“चौथा पक्ष” खोट्या नॅरेटिव्हला चोख प्रत्युत्तर नसणे हा संघ + भाजपचा राजकीय अनुवांशिक जुनाट दोष!!

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि सलग तिसऱ्या विजयामध्ये भाजपने आपले स्वबळावरचे बहुमत गमावले. भाजपच्या या “कथित” पराभवाची वेगवेगळे नेते आणि माध्यमे वैविध्यपूर्ण कारणमीमांसा करत आहेत, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कारणमीमांसा केली आहे, ती अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे, किंबहुना जास्त सखोल आणि बोचणारी आहे. RSS and BJP always inhabitanty fallen short of given befitting reply to false narratives!!

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचे निर्वहन करताना महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व केले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे सगळे ऐकले. मुख्यमंत्री पदावर हक्क असताना केवळ सर्वोच्च नेतृत्वाने सांगितले ती पक्षशिस्त मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य या नात्याने तिकीट वाटपात सहभाग घेतला. परंतु, राज्यातले सर्व निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने जसे घेतले, ते तसे सगळे स्वीकारले आणि ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्या अनपेक्षित अपयशाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली. यासाठी देवेंद्र फडणवीसांना 100 पैकी 100 गुण दिले पाहिजेत.

निर्णय केंद्रीय नेतृत्वाचेच

वास्तविक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपच्या महायुतीत जोडून घेणे, हा एकट्या देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय नव्हता. त्याला निश्चित स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पूर्ण आशीर्वाद होता. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सोडून भाजप बरोबर येणे ही नैसर्गिक युती होती, जी पाण्यात काठी मारून उद्धव ठाकरेंनी तोडली होती. ती एकनाथ शिंदेंनी जोडली, असे नॅरेटिव्ह महाराष्ट्रात तयार झाले, पण अजित पवारांना महायुतीत जोडून घेणे हा निर्णय महाराष्ट्रात भाजप समर्थकांना रुचणार नाही याची जाणीव असूनही मोदी + शाह यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा “इनपुट” असेलही, पण म्हणून भाजपचे मतदार हे मोदी + शाह किंवा फडणवीस यांचे “राजकीय गुलाम” नव्हेत की, त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य करावा. त्यामुळे भाजपच्या मतदारांनी काही विशिष्ट प्रमाणात भाजपलाच झटका दिला असल्यास, त्यात नवल काही नाही!!

पण त्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या अनपेक्षित अपयशाची जी कारणमीमांसा केली आहे, त्यामध्ये “चौथा पक्ष” म्हणून ज्या खोट्या नॅरेटिव्हचा उल्लेख केला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपला 400 पार यासाठी जायचेय, कारण त्यांना देशाची राज्यघटना बदलायची आहे. देशातले आरक्षण संपवायचे आहे. अल्पसंख्याकांच्या अधिकाऱ्यांना धक्का लावायचा आहे, हे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी चालविले. ते अगदी घराघरापर्यंत पोहोचविले होते. (हे निकालानंतर सिद्ध झाले.)

पण मूळात विरोधकांची खोटा नॅरेटिव्ह तयार करण्याची आणि तो महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशातल्या घराघरांमध्ये पोहोचवण्याची घटना फक्त 2024 मध्येच घडली आहे का??, त्याआधी भाजपच्या विरोधकांनी असे खोटे नॅरेटिव्ह कधी चालवलेच नाहीत का?? ते जेव्हा तसे खोटे नॅरेटिव्ह चालवत होते, त्यावेळी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांनी असे कोणते खरे नॅरेटिव्ह चालवले, की ज्यामुळे खोट्या नॅरेटिव्हला तोडीस तोड प्रत्युत्तर मिळेल??, या गंभीर सवालाचा विचार केला, तर काँग्रेस आणि बाकीचे विरोधक आत्तापर्यंत तयार करत असलेल्या खोट्या नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात संघ आणि भाजप तोकडे पडल्याचेच दिसते.



फार जुन्या इतिहासात शिरण्याची गरज नाही. पण 1980 च्या दशकात जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये करताना भाजपला “गांधीवादी समाजवाद” नावाचे आपल्या मूळ तत्त्वज्ञानाच्या विरोधातले आवरण घ्यावेच लागले होते आणि त्या आवरणाचा लाभ होण्याऐवजी तोटा झाला. त्या उलट 1985 च्या निवडणुकांमध्ये ज्यावेळी दोनच खासदार निवडून आले. त्यानंतर मात्र राम जन्मभूमी आंदोलनासाठी हिंदुत्ववादी आंदोलन सुरू करून भाजपला पुन्हा उर्जित अवस्था आणावी लागली, पण यामध्ये तब्बल 10 वर्षे निघून गेली होती!!

या पलीकडे जाऊन फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला, तर 1999, 2004, 2009 या सलग तीन निवडणुकांमध्ये शरद पवार आणि काँग्रेस यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या हल्ल्याच्या वेळी जे नॅरेटिव्ह तयार केले होते, त्याला सलग तीन निवडणुकांमध्ये भाजप किंवा तत्कालीन शिवसेनेला परिणामकारक प्रत्युत्तर देता आले नव्हते, तेव्हा तर गोपीनाथ मुंडे हयात होते. त्यातल्या त्यात परिणामकारक उत्तर बाळासाहेब ठाकरे देऊ शकले होते. पण माध्यमांमधून स्वतःचा सामाजिक नॅरेटिव्ह चालवून पवार आणि काँग्रेसवर भाजपला तेव्हाही मात करता आली नव्हती. त्यासाठी 2014 उजाडावे लागले. त्यावेळी देशात काँग्रेस विरुद्ध एवढा प्रचंड संताप होता की, त्याचा सगळा लाभ मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला झाला. भाजपने त्याचा लाभ संघटनात्मक पातळीवर मजबुतीकरण करण्यासाठी जरूर करून घेतला. त्यावेळी मोदींच्या वैयक्तिक करिष्म्यासह विकासाचे आणि हिंदुत्वाचे नॅरेटिव्ह निश्चित प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे विशिष्ट मार्क मोदी + भाजप यांना दिलेच पाहिजेत. ते नाकारण्याचे कारण नाही.

पण प्रश्न त्या पलीकडचा आहे, तो म्हणजे सातत्याने विरोधक जी काही खोटी नॅरेटिव्ह तयार करतात, ती राजकीय नॅरेटिव्ह पेक्षा सामाजिक नॅरेटिव्ह असतात. आरक्षणाचा मुद्दा, एखाद्या जाती विरोधात घेतलेली भूमिका किंवा अगदी शेठजी – भटजींचा पक्ष म्हणून हिणवणारी विरोधकांची भूमिका, या मुद्द्यांवर भाजप किंबहुना संघाला खऱ्या अर्थाने कधीही विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर देता आले नाही!!

 मोदींच्या मुलाखती काँग्रेसनिष्ठ माध्यमांना

त्याचे माध्यमांमधले उदाहरण पाहिले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेवढ्या म्हणून माध्यमांना मुलाखती दिल्या, त्यातली महाराष्ट्राची माध्यमे पाहिली, तर लोकमत, सकाळ, दिव्य मराठी या माध्यम समूहांना त्यांनी मुलाखती दिल्या. ही सगळी माध्यमे काँग्रेसनिष्ठ माध्यमे आहेत. त्यांचे सामाजिक आणि राजकीय नॅरेटिव्ह थेट मोदी + भाजप आणि संघ विरोधातले आहे, तरी देखील मोदींना याच माध्यमांना मुलाखती देणे भाग पडले. ज्यावेळी मोदी या माध्यमांना मुलाखती देत होते, नेमक्या त्याच वेळी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदांमध्ये ते माध्यम प्रतिनिधींना “गोदी मीडिया” म्हणून हिणवत होते. त्यावेळी कुठल्याही माध्यम प्रतिनिधीने मोदी नेमके कोणाला मुलाखती देताहेत आणि ती माध्यमे नेमकी कुणाची आहेत??, असा उलटा सवाल राहुल गांधींना विचारला नाही. पण त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसनिष्ठ आणि “पवार बुद्धी”च्या माध्यमांची वस्तुस्थिती लपत नाही!!, ही विसंगती महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी जनतेसमोर जोरकसपणे प्रचार करून आणली नाही.

 संघाला माध्यम उभेच करता आले नाही

पण त्यापलीकडे या सगळ्याचा विचार केला तर त्याचा नेमका अर्थ काय सापडतो??, तर याचा नेमका अर्थ हा की, संघ आणि भाजपला संघटनात्मक पातळीवर महाराष्ट्रात विशिष्ट मजबुतीकरण करता आले. परंतु माध्यमांमध्ये आपला पुरेसा प्रभाव निर्माण करता आला नाही. किंबहुना संघाला तर संपूर्ण राष्ट्रव्यापी संघटना उभारून देखील स्वतःचे माध्यम विकसितच करता आले नाही. माध्यमांपासून फटकून राहणे, आपली कार्यपद्धती + कार्यशैली माध्यमांपासून लपवून ठेवणे यातच संघ नेतृत्वाने इतिकर्तव्यता मानली. हातात होते ते, माध्यम हातचे घालविणे यापलीकडे संघाच्या धुरीणांना फारसे काही करता आले नाही, ही अधोरेखित करण्याइतपत बोचणारी वस्तुस्थिती आहे!!… अन्यथा संपूर्ण राष्ट्रभर पसरलेल्या प्रचंड संघटनेचे माध्यमांचे प्रभावी जाळे उभे राहणे अवघड नव्हते.

 व्यक्तिगत नव्हे, तर राजकीय सामाजिक दोष

विरोधक खोटे नॅरेटिव्ह तयार करणारच, त्यांची – त्यांची माध्यमे ते विकसित करणारच, त्यात उलट्या-पालट्या कोलांट्या उड्या ते मारणारच हे गृहीत धरून संघासारख्या जबाबदार संघटनेला आणि भाजप सारख्या जबाबदार मोठ्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचे प्रभावशाली माध्यम तयार करावे लागेल, हे लक्षात येत नसेल, असे मानणे चूक ठरेल. पण मग प्रत्यक्ष जमिनीवरची वस्तुस्थिती अशीच दिसते, की भाजपच्या किंवा संघाच्या हातात आजतरी स्वतःचे प्रभावशाली माध्यम नाही, की जे विरोधकांच्या कोणत्याही खोट्या नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर देऊ शकेल!!

म्हणून मग मोदींना काँग्रेसनिष्ठ माध्यमांना मुलाखती द्याव्या लागतात आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या राज्य पातळीवरच्या नेत्याला “चौथा पक्ष” खोट्या नॅरेटिव्हला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकलो नाही, असे म्हणावे लागते. हा फडणवीसांचा वैयक्तिक नव्हे, तर संघ + भाजपचा राजकीय अनुवांशिक जुनाट दोष आहे!!, तो दूर करण्यासाठी माध्यमांपासून फटकून राहण्याच्या दूषित दृष्टिकोनात अमुलाग्र बदल करण्याची संघ नेतृत्वाला आणि संघ प्रवृत्तीला गरज आहे!!

RSS and BJP always inhabitanty fallen short of given befitting reply to false narratives!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात