History repeats; पुन्हा सिंडिकेट, पुन्हा इंडिकेट!!


आणि इथेच इंदिरा गांधींनी इंडिकेटची व्याप्ती वाढवून जी सध्याची काँग्रेस अस्तित्वात आणली तिचा पराभव घडून आलेला आहे. तो नुसता भाजपने केलेला पराभव नाही तर दोन्ही सिंडिकेटनी आणि इंडिकेटच्या सध्याच्या कर्तृत्वहीन नेत्यांनी तो घडवून आणलेला आहे…!!


सगळे जग पुढे चाललेले असताना राज्यकर्त्यांनी जगाच्या पुढे असावे. निदान जगाबरोबर असावे असे अशी अपेक्षा असते. पण कधीकधी ही अपेक्षा फलद्रुप न होता राज्यकर्ते “पुच्छ प्रगती” करताना दिसतात. सध्या येथील “राज्यकर्ता” या शब्दा ऐवजी “काँग्रेस” हा शब्द वापरला, तर वर उल्लेख केलेली बाब अधिक स्पष्ट होईल. History repeats; flight irrupts in congress syndicate – indicate

काँग्रेसची सध्या “पुच्छ प्रगती” चालू आहे. याला क्वचित History repeats असेही म्हणता येईल. कारण सध्या काँग्रेसमध्ये जी बंडाळी माजली आहे, ती पाहता 1969 सालच्या सिंडिकेट – इंडिकेट लढाईची आठवण झाल्याखेरीज राहत नाही.

अर्थात 1969 आणि 2021 मधला फरक आहे की यमुनेतून सत्तेचे बरेच पाणी वाहून गेले आहे आणि काँग्रेसच्या सत्तेची विहीर बरीच अटली आहे. पण मराठी म्हण आहे ना, “मूळ स्वभाव जाईना अन् त्याचा येळकोट राहीना”, तशी काँग्रेसच्या हायकमांडची अवस्था झाली आहे. काँग्रेसमध्ये एवढी बजबजपुरी माजली आहे पण काँग्रेस हायकमांड तस्स की मस्स झालेले नाही. कारण आपल्या सत्तेला सुरुंग लागला आहे असे त्यांना वाटतच नाही. उलट काँग्रेस हायकमांडने स्वतःहून “सिंडिकेट – इंडिकेटचा” खेळ सुरू केला आहे की काय असे वाटायला लागले आहे…!!पक्षातले जुने – जाणते बुजुर्ग नेते 1969 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जसे वेचून पक्षाबाहेर काढले तसेच आज काँग्रेसचे हायकमांड करताना दिसत आहे. त्यावेळी निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, नीलम संजीव रेड्डी, स. का. पाटील आदी नेते होते. आज कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, कॅप्टन अमरिंदर सिंग, लुईजिनो फालेरो, आनंद शर्मा आदी नेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या पिढीमध्ये समानता अशी की त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर अशीही समानता आहे की काँग्रेस हायकमांडने पक्षात उभी फूट पाडली पण आपल्याला आव्हान देणाऱ्या बड्या बुजुर्ग नेत्यांचे काहीही ऐकले नाही…!! त्या वेळी इंदिरा गांधींनी ऐकले नाही. आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी ऐकत नाहीत.

पंजाब आणि दिल्ली मध्ये काँग्रेसमध्ये उघड बंडाळी झाली. त्याकडे दुर्लक्ष करुन राहुल गांधी केरळच्या दौऱ्यावर निघून गेले. बंडाळी करणार्‍या नेत्यांवर सध्याच्या काँग्रेस हायकमांडने आपल्या समर्थक नेत्यांना सोडले. अजय माकन, भूपेश बघेल,
टी. एस. सिंग देव ही त्याची उदाहरणे आहेत. एक प्रकारे हे काँग्रेसच्या हायकमांडचे नवे इंडिकेट आहे. सिब्बल, अमरिंदर सिंग, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद वगैरे जी 23 नेते म्हणजे नवे सिंडिकेट आहे…!!

या खेरीज आणखी एक सिंडिकेट काँग्रेस परिवारात अस्तित्वात आहे. ती काँग्रेस हायकमांडच्या परिघाबाहेर आहे. ती म्हणजे ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस. तृणमूळ काँग्रेस स्वतःला मूळ काँग्रेसचा पर्याय म्हणून उभी करण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रयत्न गंभीर आहे. कारण काँग्रेस पक्षातले प्रादेशिक नेते फोडून त्या-त्या प्रदेशाची जबाबदारी देण्याचे काम तृणमूल काँग्रेस करत आहे. सुष्मिता देव आणि लुईजिनो फालेरो ही त्याची आसाम आणि गोव्यातली उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी याच प्रकारे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये घुसल्यास आश्चर्य वाटायला नको. किंबहुना येत्या वर्षभरात त्यांची तीच चाल दिसेल अशी चिन्हे दिसत आहेत. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवेदनातून हे स्पष्ट होते आहे.

“काँग्रेसचे नेते आराम खुर्च्यांमध्ये बसले आहेत. त्यांची भाजपची लढण्याची इच्छाशक्तीच संपली आहे. पण आम्ही घरात आराम करत बसू शकत नाही. काँग्रेस गेली सात वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसली आहे. पण ती भाजपला पराभूत करू शकलेली नाही. तृणमूळ काँग्रेस मात्र सातत्याने भाजपला पराभूत करते आहे”, असे वक्तव्य अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूळ काँग्रेस हाच पर्याय असल्याचे त्यातून सूचित होत आहे. त्याच वेळी लुईजिनो फालेरो यांनी काँग्रेस परिवार मजबूत करण्याची भाषा केली आहे. मूळ काँग्रेसमधून मी तृणमूळमध्ये काँग्रेस परिवार मजबूत करायला आलो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. अभिषेक बॅनर्जी आणि फालेरो यांची वक्तव्ये ही नवी सिंडिकेट असल्याचेच सूचित करतात. फक्त ही मूळ काँग्रेसच्या हायकमांडच्या परिघाबाहेरची सिंडिकेट आहे.

इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय कर्तृत्वाने सिंडिकेटचा पूर्ण पराभव करून आपली इंडिकेट हीच खरी काँग्रेस आहे हे देशात सिद्ध केले होते. आजची काँग्रेस ही इंदिराजींची इंडिकेट काँग्रेसच आहे. तिची व्याप्ती इंदिरा गांधींनी देशव्यापी केली, पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेसची व्याप्ती घसरली. प्रभाव ओसरला. सत्तेवर येण्याची स्वप्ने देखील पाहू शकत नाही, अशा अवस्थेत काँग्रेस पोहोचली. त्यामुळे पक्षाअंतर्गतची सिंडिकेट आणि काँग्रेसच्या हायकमांडच्या परिघाबाहेरची सिंडिकेट प्रबळ होऊ पाहत आहेत किंबहुना मूळ काँग्रेसला तडाखा देण्याइतपत त्यांनी ताकद कमावली आहे, असे म्हणायची वेळ आली आहे.

आणि इथेच इंदिरा गांधींनी इंडिकेटची व्याप्ती वाढवून जी सध्याची काँग्रेस अस्तित्वात आणली तिचा पराभव घडून आलेला आहे. तो नुसता भाजपने केलेला पराभव नाही तर दोन्ही सिंडिकेटनी आणि इंडिकेटच्या सध्याच्या कर्तृत्वहीन नेत्यांनी तो घडवून आणलेला आहे…!!

History repeats; flight irrupts in congress syndicate – indicate

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात