नाशिक : Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या तोंडी जास्तीत जास्त पाडण्याची भाषा सुरू आहे. ते अधून मधून निवडणूक लढविण्याच्या गोष्टी करतात. परंतु, जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मागे हात धुऊन लागत त्यांचे उमेदवार पाडायची भाषा करतात. मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या राजकारणात आणि वक्तव्यात विलक्षण साम्य आढळते. Manoj jarange in third front, dengours for maratha reservation agitation
पण त्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्रातल्या तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची चर्चा सुरू झालेली आहे, त्यामागचे राजकीय इंगित निश्चित वेगळे दिसून येत आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची चर्चा कोल्हापूरचे राष्ट्रपती नियुक्त माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केली. त्यांनी मनोज जरांगे, बच्चू कडू वगैरे नेत्यांची चर्चा करून महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ शकते, याचे सूतोवाच केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर पूर्वी सुसंस्कृत होता. परंतु, तो आता घसरला. त्यामुळे पुन्हा एकदा तो स्तर सुसंस्कृत करण्यासाठी तिसरी आघाडी करायची भाषा संभाजीराजेंनी वापरली आणि त्यामध्ये मनोज जरांगे, बच्चू कडू वगैरे नेत्यांचा समावेश करून घेतला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांचे नेतृत्व समोर आले आणि त्यांना फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बहुतेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. मनोज जरांगेंना कोणताही राजकीय आगापिछा नसल्याने ते राजकीय मिसाईल नेमके कोणत्या दिशेने जाणार आणि कुणाचा घात करणार, याचा सुरुवातीला तरी कोणालाच थांगपत्ता लागला नाही. परंतु मनोज जरांगे यांची भाषा जसजशी शरद पवारांच्या राजकारणाच्या जवळ जायला लागली, तसतसा मनोज जरांगे यांच्या राजकीय डावपेचांचा खुलासा व्हायला लागला. त्यांचे आणि राजेश टोपे यांचे संबंध उघड झाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा संघटनांनी सर्वपक्षीय नेत्यांवर बहिष्कार घातला, पण त्यातून रोहित पवारांसारख्या शरद पवारांच्या जवळच्या नेत्याला वगळले यातून जरांगे आणि पवार यांच्यातले छुपे संबंध उघड्यावर आले.
संभाजीराजे देखील सुरुवातीला स्वराज्य संघटनेची भाषा बोलत होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांनी काँग्रेसचे तिकीट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी शाहू महाराजांचा प्रचार केला. त्यावेळी स्वराज्य संघटना त्यांनी बाजूला ठेवली.
Rajnath Singh : ‘अफजल गुरूला फाशी नाहीतर काय हार घालायचा होता?’
पटावरचा वेगळा “डाव”
पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतरच्या समीकरणाचा अंदाज घेत महाराष्ट्राच्या पटावर वेगळाच “डाव” सुरू झाल्याचे दिसून येते. संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली तिसरी आघाडी हा त्याचाच एक घटक आहे. किंबहुना त्या पटावरचा एक “डाव” असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी कधीही यशस्वी झालेली नाही. दोन मुख्य प्रवाहांच्या संघर्षात तिसऱ्या आघाडीला थोडेफार यश मिळायचे आणि ते कुठल्यातरी एका संघटनेला पूरक राहायचे, एवढ्याच स्वरूपात तिसऱ्या आघाडीचे राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात राहिले. किंबहुना तिसऱ्या आघाडीतले जुन्या काळातले कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष वगैरे पक्ष अस्तित्वहीन झाले. आज जेव्हा तिसऱ्या आघाडीच्या चर्चेमध्ये मनोज जरांगेंचे नाव अग्रक्रमाने पुढे येते, तेव्हा त्यांचे राजकीय भवितव्य तिसऱ्या आघाडीशी जोडून ते धूसरच असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित होते.
मराठा आंदोलन गुंडाळण्याची भीती
मनोज जरांगे यांना मिळालेल्या पाठिंब्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा आणि निवडणुकीनंतर पवारांच्या कह्यात राहणारी कोणत्याही स्वरूपाच्या महाविकास आघाडीची सत्ता आली, तर तिसऱ्या आघाडीच्या धूसर भवितव्याप्रमाणे मनोज जरांगे यांचे नेतृत्वही धूसर करून टाकायचे. किंबहुना त्यानिमित्ताने मराठा आरक्षण आंदोलनाचे भवितव्य महाराष्ट्रातल्या जुन्या तिसऱ्या आघाडी प्रमाणे गुंडाळून टाकायचे, हा तर “डाव” खेळला जात नाही ना!!, याची दाट शंका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचे राजकारण फारसे यशस्वी होत नाही. त्या आघाडीचा वापर करून तिला गुंडाळून टाकले जाते, या इतिहासाची त्याला साक्ष आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more