कुठल्याही नव्या प्रयोगाची नव्हे, तर आधीच करून ठेवलेले प्रयोग निस्तरण्याची आणि प्रस्थापितांना अधिक प्रस्थापित करणारी निवडणूक असेच महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे वर्णन करावे लागेल.
– प्रयोगशील भाजप
वास्तविक मोदी – शाहांच्या नेतृत्वाखालचा भाजप राजकीय प्रयोग करण्यासाठी माहीर मानला जातो. मोठ मोठ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये 50 – 60 आमदारांची तिकीटे कापणे, प्रस्थापित जात समूहाचे वर्चस्व नाकारून छोट्या समूहातील व्यक्तीला नेतृत्व देणे, स्थानिक पातळीवर पक्षाची पूर्ण फेररचना करणे याला मोदी – शाहांच्या भाजपने गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये प्राधान्य दिले. त्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि अगदी महाराष्ट्र या मोठ्या राज्यांचाही समावेश होता. गुजरात हे तर मोदी शहांचे गृहराज्य. तिथे त्यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे राजकीय प्रयोग करून सलग 6 वेळा सत्ता टिकवली. बाकीच्या राज्यांमध्ये ही प्रयोग करायला पुढे मागे पाहिले नाही. त्यातले 50 % पेक्षा जास्त प्रयोग यशस्वी झाले, तर काही ठिकाणी अपयश आले, पण म्हणून भाजपने प्रयोग करायचे थांबविले नाही. महाराष्ट्रात मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुठलाही नवा प्रयोग करण्याच्या फंदात भाजप पडताना दिसत नाही. बहुतेक सगळ्या विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी दिल्या. त्यासाठी घराणेशाहीचे आरोपही सहन केले. भाजपला बहुतेक महाराष्ट्रात प्रयोगामध्ये “रिस्क” दिसली.
त्याउलट आधीच करून ठेवलेला प्रयोग निस्तरण्यावर भाजपने भर दिलाय. अजित पवारांसारखा भाजप या हिंदुत्ववादी पक्षाच्या संस्कृतीत न बसणारा नेता मोदी – शाहांच्या भाजपने महायुतीत “ऍडजेस्ट” केला. यातून भाजपने काय मिळवले, त्यापेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या प्रस्थापित नेत्यांना पुनर्स्थापित केले, हेच निदान लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सिद्ध झाले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा उमेदवार पाहता तेच अधोरेखित झाले. कारण अजितदादांनी प्रस्थापित सरदार – दरकदारांनाच पुन्हा उमेदवाऱ्या दिल्या. यातून त्यांनी स्वतःचे सत्तेचे गणित बसवून घेतले.
तसेही अजितदादा ज्या राजकीय संस्कृतीतून येतात, त्या राजकीय संस्कृतीत तोंडी पुरोगामी भाषा आणि प्रत्यक्षात घराणेशाही राबवा, या पलीकडे दुसरे काही नाही. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाने कुठला प्रयोग करणे हे अपेक्षितही नाही. ते त्यांना शक्यही नाही.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने ऍडजेस्ट करून अडीच वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोग तुलनेने यशस्वी ठरला, पण दोन हिंदुत्ववादी पक्षांची युती हा 30 वर्षांमधला यशस्वी प्रयोग या निमित्ताने पुढे गेला, यापेक्षा काही वेगळे घडले नाही.
– ठाकरे “ऍडजेस्ट” होईनात
महाविकास आघाडीत देखील आधीचाच प्रयोग आधीच केलेला प्रयोग निस्तरण्यात वेळ चालल्याचे दिसून येते. उद्धव ठाकरेंची शिवसेना हा काही काँग्रेस संस्कृतीत बसणारा पक्ष नाही. तरीदेखील सत्तेच्या मोहापाई काँग्रेस आणि पवारांनी उद्धव ठाकरेंना “ऍडजेस्ट” करून घेतले आणि उद्धव ठाकरेही रेटारेटी करून त्यांच्यामध्ये “ऍडजेस्ट” झाले, पण आता तीच “ऍडजेस्टमेंट” उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गोठ्यात आणणारी ठरली आहे. उद्धव ठाकरेंना ना धड महाविकास आघाडीतून बाहेर पडता येतेय, ना त्यांच्या मनानुसार जागावाटपात संधी मिळालीय!!
Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसची दोन पक्षांसोबतची युती संपुष्टात!
पवार आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये नवे प्रयोग करणे हा कधी प्रश्न देखील उद्भवत नाही. आहेत ती प्रस्थापित घराणी पुढे चालवणे, एकाच घराण्यात तीन-तीन आमदारक्या देणे, प्रसंगी बाप विरुद्ध मुलगी लढवणे ही त्यांची मूळातली राजकीय संस्कृती आहे. तीच पुनर्स्थापित करणारी ही निवडणूक ठरली आहे. कारण पवारांनी आपली राष्ट्रवादी ताटातलं वाटत आणि वाटीतलं ताटात भरूनच पुन्हा बळकट केली. यात त्यांनी कुठल्याही नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली नाही, तर आपल्याच सरदार – दरकदारांच्या मुलगा – मुलगी – पुतण्या – पुतणी – मामा – भाची यापैकी कोणालातरी उमेदवारी देऊन पक्षाची पुनर्बांधणी केली. यात कुठलाही नवा प्रयोग असण्याची शक्यताच नव्हती. तसा तो त्यांनी केलाही नाही.
काँग्रेस कुठल्याही नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची शक्यताच नाही. त्यातल्या त्यात नाना पटोले भाजपमधून घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. हाच काय तो “नवा प्रयोग” ठरला होता, पण पवार आणि ठाकरेंना ते नकोसे झाले. कारण त्यांनी त्यांना न सांगता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतरचा पुढचा सगळा घोळ होऊन ठाकरे + पवारांच्या हातातली काँग्रेसच्या बळावर मिळवलेली सत्ता गेली. याचा त्या दोन्ही नेत्यांच्या मनात मोठा राग आहे. काँग्रेसचा “प्रयोग” ठाकरे आणि पवारांच्या अंलगट आला. म्हणून त्यांनी काँग्रेसला जागावाटपात धडा शिकवला.
पण एवढे होऊनही काँग्रेस आणखी कुठला “नवा प्रयोग” करून ठाकरे किंवा पवारांसमोर झुकेल किंवा त्यांच्यावर निर्णायक मात करेल, अशी शक्यता नाही. काँग्रेसवाले एक वेळ निवडणूक हरतील, पण तरुण नेत्याकडे नेतृत्व सोपवून नवा प्रयोग करणार नाहीत, हे त्यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि हरियाणा मध्ये सिद्ध करून दाखविले. महाराष्ट्रातही काँग्रेस काही वेगळे करण्याची शक्यता नाही.
– जरांगे गरजवंत, आंदोलन प्रस्थापितांचे
त्यातल्या त्यात शरद पवारांच्या बाबतीत “जरांगे प्रयोग’ हा नवा फंडा ठरण्याची शक्यता होती. कारण प्रत्येक निवडणुकीत पवार असला कुठलातरी मराठा जात वर्चस्वाचा प्रयोग राबवत आलेत. याची सुरुवात त्यांनी “भांडारकर प्रयोगा”पासून केली होती. ती 2024 मध्ये जरांगे आंदोलनाच्या प्रयोगात रूपांतरीत झाली. जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांचे म्हणून सुरू झाले, ते आता प्रस्थापित मराठ्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. कारण जरांगे समर्थक निवडणूक लढवणार आहेत. त्यामध्ये त्यांनी कुठल्या गरजवंत तरुणाला त्यांनी उमेदवारी देऊन पुढे केले, तरी त्याच्या मागे आर्थिक ताकद प्रस्थापित मराठा समाजाचीच राहणार आहे. कारण त्याशिवाय त्या तरुणाला निवडणूकच लढवता येणार नाही. एवढा आता निवडणुकीचा खर्च अतिप्रचंड वाढला आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनातून जर कोणी तरुण निवडणुकीत उतरले आणि ते निवडून जरी आले, तरी प्रत्यक्षात त्यांची सत्तेमध्ये रूपांतर होताना, ती प्रस्थापित मराठ्यांचीच सत्ता अधिक प्रस्थापित करणारी ठरणार आहे. तसाही मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या घरात 30 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपद येणार का??, या नॅरेटिव्हचे पिल्लू चर्चेसाठी सोडूनच दिले आहे!! याचा अर्थ नीट समजावून घेतला, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे आधीच करून ठेवलेले प्रयोग निस्तरण्याची आणि प्रस्थापितांना अधिक प्रस्थापित करण्याची ही निवडणूक ठरली असल्याचे सिद्ध होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App