पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन पहिल्याच झटक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक उद्या जाहीर होणार आहे, पण काँग्रेसचा मात्र पुण्यातला उमेदवार अजून ठरलेला नाही. महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेस पक्षात त्यांचे “नियमित उमेदवार” मोहन जोशी यांच्यासह 20 नेते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे, पण या 20 नेत्यांपैकी प्रत्येक जण नुसताच उमेदवारीसाठी इच्छुक आहे, निवडून येण्याची कोणालाच खात्री नाही. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यावर पुण्यात वसंत मोरे यांच्या रूपाने उमेदवार “आयात” करण्याची वेळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे. Congress looses its hold over pune loksabha constituency miserably
पुणे लोकसभा मतदारसंघातून काकासाहेब गाडगीळ यांच्यापासून विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत एकाचढ एक दिग्गज खासदार पाठवणाऱ्या काँग्रेस पक्षावर दुसऱ्या पक्षातला उमेदवार “आयात” करण्याची वेळ येणे यासारखे दुसरे राजकीय दुर्दैव नाही. पुणे लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. तिथे अपवादात्मक परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समिती, जनता पक्ष, भाजप यांचे खासदार जरूर झाले, पण काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावरची पक्षाची पकड निदान 2014 पर्यंत ढिल्ली पडलेली नव्हती.
काँग्रेसचा कुठलाही उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात 300000 पेक्षा जास्त मते सहज घेऊन निवडून यायचा, पण 2014 नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातली मतदानाची समीकरणे एवढी बदलली की, काँग्रेसचा उमेदवार 300000 मतांच्या रेंजमध्येच राहिला, पण भाजपचा उमेदवार 600000 मतांच्या रेंजमध्ये पोहोचला. 2014 मध्ये अनिल शिरोळे आणि 2019 मध्ये गिरीश बापट हे भाजपचे दोन खासदार अनुक्रमे विश्वजीत कदम आणि मोहन जोशी या दोन काँग्रेस उमेदवारांपेक्षा 300000 मते जास्त घेऊन निवडून आले होते आणि इथे खऱ्या अर्थाने काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेस संघटनात्मक पातळीवर पूर्ण विस्कळीत झाली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांचा विजय अपवाद ठरवा इतकी काँग्रेस आता पुणे लोकसभा मतदारसंघात विस्कळीत आहे. काँग्रेसकडे संपूर्ण पुण्याचे नेतृत्वच उपलब्ध नाही. सुरेश कलमाडी हे पुणे काँग्रेसचे शेवटचे शहरव्यापी नेते. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष भरपूर झाले, पण शहरव्यापी नेते उरले नाहीत.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना महापालिकेवर काही काळ राष्ट्रवादीचा कब्जा जरूर राहिला, पण पुण्याचा महापौर दोन-तीन वेळा करणे वगळता राष्ट्रवादीला देखील पुण्यावर पकड मिळवता आली नाही. ती पकड आता 2014 नंतर भाजपने पूर्णपणे मिळवली आहे. भाजपने 2017 ची महापालिका निवडणूक जिंकलीच, पण महापालिकेत 100 आकडा देखील गाठला. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यासाठी इतर सगळ्या पक्षातून विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये खेचून घेतले. भाजपने संघटनात्मक पातळीवर पुण्यावरची पकड अधिकारी मजबूत केली. त्याचाच परिणाम म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीतच पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आले.
पवार + राऊतांचा डाव
आता काँग्रेस पुढे आपल्या 20 इच्छुकांमधून उमेदवाराची निवड करणे एवढाच पर्याय नाही, तर थेट उमेदवारच “आयात” करावा लागण्याची वेळ आहे. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली. काल मोहन जोशी त्यांना भेटून गेले आणि आज वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. एकूण पवार आणि संजय राऊत यांचा यातून पुण्यावर वसंत मोरे नावाचा उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर उभा करण्याचे डावपेच दिसत आहेत. म्हणजेच मूळ काँग्रेसचे नेते बाजूला सारून मनसेचा उमेदवार “आयात” करून तो काँग्रेसवर लादण्याचा पवार + राऊत यांचा डाव असू शकतो. पण यातून पवार आणि राऊतांच्या कारस्थानापेक्षा एकेकाळी पुण्यात बलाढ्य असणाऱ्या काँग्रेसची अवस्था किती बिकट आहे, हेच यातून समोर येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App