शमीवरची शस्त्रे काढून दिल्लीश्वरांना ठोकले पाहिजे, अशी राणा भीमदेवी थाटाची भाषा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. हरकत नाही… ज्याची त्याची शमी आणि ज्याची त्याची शस्त्रे…!! पण या शमीवरची ही शस्त्रे काढून सामनाकार नेमके कोणाला ठोकणार आहेत??
काश्मीर मधले 370 कलम हटवून तेथे स्वातंत्र्याची नवी पहाट आणणाऱ्या सरकारला? देशाचे शैक्षणिक धोरण बदलून राष्ट्रीय प्रवाह मोकळा करणाऱ्या सरकारला? की देशात राजकीय विचारप्रणालीचा संपूर्ण सांधा बदलून सावरकरनिष्ठ आक्रमक संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरण यांचे अनुसरण करणाऱ्या सरकारला ठोकणार? हे प्रश्न विचारण्याची गरज तयार झाली आहे.
शेवटी शिवसेनाही हिंदुत्ववादी आहे. मग त्यांच्या हिंदुत्ववादात वर मांडलेले मुद्दे बसत नाहीत का? 370 हटविणारे, सर्जिकल स्ट्राइक करणारे, देशाला संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात सक्षम करणारे हिंदुत्व शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कक्षेत येत नाही का? की शिवसेनेचे हिंदुत्व “मातोश्री”तून निघून “वर्षा”वर पोहोचता – पोहोचता “सिल्वर ओक”वर विसर्जित झाले आहे?? आणि त्यातून फक्त सावरकर हे आमचे आदर्श होते आहेत आणि राहतील अशी तोंडी पोपटपंची करण्यापुरते उरले आहे…??!!
शमीवरची शस्त्रे काढून नेमके कोणाला ठोकायचे ठरले आहे?? आणि गांधीनगर अहमदाबाद मधून लोकशाही मार्गाने दिल्लीच्या सत्तेच्या किल्ल्या ताब्यात घेणारे दिल्लीश्वर कधी झाले? आणि ते जर “दिल्लीश्वर” झाले असतील तर मग १० जनपथमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले नेमके कोण आहेत?? की तिथे जाऊन महाराष्ट्र बंदवर चर्चा केली म्हणजे ते मराठी बाण्याचे प्रतीक ठरले? हिंदुत्वाचे प्रतीक ठरले?, शिवसेनेचे हिंदुत्व हे काय १० जनपथ भोवती वैचारिक गरबा आणि भोंडला खेळण्यापुरते उरले आहे काय? दिल्लीश्वरांना ठोकायचे म्हणजे नेमके काय करायचे?? कोणत्या मुद्द्यावरून ठोकायचे??, काही भान आहे का??
सामनाकारांनी मांडलेले अगदी शेतकरी आंदोलनापासून ते सध्याच्या वीज टंचाईपर्यंतचे सगळे मुद्दे गंभीर असतील. मतभेदांचेही असतील. त्यावर चर्चा, वादविवाद जरूर होऊ शकतात. अगदी देशाच्या संघराज्य व्यवस्थेपर्यंत चर्चा होऊ शकते. त्यामध्ये टोकाचे मतभेद व्यक्त होऊ शकतात. पण म्हणून एकदम तथाकथित दिल्लीश्वरांना शमीवरची शस्त्रे काढून ठोकायची भाषा??
शिवाय शिवसेना – भाजपमधले मतभेद महाराष्ट्रापुरते असतील. तेही फक्त सत्तेपुरते असतील. सत्तेतल्या वाट्यापुरते असतील. तिथे वाटाघाटी होऊ शकतात. ठोकाठोकीही होऊ शकते. चालू शकते… पण एकदम शमीवरची शस्त्रे काढून दिल्लीश्वरांना ठोकायची भाषा?? आपली शमी आहे का तेवढी उंच?? तिच्यावर आपण ठेवलेली शस्त्रे उरली आहेत का तेवढी प्रबळ?? की गेल्या दोन-अडीच वर्षात ती पूर्ण गंजून गेली आहेत…!! याचे भान ठेवायला नको का?? का ते भानही आता 10 जनपथ मध्ये जाऊन विसर्जित झाले आहे…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App