जेव्हा नेहरू म्हणतात, भगवान राम व श्रीकृष्णाने फक्त गुलामगिरी व गरीबी दिली..!

सागर कारंडे, नवी दिल्ली

 “देव…कसले देव? शिव, पार्वती, श्रीकृष्ण… तीन हजार वर्षे निघून गेली आणि आतापर्यंत आपल्याला काय मिळाले…? गुलामगिरी आणि गरीबी! सरासरी आयुष्मान फक्त साडे बावीस वर्षे आणि प्रति व्यक्ती प्रति दिन पाच पैसे एवढेच राष्ट्रीय उत्पन्न! आता राम आणि कृष्ण पुरे झाले…”

पं. जवाहरलाल नेहरू बोलत होते, “आपल्या संस्कृतीमधील या दैवतांचा मी अनादर करतो, असे नाही; पण आता देवाला हात जोडणे पुरेसे नाही… विशेषतः जेव्हा गरीबी आणि दैन्यावस्थाने आपल्याला घेरलेले असताना!”

“माझे स्वतःचे असे तत्वज्ञान आहे…अर्थातच (नैसर्गिक शक्ती) असे काही तरी आहेच…सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाशगंगा या अथांग विश्वात उगीचच काही लोंबकळत नाहीत…या विश्वाची स्वतःची अशी सुरेख लय (हार्मनी) आहे…प्रत्येकजण त्याच्याशी जोडला गेलाय…”

“मग देव हा काही फक्त (ग्रह, तारयांप्रमाणे) गणिती आकडेमोड आहे काय?”

“कदाचित होय…पण त्याची चिंता कशाला? कारण माणूस हा फक्त काही जैविक उत्पत्ती (बायोलाॅजिकल फिनाॅमेना) नाही. त्याची उत्पत्ती काही अपघाती नाही…मानव हा सर्वंकष आहे आणि तो वैश्विक सुरेल लयीशी जोडलाय…”

पं. नेहरूंचा हा संवाद आहे ‘पेंग्विन’ या ख्यातकीर्त प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या ‘द मीनिंग आॅफ इंडिया’ या पुस्तकातील आणि लेखक आहेत के. राजा राव. पद्मविभूषण, साहित्य अकादमी आणि कितीतरी आंतरराष्ट्रीय साहित्यिक सन्मानाचे मानकरी. इंग्रजी लेखन करणारे नामवंत भारतीय, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि ज्यांचा तत्वज्ञान विषयाचा गाढा अभ्यास होता, असे राजा राव. राव यांचे निधन जुलै २००६मध्ये झाले; पण त्यांनी लिहिलेल्या सहा निबंधांचा समावेश असलेल्या ‘द मीनिंग आॅफ इंडिया’ या पुस्तकाची नवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण राव आणि नेहरू यांच्यामध्ये जर्मनीतील वास्तव्यात झालेल्या संवादावर आधारित आहे. पत्नी कमला नेहरू यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना नेहरू हे पत्नीसह जर्मनीत काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी राव आणि त्यांची भेट झाली होती. त्या भेटीमध्ये वरील संवाद झाला होता.

के. राजा राव

“तुम्ही सांगताय ते तर सगळे तर वेदांत आहे, याकडे लक्ष वेधताच पं. नेहरू जरा चिडलेच,” अशी टिप्पणीही राव यांनी केली आहे.

राव हे तत्वज्ञानाचे अभ्यासक. तत्वज्ञानाची एक शाखा ‘मेटाफिजिक्स’चे ते गाढे अभ्यासक. रामायण, महाभारत, वेद-उपनिषधे, गीता, बौद्ध साहित्य यांच्यापासून ते कालिदास, दोस्तोव्हस्की यांच्यापर्यंत त्यांची विद्वत्ता मोठी. महात्मा गांधी, नेहरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचा नियमित संवाद असायचा. भारत हा फक्त भौगोलिक तुकड्यांचा देश नाही किंवा एका सांस्कृतिक धाग्याने बांधण्यापुरता मर्यादित नाही; तर त्यापेक्षा अधिक व्यापक, सर्वंकष आणि सखोल असल्याचे त्यांचे प्रतिपादन होते. द्वैत आणि अद्वैतवाद ही भारताने जगाला दिलेली सर्वाधिक मोठी देणगी असल्याचे त्यांचे प्रतिपादन होते.

नगरच्या तुरुंगात असताना १९४४ दरम्यान नेहरूंनी ‘द डिसकव्हरी आॅफ इंडिया’ हे गाजलेले पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर त्यांनी भरभरून लिहिलयं. अशा नेहरूंनी राव यांच्याशी संवाद साधताना मात्र जवळपास दैवत्व ही संकल्पना मोडीतच काढल्याचे दिसते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*