस्य मुख्यमंत्रीपदी किंवा मंत्रीपदी बसू नये, असा पायंडा जपला जाईल. पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून राज्यपालांनी कोणतेही घटनाबाह्य पाऊल उचलले नाही हे स्पष्ट होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App