विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात विविध भागात अडकलेल्या २५ लाख मजुरांना घरी सोडणे, कोव्हिड विशेष इस्पितळे, रेल्वे डब्यांचे कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतर करणे, सुमारे १ लाखापेक्षा जास्त पीपीई किट्सची निर्मित करणे, याद्वारे कोरोना संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने अभुतपूर्व असे काम केले आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी त्याविषयी शनिवारी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव म्हणाले, टाळेबंदीमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी १ मे पासून श्रमिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अनेक राज्यांनी मागणी केली होती, त्यामुळे राज्यासोबत समन्वय साधून या विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. त्याद्वारे १ मे रोजी ४ रेल्वेद्वारे सुमारे ४ हजार प्रवासी आपल्या घरी पोहोचले, तर २० मे रोजी पर्यंत दिवसाला २७९ रेल्वेद्वारे ४ लाख प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या चार दिवसात २६० रेल्वे सोडण्यात आल्या आहेत, त्यातूनही हजारो प्रवासी एकाचवेळी आपल्या घरी पोहोचले आहेत. आतापर्यंत सुमारे ३५ लाख स्थलांतरीत मजुरांना रेल्वेने स्वगृही सोडले आहे.
पीपीई किट्स, सॅनिटायझरचीही निर्मिती
रेल्वेने आपल्या कार्यशाळांमध्ये पीपीई किटची निर्मीती करण्यास सुरुवात केली असल्याचे यादव यांनी सांगितले. आतापर्यंत १ लाख २० हजार किट्स तयार करण्यात आले असून दरदिवशी सुमारे ४००० किट तयार करण्यात येत आहेत. फेसमास्क आणि हँड सॅनिटायझरचीदेखील निर्मिती करण्यात येत आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे २४ तास कार्यरत आहे, सर्वसामान्य परिस्थितीच्या तुलनेत सध्या नेहमीपेक्षा दुप्पट धान्याची वाहतूक करण्यात येत आहे. विजनिर्मिती केद्रांना पुरेशा प्रमाणात कोळसाही पुरविला जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेने बेघर तसेच आर्थिकदृष्टा दुर्बलांसाठी अन्नछत्रेदेखील सुरू करण्यात आली आहेत.
पुढील १० दिवसांमध्ये २६०० विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्याद्वारे सुमारे ३६ लाख मजुर आंतरराज्य तर सुमारे १० लाख मजुर राज्यांतर्गत प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे राज्यांनी विनंती केल्यास त्यांच्यासाठी राज्यातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून रेल्वे सोडण्याची तयार करण्यात आली आहे. स्थलांतरीत मजुराप्रमाणेच सर्वसामान्य प्रवाशांसाठीदेखील आतापर्यंत विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून १ जून पासून २०० प्रवासी गाड्या धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन तसेच तिकीट खिडकी, आरक्षण एजंट आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकीटे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार स्थानकांवरील विक्री स्टॉलदेखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.
आरोग्य सुविधांमध्येही रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी
रेल्वेने आपल्या ५००० डब्यांचे रुपांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केले आहे आणि त्याद्वारे ८० हजार खाटांची सोय करण्यात आली आहे. रेल्वेच्या १७ इस्पितळांना कोव्हिड विशेष इस्पितळे म्हणून घोषित करण्यात आले असून त्यामध्ये ५ हजार खाटांची सोय आहे तर अन्य ३३ इस्पितळांचे काही ब्लॉक्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App