फडणवीसांजवळ कैफियत मांडणाऱ्या पोलिसावर राज्य सरकारचा दंडुका; दुसऱ्या टोकाला तडकाफडकी बदली!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘साहेब, आमच्याकडे पीपीई किटस नाहीत. मास्क नाहीत. सॅनिटायझर्स नाहीत… तुम्ही मुख्यमंत्री असता तर ही वेळ आमच्यावर आली नसती,’ अशी तक्रारवजा टिप्पणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ करणारे वाशिम जिल्ह्यातील पोलिस हवालदार संजय घुले यांच्यावर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशाने त्यांची जिल्हाच्या दुसरया टोकाला तडकाफडकी बदली केली आहे. राज्य सरकारने आकसबुदधीने केलेल्या या कारवाईबद्दल फडणवीस यांनी तीव्र टीका केली असून पोलिसांनी प्राथमिक सुविधा मागणे गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

फडणवीस हे नागपूरहून कारने मुंबईला चालले असताना वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा येथे ते भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते खंडेराव मुंडे यांच्या आग्रहाखातर काही मिनिटांसाठी थांबले होते. मालेगाव तालुक्यातील अडचणींची विचारपूस करीत होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी तिथे असलेला एक पोलिस अभावितपणे पुढे आला आणि आपली कैफियत सांगू लागला. ‘कामाचा प्रचंड ताण आहे, पण कीट नाही, मास्क नाही आणि सॅनिटायझर नाही… तुम्ही मुख्यमंत्री असता तर ही वेळ आमच्यावर आली नसती…,’ असे तो बोलून गेला. त्याच्याच एका सहकारयाने हा व्हीडीओ चित्रित केला होता आणि बघता बघता तो वायूवेगाने व्हायरल झाला. एका पोलिसाची ही टिप्पणी राज्य सरकारला चांगलीच झोंबली होती. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख हे वाशिम गेले आणि त्यांनी तातडीने हवालदार संजय घुले यांची दुसरया टोकाला बदली केली. या कारवाईची फडणवीसांनी दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.

या पत्रात फडणवीस म्हणतात की, “कोरोनाशी लढताना आपल्या पोलिस दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजवित आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील 2300 हून अधिक पोलिस जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे. घुले यांची सूडबुद्धीने वाशीम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज येथे बदली केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचे ठिकाण हे सुमारे १४० कि.मी. अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्‍या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना आहे.”

फडणवीस पुढे म्हणाले, “पोलिसांना प्राथमिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. मध्यंतरी नागपूर उच्च न्यायालयात एका प्रकरणात नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात नागपूर शहरातील ७००० पोलिसांना ७८० मास्क, ५ पीपीई किट, १४ एन ९५ मास्क आणि २१ सॅनेटायझर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले होते. एका शहराची ही अवस्था असताना अशाप्रकारच्या काळात अशा शिक्षा देणार्‍या बदल्या केल्या जाणार असतील, तर ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करावी आणि श्री संजय घुले यांना त्यांच्या मुळ जागी पुन्हा काम करण्याची अनुमती द्यावी.”

दीपक हाटे मृत्यूप्रकरण

योग्य काळजी न घेण्याच्या अनेक घटना निदर्शनास येत आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यातील हवालदार श्री दीपक हाटे यांना दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार दिल्यानंतर सुटी देण्यात आली आणि घरी परतल्यावर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अवस्थ झाली. रुग्णवाहिका मिळण्यासाठी त्यांनी दोन तास संघर्ष केला. पण, त्यांना कोणतीही रूग्णवाहिका मिळाली नाही आणि परिणामी चार तासातच त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसच संकटात

आतापर्यंत महाराष्ट्रात २३०० पोलिसांना चीनी व्हायरसची लागण झाली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पोलिसांना अनेक ठिकाणी दगडफेकीला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्रात जवळपास दगडफेकीच्या दोनशेहून अधिक घटना घडलेल्या आहेत.


केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्‍या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना आहे.

: देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री 


Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात