गाडी गेली साईडिंगला, “आवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीतल्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!!

बारामतीत होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी 2 मार्चला शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोविंद बागेत दिलेल्या भोजनाच्या निमंत्रणाचे वर्णन, “गाडी गेली साईडिंगला, “अवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीच्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!! याच शब्दांनी करावे लागेल!! Sharad pawar invites CM and DyCMs for lunch in govindbaugh as an experiment to “save” supriya sule in baramati

मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या या खेळीचे वर्णन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती आणि कशी उच्च आहे, अशा सुंदर फुलोऱ्याच्या भाषेत केले आहे, पण त्या पलीकडेचे खरे “राजकीय इंगित” कोणीच समजावून सांगितले नाही, ते शीर्षकात उल्लेख केले आहे!!

बारामतीत 2 मार्च रोजीच्या नमो मेळाव्याचे आयोजक दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. अर्थातच त्या मेळाव्याच्या निमित्ताने ते बारामती सह पश्चिम महाराष्ट्रात आपले प्रचंड शक्तिप्रदर्शन करून घेणे अपेक्षित आहे. त्या कार्यक्रमाच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निंबाळकर आणि सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण दिले गेले आहे, पण एकेकाळच्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या किंबहुना त्यांच्याच विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकरच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण शरद पवारांना नाही. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवारांचे नावही नाही आणि हीच खरी पवारांना अस्वस्थ करणारी बाब ठरली आहे. पवारांची गाडी साईडिंगला टाकण्यात आली आहे.

आपल्याच एकेकाळच्या बालेकिल्ल्यात आपलीच गाडी साईडिंगला टाकण्यात आल्यावर पवारांसारखा मुरब्बी नेता अस्वस्थ झाला नाही, तरच नवल. पण म्हणून पवारांनी त्यासाठी कुठली आदळआपट केली नाही. त्यांनी राजकीय चतुराईने मार्ग काढत जो प्रयोग 2015 मध्ये बारामतीतच याच विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंड वर केला होता, तोच प्रयोग त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच ग्राउंड वर शिंदे + फडणवीसांवर केला आहे.



या प्रयोगाची कहाणी अशी :

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे मोदी सरकारला प्रचंड बहुमत मिळाले होते. किंबहुना मोदींची ती लाट असल्याचे सिद्ध झाले होते आणि त्या लाटेत बारामती मतदारसंघ वाहून जाता जाता राहिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन अवघे 3 महिने झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी अखंड आणि एकसंध होती. पण संपूर्ण राष्ट्रवादीच मोदी – फडणवीसांच्या “राजकीय स्कॅनर” खाली आली होती. शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा हे विषय त्यावेळी अतिशय ताजे होते. पवारांची बारामती खऱ्या अर्थाने “धोक्यात” आली होती. अशावेळी देखील पवारांनी आदळपट न करता बारामतीतच एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच बारामतीतल्या कार्यक्रमात निमंत्रण दिले आणि मोदींनी ते राजकीय खिलाडू वृत्तीने स्वीकारत 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामतीतल्या कार्यक्रमाला हजर राहिले. तो विरोधकांच्या दृष्टीने राजकीय भूकंप होता, पण मूळ राजकीय भूकंपापासून त्यावेळी बारामती “वाचली” होती.

मोदी त्याच कार्यक्रमात मोदींना पवारांना आपला “राजकीय गुरु” म्हणाले. मोदींच्या त्या वक्तव्यात त्यांची स्वतःची काही कॅल्क्युलेशन्स होती, पण त्यामुळे अर्थातच त्यावेळच्या भविष्यकाळात आणि आत्ताच्या भूतकाळात भाजपचे पर्सेपन्शन लेव्हलवर बऱ्यापैकी नुकसान झाले, पण मोदींच्या त्या वक्तव्याचा पवारांच्या राष्ट्रवादीसाठी “राजकीय भांडवल” म्हणून फार मोठा उपयोग झाला. अगदी पवारांचे नातू रोहित पवार काल-परवापर्यंत त्या भांडवलाचा उपयोग करून भाजपवर शरसंधान साधत राहिले होते.

मोदी फक्त 2015 मध्येच बारामतीत येऊन गेले. त्यानंतर ते बारामतीकडे फिरकले देखील नाहीत, पण 2015 ते 2024 पवारांची बारामती त्या एका दौऱ्याने “वाचवली” होती. 2024 मध्ये पवारांची बारामती पुन्हा एकदा “धोक्यात” आली आहे. कारण खुद्द त्यांचा पुतण्या त्यांच्यापासून फुटून निघून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसला आहे. त्यामुळे पवारांच्या कन्येच्या राजकीय भवितव्याला घरातूनच सुरुंग लागला आहे, आणि तो देखील महाराष्ट्राच्या इतर राजकीय भूमीवरून नव्हे, तर खुद्द पवारांचा मानल्या गेलेल्या बालेकिल्ल्यातच म्हणजे बारामतीतच पवारांच्या कन्येचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. ही पवारांसाठी खरी “अलार्म बेल” आहे.

आता पवारांना त्यांचे “राजकीय शिष्य” विचारण्याची शक्यता नाही. ते पवारांसाठी बारामती “वाचवायला” येण्याची शक्यता नाही. अशावेळी बारामती वाचवण्यासाठी दुसरी कुठली खेळी करायची म्हणून आणि आपली साईडिंगला गेलेली गाडी अजूनही रुळावरच आहे असे दाखवायचे म्हणून पवारांनी 2015 चा बारामतीतच केलेला “मोदी प्रयोग” 2024 मध्ये शिंदे + फडणवीसांवर चालविला आहे.

अर्थात पवार जेवढे राजकारणात तरबेज आहेत, तेवढे जरी अजून शिंदे + फडणवीस तरबेज नसले, तरी एकूण राजकारणाचा पोतच आता एवढा बदलला आहे की पवारांच्या अशा कुठल्याही खेळ्यांनी बारामती “वाचण्याची” शक्यता नाही.

साईडिंगला गेलेली गाडी रुळावर येण्याची शक्यता नाही

शिंदे + फडणवीस एखाद्यावेळी पवारांच्या घरी गोविंद बागेत जातीलही, त्यांचा पाहुणचार घेतीलही, पण म्हणून त्यांच्या राजकीय भूमिकेत फार बदल करून ते सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य बारामतीत “वाचवतील” ही शक्यता फार कमी आहे. किंबहुना पवारांची देखील साईडिंगला गेलेली गाडी खऱ्या अर्थाने पुन्हा रुळावर येईल ही शक्यता देखील धूसरच आहे. बाकी महाराष्ट्राची संस्कृती + सभ्यता वगैरे भाषेचा फुलोरा माध्यमांमध्ये फुलत राहील. त्यातून “पवारनिष्ठा” दाखवताही येईल, पण भाषेच्या फुलोऱ्यापलीकडचा वास्तव निखारा मात्र दिसणार नाही. तो वास्तववादी निखारा हाच आहे, की पवारांची गाडी साईडिंगला गेली आहे. त्यामुळेच शिंदे + फडणवीसंना निमंत्रण देऊन त्यांच्यावर 2024 मध्ये 2015 चा “मोदी प्रयोग” केला, तरी साईडिंगला गेलेली गाडी रुळावर येण्याची शक्यता नाही. शरद पवारांची बारामती सुप्रिया सुळे यांच्यासाठी “वाचविली” जाण्याचीही शक्यता नाही!!

Sharad pawar invites CM and DyCMs for lunch in govindbaugh as an experiment to “save” supriya sule in baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात