राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीत आपला पक्ष लोकसभा एवढ्या कमी जागा घेणार नाही, असे जाहीर करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला एकाच वेळी इशारा दिला, पण पवारांनी लोकसभेसारख्या कमी जागा घेतल्या नाहीत, तरी ते विधानसभा निवडणूक लढविण्याचा डबल डिजिट आकडा ओलांडू शकतील का??, असा सवाल तयार झाला आहे आणि हा सवाल तयार होण्यामागची एक नसून अनेक कारणे आहेत. Will sharad pawar able to cross double digit mark to fight maharashtra assembly elections??
एकतर लोकसभेसारखे आपण कमी जागा घेणार नाही, असे सांगून पवारांनी लोकसभा निवडणुकीपुरते तरी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी आपल्याला कमी जागा दिल्या किंबहुना कमी जागा घेणे भाग पडले, याची कबुली देऊन टाकली. पण त्या निमित्ताने महाविकास आघाडी टिकली, हे देखील सांगायला पवारांनी कमी केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती टिकवण्याचे श्रेय पवारांना गेले आणि ते श्रेय पवारांनी घेण्याला उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसने आक्षेप घेतला नाही.
पण प्रश्न त्या पलीकडचा आहे आणि तो सरळ सरळ आकड्यांच्या खेळांचा आहे. पवारांनी लोकसभेसाठी फक्त 10 जागा महाविकास आघाडी कडून घेतल्या, पण त्या 10 जागांवर उमेदवार उभे करताना देखील पवारांची पुरती दमछाक झाली. भाजप किंवा काँग्रेस एकीकडे 40-50 उमेदवारांची एकगठ्ठा यादी जाहीर करत असताना पवारांना महाराष्ट्रात आपल्या वाट्याला आलेल्या फक्त 10 जागांवर एकगठ्ठा उमेदवार जाहीर करता आले नाहीत. त्यांना 3 – 4 टप्प्यांमध्ये उमेदवार जाहीर करावे लागले. त्यासाठी “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी खेळी केली”, वगैरे बातम्या छापून आणाव्या लागल्या. त्यामुळे पवारांनी आपण कमी जागा घेणार नाही, असे जाहीररीत्या बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षात तेवढे उमेदवार उभे करणे वेगळे!!
यातला आकड्यांचा विषय बोलायचा झाला, तर पवारांनी लोकसभेच्या 10 जागांवर निवडणूक लढवली. याच निकषावर पवारांना महाविकास आघाडीत 60 जागा सहज मिळू शकतील, पण पवारांची च्या 60 जागांवरच थांबण्याची तयारी नाही, असे त्यांच्याच वक्तव्यातून उघड दिसते. याचा अर्थ पवारांना 60 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी कडून अपेक्षित आहे. विधानसभा मूळातच 288 मतदार संघाचे असल्याने महाविकास आघाडीत ॲडजस्टमेंट करणे सोपे जाईल, असे पवारांना वाटते.
पण समोर काँग्रेस आणि शिवसेना असे पवारांच्या पक्षाच्या तुलनेत दोन मोठे पक्ष आहेत, ज्या पक्षांनी पवारांना लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर ढकलून आपली पहिली दोन स्थाने पक्की केली होती. अर्थातच विधानसभा निवडणुकीत देखील जर पवार आपल्या पक्षासाठी कमी जागा घेणार नसतील, तरी ते ठाकरे आणि काँग्रेस यांना कितपत रेटा देऊ शकतील?? तो रेटा ठाकरे आणि काँग्रेस कितपत मानतील??, याविषयी शंकाच आहे. त्याशिवाय ठाकरे आणि काँग्रेस यांचा नजीकचा राजकीय इतिहास जरी पाहिला तरी महाराष्ट्र विधानसभेच्या 150 पेक्षा अधिक जागा लढविण्याची त्यांची कायमच तयारी राहिली आहे. त्या तुलनेत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना देखील झेप 120 – 130 च्या पलीकडे गेलेली नाही. म्हणजे मूळात पवारांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आकडाच जिथे जेमतेम ट्रिपल डिजिट गाठला आहे, तिथे पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे दुभंगला असताना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आपल्याबरोबर घेऊन गेले असताना पवारांच्या पक्षाची विधानसभा निवडणुका लढवण्याची ताकद उमेदवार संख्येत मुळात उरलीच किती आहे??, हा खरा सवाल आहे.
पवारांना लोकसभेच्या निवडणुकीत 10 जागा उमेदवार उभे करताना दमछाक झाली, तर विधानसभा निवडणुकीत 60 जागांवर आणि त्याही पलीकडे जाऊन पवारांच्या पक्षाला रेटून मिळाले तरी 120 जागांवर ते उमेदवार आणणार कुठून??, हा खरा सवाल आहे. पवारांच्या पक्षातली सगळी निवडणूकक्षम माणसे म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असणारी माणसे अजित पवार आपल्याबरोबर घेऊन गेलेत. लोकसभेत पवारांनी चतुराईने आपल्या पक्षाकडे कमी जागा घेऊन आपली राजकीय पंचाईत रोखण्याचा प्रयत्न केला, तरी निलेश लंकेंसारखा अजित पवारांचा आमदार फोडून पवारांना त्यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ घालावी लागली. याचा अर्थ पवारांना विधानसभा निवडणुकीतले पहिले 60 उमेदवार जाहीर करताना आणि उरलेले नंतरचे 60 उमेदवार जाहीर करताना अशीच दमछाक करावी लागेल का??, हा सवाल आहे. यासाठी पवारांना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून मनुष्यबळाचा इंधनपुरवठा होईल का आणि तो इंधनपुरवठा झालाच, तर तो पुरा पडेल का??, हा सर्वाधिक कळीचा सवाल आहे.
कारण लोकसभेमध्ये सारख्या कमी जागा घेणार नाही, अशी घोषणा करणे निराळे आणि प्रत्यक्ष जास्त जागा मिळाल्यानंतर त्याच्यावर आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करणे निराळे. या दोन भिन्न बाबी आहेत आणि त्या थेट आकड्यांशी संबंधित आहेत. तो आकडा पवार गाठू शकतील का आणि गाठल्यास तर तेवढ्या प्रमाणात निवडणूकक्षम म्हणजेच निवडणूक जिंकून येण्याची क्षमता असणारे उमेदवार पवारांना मिळतील का??, हा खरा सवाल आहे.
… की पवारांनी लोकसभेत 10 जागा जरूर लढविल्या, पण कॉन्सन्ट्रेशन बारामती, माढा आणि काही प्रमाणात बीड यांच्यावरच केले. तसेच पवार जास्त जागा घेण्याची हूल देऊन आपल्या विशिष्ट जागांवरच कॉन्सन्ट्रेट करतील का?? हा सवाल आहे आणि याचे उत्तर होकारार्थी असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App