स्वतःच्या अपयशाची खापरे आक्रस्ताळ्या भाषेत दुसऱ्यावर फोडली तर फारतर माध्यमांच्या हेडलाईनी होतीत. पण त्यातून स्वतःच्या पक्षाच्या पडझडीवर आणि प्रतिमाहानीवर खरा उपाय सापडू शकणार नाही. त्यासाठी ममता आणि शिवसेनेने मूळ आक्रमक स्वभावाला मुरड घालण्याची गरज नाही, पण आक्रस्ताळेपणा नक्की कमी करावा लागेल. गुस्सा अकल को खा जाता है ही म्हण लक्षात घेऊन वागावे लागले. म्हणजे त्यांच्या राजकीय दुखण्यावर त्यांची त्यांनाच उपाययोजना सापडू शकेल.
विनायक ढेरे
“खापरफोडे” ही आता नवीन राजकीय संज्ञा आता बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रूजू पाहतीय. राजकारणातली ही सवय जुनीच आहे. पण संज्ञा नव्याने रूजू पाहतीय. आता हेच पाहा ना… बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेस पक्ष फुटतोय मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आणि त्याचे खापर फोडले जातेय भाजपवर आणि ओवैसींवर. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचा निर्णय दिला मुंबई उच्च न्यायालयाने. त्यावरून देखील खापर फोडले जातेय भाजप – केंद्र सरकार आणि न्यायालयावर. दोन्हीकडे राजकीय साम्यस्थळ विलक्षण आहे… कारण या दोन्ही पक्षांचे नेतृत्व स्वतःला अनुक्रमे स्वयंघोषित “बंगाल” आणि “महाराष्ट्र” समजतात. mamata banerjee and uddhav thackeray targets bjp but fails miserably
म्हणजे ममता बॅनर्जींवर किंवा त्यांच्या कारभारावर टीका झाली की त्या तिला बंगालवरची आणि माँ, माटी, मानुषवरची टीका असे त्या समजतात… आणि इकडे शिवसेनेवर किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – आदित्य ठाकरे यांच्यावर टीका झाली की लगेच तिला महाराष्ट्रव्यापी स्वरूप देण्यात येते. जणू काही हे नेते आणि पक्ष दोन्ही सोडून कोणी बंगाल अथवा महाराष्ट्रात राहातच नाही. त्यांचे आणखी एक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही नेत्यांची आणि पक्षांची ओळख आक्रमक म्हणून असली तरी त्यांचे रूपांतर आता आक्रस्ताळेपणात झालेले दिसते आहे. विशेषतः बंगालमध्ये. mamata banerjee and uddhav thackeray targets bjp but fails miserably
बंगालच्या मध्य भागात प्रभाव असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिपद, आमदारपद सोडले. ममता सरकारच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्व नाही. एककल्ली कारभार वगैरे आरोप करून त्यांनी राजकीय त्याग केला. त्यांच्या पाठोपाठ पाच स्थानिक नेत्यांनी देखील तृणमूळला रामराम ठोकला आणि त्यांच्या संबंधित भागांमध्ये स्वतंत्र समित्या स्थापन करून कामही सुरू केले. ही दिशा कदाचित सुवेंदूंच्या स्वतंत्र प्रादेशिक पक्षाची असू शकते. पण त्याचे खापर ममता गोटातून भाजपवर फोडण्यात आले. भाजपवर खापर फोडायला काहीच हरकत नाही. सुवेंदूंच्या राजीनाम्यामागे भाजपची राजकीय खेळी असण्याचे नाकारायचेही कारण नाही. पण त्या खेळीला ममता बळी कशा पडल्या किंवा पडताहेत, हे खुद्द त्यांनीच समजून घेण्याची गरज आहे.
तृणमूळ काँग्रेस फुटण्याची कारणे पक्षाबाहेर कमी आणि पक्षातच किंबहुना ममतांच्या एककल्ली स्वभावातच जास्त आहेत, असे पक्ष सोडणारे नेतेच जेव्हा बोलतात, तेव्हा त्याकडे बाकीच्यांनी नव्हे, तर दस्तुरखुद्द ममतांनीच लक्ष देण्याची गरज निर्माण होते. आणि तसे लक्ष देण्यापेक्षा ममता आजही भाजप आणि ओवैसींवर “खापरफोडेगिरी” करत फिरताहेत. त्यातून त्यांच्या आक्रस्ताळ्या वक्तव्यांना प्रसिद्धी जरूर मिळेल पण त्यातून तृणमूळ फुटायची प्रक्रिया थांबणार नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे.
जे ममतांचे बंगालमध्ये तेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे. त्यांनी म्हणजे शिवसेनेने स्वतःला “महाराष्ट्र” समजले, म्हणून ते आणि फक्त तेच म्हणजे “महाराष्ट्र” असे होत नाहीत. संजय राऊतांकरवी उच्च न्यायालयावर शेरेबाजी करून मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळेल पण हट्टाने आरेतून कांजूरमार्गला नेलेल्या मेट्रो कारशेडचे काम सुरू करता येणार नाही.
महाराष्ट्र विधिमंडळात आधी राणा भीमदेवी थाटाची भाषणे करून अवघ्या १२ तासांमध्ये उच्च न्यायालयात लेखी माघार घ्यावी लागली यातच ठाकरे – पवार सरकारची खऱ्या पॉवरचा “फ्यूज” उडाल्याचे कळले. आता उच्च न्यायालयाने कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याच्या निर्णयावर कितीही राजकीय शेरेबाजी केली. भाजपवर आणि न्यायालयावर ते विकासविरोधी असल्याचे खापर फोडले तरी ते उपयोगाचे ठरणार नाही. मराठी माध्यमांनी संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया वगैरे हेडिंग देऊन बातम्या चालविल्या तरी त्यातले राजकीय वैफल्य आणि त्या वैफल्यातून आलेला राजकीय आक्रस्ताळेपणा लपायचा राहणार नाही.
या अर्थाने ममता आणि शिवसेना फक्त “खापरफोडे” ठरले आहेत. पण ती खापरे दुसऱ्या पक्षावर किंवा न्यायालयावर फुटण्याऐवजी स्वतःच्याच तोंडावर फुटताना दिसत आहेत. हे होऊ द्यायचे नसेल, तर स्वतःच्या आक्रमक स्वभावाला मुरड घालण्याची गरज नाही, पण त्याचे रूपांतर आक्रस्ताळेपणात झाल्याचे मान्य करून तो कमी करावा लागले म्हणजे मग स्वतःतल्या मूलभूत उणिवा दिसून त्यावर खऱ्या अर्थाने दोन्ही नेत्यांना आणि पक्षांना भाजपशी लढण्याच्या खऱ्या उपाययोजना सापडू शकतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App