Manmohan Singh : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??

नाशिक : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??, असे विचारायची काँग्रेस नेत्यांनी आपल्या वर्तणुकीतून आणली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर गांधी परिवाराने आणि त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या विषयी जे ममत्व, प्रेम, आदर दाखविला, ते पाहून कुणालाही मनमोहन सिंग यांच्या विषयी गांधी परिवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती आपुलकी भरलेली आहे, असे वाटेल, पण प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती होती आणि आहे का??, याचा बारकाईने राजकीय विचार केला, तर त्याचे खरे उत्तर मिळू शकेल आणि ते उत्तर नकारार्थी असेल!!

गांधी परिवार आणि काँग्रेसने काल आणि आज मनमोहन सिंग यांच्या विषयी दाखविलेल्या आदर भावाला “पश्चातबुद्धी” या खेरीज दुसरे नाव देता येणार नाही. ही “पश्चातबुद्धी” दोन अंगांनी समोर आली आहे. एक तर मनमोहन सिंग हे प्रत्यक्ष कार्यरत असताना, विशेषतः ते पंतप्रधान पदावर असताना गांधी परिवार आणि काँग्रेस नेत्यांनी तेवढा आदरभाव दाखवून त्यांच्या आर्थिक आणि राजकीय कर्तृत्वाची दखल घेतलेली नव्हती. किंबहुना मनमोहन सिंग हे आपल्या अंगठ्याखाली कसे राहतील, आपण सांगू तसेच कशा पद्धतीने वागतील, आपल्या सर्व निर्णयांपुढे कसे मान तुकवतील, हे पाहिले गेले होते. किंबहुना “नॅशनल एडवाईजरी काउंसिल” नावाच्या संस्थेची घटनाबाह्य निर्मिती करायला लावून मनमोहन सिंग सरकारला गांधी परिवाराने पूर्णपणे वाकवून ठेवले होते. “करने को हम, भरने को मनमोहन सिंग!!” अशी त्यावेळची मनोवृत्ती होती.

2004 ते 2009 या कालावधीत झालेल्या घोटाळ्यांत बहुसंख्य काँग्रेस नेते अडकले होते. त्याच्याशी मनमोहन सिंग काहीही संबंध नव्हता. पण पंतप्रधान म्हणून तेच सर्व घोटाळ्यांना जबाबदार आहेत. तेच घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालतात, असे “पर्सेप्शन” तयार करण्यात विरोधी पक्षांपेक्षा गांधी परिवाराच्या जवळचे “सत्ताधारी घटकच” जास्त कारणीभूत होते. नटवर सिंग, मणिशंकर अय्यर यांच्या पुस्तकातून त्याचे दाखले जागोजागी मिळतील. तेव्हा मनमोहन सिंग गांधी परिवाराचे “नावडते” ठरले होते. म्हणून मग त्यांच्या सरकारने काढलेला अध्यादेश राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत फाडला होता. तेव्हा मनमोहन सिंग त्यांचे “गुरु” “मित्र” आणि “मार्गदर्शक” नव्हते, ते कालवश झाल्यानंतर लगेच ते राहुल गांधींचे आणि सोनिया गांधींचे “मित्र”, “गुरु” आणि “मार्गदर्शक” बनले. आता सोनिया गांधींनी तसा “मेसेज” लिहून तो प्रसिद्ध केला. हीच नेमकी ती “पश्चातबुद्धी” ठरली!!

ही “पश्चातबुद्धी” मनमोहन सिंग यांच्या गुरूंच्या गांधी परिवाराने केलेल्या अपमानातून आली. कारण त्या अपमानाची खूप मोठी किंमत गांधी परिवार आणि काँग्रेसला मोजावी लागली. याची जाणीव झाल्यानंतरच मनमोहन सिंग यांचा काँग्रेसच्या इतमामात सन्मान करायची “बुद्धी” झाली. त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस मुख्यालयात जागा मिळाली. मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी यमुना काठावर राजघाटाच्या आसपास जमीन मागायची “बुद्धी” झाली.

वास्तविक मनमोहन सिंग यांनी गांधी परिवारापैकी कुणाला नव्हे, तर नरसिंह राव यांना राजकीय गुरू मानले होते. तसे ते उघडपणे म्हणत असत. नरसिंह राव यांनीच मनमोहन सिंग यांना राजकारणात आणून त्यांच्याकडून अर्थमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी करवून घेतली होती. त्याविषयी मनमोहन सिंग अनेकदा कृतज्ञता व्यक्त करत असत.

नरसिंह रावांच्या पार्थिवाचा अपमान

पण मनमोहन सिंग यांनी राजकीय गुरू मानलेल्या नरसिंह राव यांचा गांधी परिवाराने आणि काँग्रेसने अपमान केला होता. त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या मुख्यालयात आणायला जागा दिली नव्हती. त्यांची समाधी दिल्लीत होता कामा नये याची खूणगाठ बांधून प्रत्यक्ष कृती गांधी परिवार आणि काँग्रेसच्या सरकारने केली होती. नरसिंह राव यांच्या पार्थिवाला गांधी परिवाराने काँग्रेसचा इतमाम नाकारला होता. पण त्याचा फार मोठा राजकीय फटका त्यांना बसला. संपूर्ण देशाने किंबहुना जगाने नरसिंह राव यांचे राजकीय कर्तृत्व मान्य केले होते. नरसिंह राव यांचा अपमान केल्याने राव यांची प्रतिमाहानी झाली नाही, तर उलट गांधी परिवाराचीच मोठी प्रतिमाहानी झाली. गांधी परिवारावर अहंकारी असल्याचे शिक्कामोर्तब झाले. केंद्रातल्या मोदी सरकारने नरसिंह रावांचे स्मारक दिल्लीत बांधले. त्यांचा “भारतरत्न” किताब देऊन गौरव केला. या सगळ्यात गांधी परिवार आणि काँग्रेस “व्हिलन” ठरले. त्यांची अब्रू हौदाने गेली.

आता मनमोहन सिंग यांच्या विषयी ममत्व, प्रेम, आणि आपुलकी दाखवून त्यांना “मित्र”, “गुरु” आणि “मार्गदर्शक” असे संबोधून गांधी परिवार आपली हौदाने गेलेली अब्रू थेंबाने भरून काढायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला काँग्रेस इतमाम देते आहे. त्यामुळेच सवाल हे आहेत की, शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूंचा अपमान कसा भरून काढेल??, हौदाने गेलेली अब्रू, थेंबाने कशी भरून काढता येईल??

Gandhi family insulted Narasimha Rao, now honouring his disciple Manmohan Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात