नाशिक : शरद पवारांच्या फक्त प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या गप्पा; प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससाठी जास्त सभा!!, असे चित्र महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान संपल्या बरोबर शरद पवारांनी देशातले प्रादेशिक पक्ष 4 जून नंतर काँग्रेसच्या आणखी जवळ जातील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकीत केले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. परंतु ते वक्तव्य प्रसिद्ध होण्याचे टायमिंग बारामती लोकसभेतील मतदान उरकून गेल्यानंतरचे ठेवले गेले. Sharad pawar may cheat over merger, but uddhav thackeray is more campaigning for Congress
पवारांच्या अपेक्षेनुसार त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून अजित पवारांपर्यंत सगळ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोशल मीडियात त्यावरून मीम्स तयार झाली. शरद पवारांना देशातला मोदींचा महाविजय आणि बारामतीतला आपला पराभव “दिसल्या”नेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा वापरली. त्यांच्या पक्षाबरोबरच उद्धव ठाकरेंचा पक्ष देखील लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे भाकीत देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आणि त्याचा वेगवेगळ्या सभांमध्ये पुनरुच्चार केला. भाजपच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचे रिपीटेशन केले.
पवारांनी एक प्रकारे भाजप आणि बाकीच्या सत्ताधारी पक्षांना आयते कोलित हातात दिले. त्यामुळे पवारांच्या पक्षाबरोबरच उद्धव ठाकरेंची शिवसेना अडचणीत आली.
आपल्या वक्तव्यावरून अपेक्षित अशी राजकीय धूळ उडल्यानंतर आज शरद पवारांनी त्या वक्तव्यावरून घुमजाव केले. आपण प्रादेशिक पक्ष फक्त 4 जून नंतर काँग्रेसच्या जवळ जातील. काँग्रेसबरोबर एकसंधतेने काम करू लागतील एवढेच म्हणालो होतो. विलीनीकरणा संदर्भात काही बोललो नव्हतो, असा दावा पवारांनी केला.
त्यामुळे आता स्वतः पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील की नाही, हा भाग अलहिदा, पण लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या 10 जागांवर लक्ष केंद्रित करताना काँग्रेस उमेदवारांचा क्वचितच प्रचार केला. पवारांनी जास्तीत जास्त प्रचार सभा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या 10 मतदारसंघांमध्येच घेतल्या. त्यातही प्रामुख्याने त्यांनी बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जास्त सभा घेण्यावर भर ठेवला.
त्या उलट उद्धव ठाकरेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या बाता बिलकुल केल्या नाहीत. त्यांनी आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राखलेच, पण काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यातही ते मागे राहिले नाहीत. कोल्हापूरच्या बदल्यात काँग्रेस कडून उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा खेचून घेतली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी मात्र काँग्रेसवर नाराजी न ठेवता अमरावती, सोलापूर, धुळे, पुणे, भंडारा आणि कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. आगामी काळात जालन्यातील काँग्रेस उमेदवारासाठी ते सभा घेण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार मराठी माध्यमांनी कायम चर्चेत ठेवले. परंतु, प्रत्यक्षात भाजप महायुती विरोधातले प्रखर आणि प्रामाणिक नेते म्हणून उद्धव ठाकरे हेच पुढे आले. काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच आपले स्थान पवारांपेक्षा बळकट केले. बाकी पवारांनी त्यांच्या खोलीतून उद्धव ठाकरेंना बाहेर काढल्याचे व्हिडिओ त्यांच्या “हितचिंतकांनी” जरी व्हायरल केले असले, तरी प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभा आणि पवारांनी घेतलेल्या सभा यामध्ये कमालीची तफावत दिसली.
पवारांनी फक्त काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या बाता मारल्या. त्यातही त्यांना बारामतीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव आणि देशातला मोदींचा प्रचंड विजय “दिसला”. त्या उलट उद्धव ठाकरेंनी पक्ष विलीनीकरणाच्या करण्याच्या कुठल्याही बाता केल्या नाहीत. पण काँग्रेसच्या उमेदवारांचा मात्र प्रचार करताना ते कुठेही मागे राहिले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे स्थान अधोरेखित होताना दिसले. अर्थात 4 जून 2024 नंतरच्या राजकीय परिस्थितीत तशीच राहील की त्यात मोठे बदल होतील??, याविषयी महाराष्ट्रात दाट संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App