नाशिक : काळ्या फिती लावून पावसात भिजले; महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करताना फुटले!!, असे आज महाराष्ट्र बंदच्या ऐवजी राज्यात राजकारण रंगले.
त्याचे झाले असे :
बदलापूर मधील मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद करायचे ठरवले होते. पण मुंबई हायकोर्टाने कायद्याचा दणका देऊन महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद गुंडाळून टाकला. इतकेच नाही, तर कुणी जोर जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे आदेश हायकोर्टाने शिंदे – फडणवीस सरकारला दिले. महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने शिंदे – फडणवीस सरकारच्या हातामध्ये कठोर कायदेशीर कारवाईचे आयते हत्यार हातात आले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना बॅक फुटवर जावे लागले. शरद पवारांनी त्यातली राजकीय मेख ओळखल्यामुळे ते पहिल्यांदा माघारी फिरले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र बंद मधून अंग काढून घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एकाकी पडले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फरफट
परंतु तरी देखील त्यांनी आम्ही आंदोलन करणारच अशी जाहीर भूमिका घेऊन आपण एकटे म्हणजेच आपली शिवसेनाच आंदोलनात पुढाकार घेईल, असे दाखवून दिले. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमागे फरफट झाली. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनाही आंदोलन करावे लागले. अन्यथा जे काही आंदोलन झाले, ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे झाले, असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले असते.
त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांनी आंदोलने केली. त्यांचे सगळे नेते आंदोलनामध्ये पावसात भिजले. त्यावेळी सगळ्यांनी तोंडाला काळे मास्क आणि दंडाला काळ्याफिती लावल्या. पण हे सगळे घडले, वेगवेगळ्या शहरांमध्ये. आघाडीचे कुठलेच बडे नेते आंदोलनात एकत्र आले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन समोरच्या रस्त्यावर पावसात भिजून काळ्या फिती लावून आंदोलन केले. शरद पवारांनी पुण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी काळ्या फिती आणि तोंडाला काळा मास्क लावून आंदोलन केले, तर बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात आंदोलन केले.
जनतेपेक्षा नेत्यांच्या समर्थकांचेच आंदोलन
वास्तविक महाराष्ट्र बंदचा विषय हायकोर्टाने मिटवल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते कुठलेही एका शहरात मजबुतीने एकत्र आले असते, तर ते जनतेचे मोठे आंदोलन उभे करू शकले असते. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच जनतेतले काही घटक पावसात काही वेळ भिजलेही असते. परंतु महाविकास आघाडीच्याच नेत्यांनी आंदोलन करण्यासाठी वेगवेगळे शहरे निवडली. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांचेच निवडक समर्थक आंदोलनामध्ये जमले. त्यांची संख्या फारच कमी भरली. सर्वसामान्य जनतेमधल्या घटकांचा त्या आंदोलनाशी काही संबंध देखील आला नाही.
मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरात आंदोलने झाली. महाविकास आघाडीचे बडे नेते आणि काही स्थानिक नेते पावसात भिजले. या नेत्यांनी भाषणे केली. त्याच्या नेहमीप्रमाणे “ठाकरे, पवार संतापले”, सुप्रिया सुळे कडाडल्या” वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी झळकविल्या. यापलीकडे जाऊन बदलापूर सारख्या घटनेच्या गांभीर्याच्या आणि त्याबद्दल महाविकास आघाडीने एकत्र कुठली कठोर भूमिका जाहीर केल्याच्या बातम्या येऊ शकल्या नाहीत. कारण महाविकास आघाडीने एकजूट दाखवून तशी भूमिका जाहीर केले नाही. त्यांनी एकत्र आंदोलनही केले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more