डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा मुख्य रोख असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उध्दव ठाकरे यांना व्यवस्थित घेरले आहे. ठाकरे हे जरी नवखे असले तरीही ते असंवेदनशील नक्कीच नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असंवेदनशील अशी रंगविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आता यश येताना दिसत आहे. पवारांनी वसंतदादांसारख्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता, त्या मानाने उध्दव ठाकरे तर अगदीच नवे आहेत..
युगंधर
“उध्दवजी, अभी नहीं तो कभी नहीं. आघाडी तोडण्याची हीच ती वेळ, ती वेळ न साधल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला उध्वस्त करतील. महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर राष्ट्रपती राजवटीशिवाय आता पर्याय नाही…”.
अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आता डॉ. स्वामी हे भाजपचे आहेत, म्हणून या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण डॉ. स्वामी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत, विशेष म्हणजे शिवसेनेसोबत भाजपने ताणू नये यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे भाजपचे असले तरी डॉ. स्वामी हे उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे हितचिंतकच आहेत. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महाराष्ट्रात आणि प्रामुख्यामने मुंबईत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी व्हेंटिलेटरवर गेली आहे आणि तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आता केविलवाणे भासू लागले आहे. आता परिस्थिती गंभीर आहेत, मात्र त्यातून मार्ग काढण्याऐवजी गलितगात्र होण्यातच मुख्यमंत्री धन्यता मानत असतील तर जनतेने कोणाकडे पहावे, हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात, मुख्यमंत्र्यांना असे गलितगात्र करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समाधान मिळते आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे आणि डॉ. स्वामी यांनी नेमका तोच मुद्दा आपल्या एका लेखात अधोरेखित केला आहे.
स्वामी म्हणतात, इतिहासात नजर टाकल्यास स्पष्ट होते की राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. आजही तेच घडत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या मर्जीने राजकारण करीत आहे आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उध्दव ठाकरे यांची जास्तीतजास्त बदनामी कशी होईल, याची काळजी घेत आहे.
त्यासाठी डॉ. स्वामी यांनी दिलेली उदाहरणे पाहता त्यात सत्यता असल्याचे स्पष्ट दिसते. स्वामी म्हणतात, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेचे प्राण वाचविण्यासाठी काम करीत असले तरी त्यांनी कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत. त्यांनी केवळ केंद्र सरकारच्या निर्देशांनुसारच काम करणे पसंत केले आहे. आता भारताच्या संघराज्य पध्दतीचा विचार करता राज्यातील जनतेला सुरक्षित वातावरण प्रदान करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्याचप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या पाहता त्याविषयीदेखील वेळीच उपाय करणे गरजेचे होते, मात्र टोपेंनी तसे काही केल्याचे आढळत नाही.
केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केल्यानंतर राज्यात त्याचे काटेकोपणे पालन करण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही अपयशी ठऱले आहेत. विशेषत धारावी आणि गोवंडी येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असतानाही तेथे टाळेंबंदीचे कसोशीने पालन करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे आरोग्य आणि गृहमंत्रालय सध्या पूर्णपणे भरकटले आहे. त्यामुळे दोन महत्वाचे प्रश्न निर्माण होतात, पहिला म्हणजे मुंबईची जबाबदारी केवळ महानगरपालिकेवरच आहे का आणि दुसरा म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी माहिती देत नाहीत का ?. दुसरीकडे राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अन्नधान्याचे सुरळीत वाटप आणि राज्यातील मजुर वर्गाचे प्रश्न सोडविण्याच अपयश आले आहे.
स्वामी यांनी मांडलेला सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका. ते म्हणतात, एकीकडे आपल्या संख्याबळाचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेसने आरोग्य आणि गृह ही दोन महत्वाची खाती आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. दुसरीकडे अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांचा लगाम आपल्या हाती रहावा यासाठी मुख्यमंत्रीपदाच्याच तोडीचे उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. त्यामुळे महत्वाची खाती आपल्याकडे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आता मनमानी कारभार करीत आहे, त्यामुळे जनतेच्या रागाचा सामना मात्र थेट मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे.
डॉ. स्वामी यांनी अगदी नेमक्या शब्दात राज्याच्या राजकारणाची स्थिती मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी असाच त्रास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना दिला होता. अर्थात पृथ्वीराजबाब धुर्त राजकारणी असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना व्यवस्थित ‘हाताळले’ होते. त्यातूनच मग पवारांनी चिडून मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय अशी हिणकस टिप्पणीही केली होती. असो.
डॉ. स्वामी यांचा मुख्य रोख असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना व्यवस्थित घेरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे जरी नवखे असले तरीही ते असंवेदनशील नक्कीच नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असंवेदनशील अशी रंगविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आता यश येताना दिसत आहे. त्यात पवारांनी वसंतदादांसारख्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, त्या मानाने उध्दव ठाकरे तर अगदीच नवे. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांना स्वत:चे राजकीय अस्तित्व आणि राज्यातील जनतेचे आरोग्य – भवितव्य सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून राजीनामा देऊन बाहेर पडावे आणि राज्यात राष्ट्रवती राजवट लागू करण्याचा मार्ग मोकळा करावा, हा डॉ. सुब्रमण्यम स्वामी याचा सल्ला अतिशय महत्वाचा ठरतो. कारण हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रावर ‘असंवेदनशील आणि अपयशी मुख्यमंत्री’ असा शिक्का बसणे हे मराठी जनतेला कधीही रुचणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App