मुंबईहून महाबळेश्वरला निसटायच्या नादात वाधवान बंधू सीबीआय, ईडीच्या जाळ्यात

विशेष  प्रतिनिधी

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील संशयित मुंबईतून निसटून महाबळेश्वरला गेले खरे पण लॉकडाऊन काळात संचारबंदीचे नियम तोडून प्रवास केल्याबद्दल क्वारंटाइन झाले आणि तेथून ते सीबीआय – ईडीच्या जाळ्यात अडकले. ईडीचे पथक कपिल आणि धीरज वाधवान यांना अटक करून मुंबईत येणार अाहे.
कपिल आणि धीरज वाधवान बंधूंवर विशेष कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट आहे. दोघे बंधू “फरार” असल्याने सीबीआय आणि ईडी त्यांच्या शोधात होते. राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे परवानगीचे पत्र घेऊन वाधवान बंधूंनी २३ जणांसह महाबळेश्वरचा प्रवास केला. ते महाबळेश्वरला बंगल्यावर पोचले. तेथील जागरूक नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी पाहिल्यावर पोलिसांत तक्रार केली. पोलिस तेथे दाखल झाल्यावर घोटाळ्यात अडकलेल्या वाधवान बंधूंनी प्रवास केल्याचे उघड झाले. पोलिसांनी ताबडतोब लॉकडाऊनचे आणि संचारबंदीचे नियम तोडल्याबद्दल सर्वजणांवर गुन्हा दाखल केला. सर्वांना क्वारंटाइन केले, अशी माहिती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. सीबीआय व ईडीच्या टीमने सातारा पोलिसांशी संपर्क साधून वाधवान बंधूंना ताब्यात घेण्याची व अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

  •  कपिल वाधवानवर ल्युटियन्स दिल्लीत एक बंगला खरेदी प्रकरणात संशयावरून ईडीने कारवाई नोटीस पाठविली आहे.
  •  सीबीआय देखील दोघांच्या शोधात आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते सतत जागा बदलत होते.

कोविड१९ चे लॉकडाऊन आहे. मी चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असे कपिल वाधवान याने सीबीआय ला वकिलामार्फत कळविले होते. पळून जाण्याचा प्रयत्नातच ते दोघेही सीबीआय आणि ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत.
येस बँकेने ३७०० कोटींची गुंतवणूक डीएचएफलच्या अल्प मुदतीच्या डिबेंचर्समध्ये केली होती. डीएचएफला बिल्डर लोन देण्यासाठी राणा कपूरला ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याचाही कपिल वाधवान वर आरोप आहे. दोघांचाही आर्थिक घोटाळा ६००० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा केंद्रीय तपास यंत्रणांचा संशय आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात