असं म्हणतात की मझधारेत नावेचा नावाडी बदलू नये, अन्यथा नाव बुडू शकते. पूर्वसुरींनी काही विचार करून दिलेला हा सल्ला काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धुडकावत पंजाबमध्ये काँग्रेसच्या नावेचा नावाडी नुसत्या मझधारेतच बदलला आहे असे नाही तर काँग्रेसची नाव किनाऱ्यावरच्या चिखलात अडकल्यानंतर नावाडी बदलला आहे. यामागे काँग्रेसचे काय लॉजिक आहे…?? की लोचा आहे हे समजायला मार्ग नाही…!!congress central leadership miscalculated leadership change in punjab and even its timing is also missed
कारण पंजाब मध्ये काँग्रेस श्रेष्ठी आपल्या राजकीय संस्कृतीनुसार वागले यात आश्चर्य नाही. पण कॅप्टन अमरिंदरसिंग मात्र स्वतःहून बाजूला होऊन काँग्रेस श्रेष्ठींना नवे आव्हान देण्याच्या मूडमध्ये आहेत किंबहुना वयाच्या 79 व्या वर्षी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काँग्रेस श्रेष्ठी त्यांचे राजकीय उपद्रवमूल्य दाखवून देण्यास भाग पाडत आहेत.
वास्तविक कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पंजाब निवडणुकीच्या आधी फक्त तीन ते 5 महिने बदलून काँग्रेसने असा कोणता तीर मारला आहे किंवा काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री असे कोणते तीर मारणार आहेत…?? हे प्रश्न आता सोशल मीडियावर काँग्रेसला टोचून विचारले जात आहेत. हे टोचणे काँग्रेस श्रेष्ठींनी स्वतःहून ओढवून घेतले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांच्यापुढे असलेले कोणतेही ऑप्शन निवडले तरी एक मात्र निश्चित असेल की कॅप्टन साहेबांना काँग्रेस श्रेष्ठींना स्वतःचे राजकीय उपद्रवमूल्य दाखवून द्यावेच लागेल किंबहुना अत्यंत शांतपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणि मुलाखती देताना त्यांनी हे व्यवस्थित सूचित केले आहे.
राजकारणातून त्यांनी बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. एका अर्थाने मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना नव्याने काही मिळवायचे शिल्लक राहिलेले नाही किंबहुना ते त्यांचे वय देखील नाही तरी देखील त्यांच्या सारखा पन्नास वर्षे राजकारणात राहिलेले आणि साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते आपला अपमान झाला असे उघडपणे म्हणतात तेव्हा तो कॉंग्रेस श्रेष्ठींना इशारा असतो आणि तो इशारा स्वतःसाठी काही मिळवण्यासाठी दुसर्या पक्षात जाण्याचा किंवा स्वतःचा पक्ष उभा करण्याचा नसतो तर काँग्रेसला स्वतःचे उपद्रवमूल्य दाखविण्याचाच इशारा असतो. त्यामुळेच काँग्रेस श्रेष्ठींनी इतक्या आयत्या वेळेला कॅप्टन साहेबांना झटका देऊन किंवा दिल्याचे मानून आपल्यासाठी भविष्यातला “मोठा झटका” तयार ठेवलेला आहे हेच यातून लक्षात येते.
इथेच भाजप आणि काँग्रेस यांच्या राजकीय संस्कृतीतला भेद दिसतो. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बिनबोभाट बदलले जाते. नाराजीच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरतात. पण कोणाचीही उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची हिंमत होत नाही आणि इकडे साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते उघडपणे आपला अपमान झाल्याचे पत्रकारांना सांगतात. मुलाखती देतात. याचा अर्थच काँग्रेस श्रेष्ठींची खेळी करण्याची वेळ चुकल्याचे स्पष्ट होत आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हे निमित्त असू शकते. पण मूळात कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेस श्रेष्ठींना आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळेच ते अत्यंत शांतपणे आत्ता पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसत आहेत. या त्यांच्या शांततेत उत्तरे देण्यामागे मोठ्या “बंडखोरीचा ज्वालामुखी” दडला आहे. त्याचा परिणाम येत्या तीन ते सहा महिन्यांमध्ये काँग्रेस श्रेष्ठींना भोगावा लागेल हे नक्की…!!
पंजाब मध्ये काँग्रेस श्रेष्ठी जे मुख्यमंत्री नेमतील त्यांना नीट राज्य करू देणे हे कॅप्टन अमरिंदरसिंग घडू देणार नाहीत. कॅप्टन साहेबांची मर्जी डावलून काँग्रेसचे मुख्यमंत्री तिथे राज्य करू शकणार नाहीत. काँग्रेसचे श्रेष्ठी आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री पंजाब मध्ये लादू शकतील. पण राज्य मुख्यमंत्र्यांना करायचे आहे हे विसरून चालणार नाही. आणि तिथेच काँग्रेस श्रेष्ठी कमी पडताना येत्या काहीच दिवसात दिसतील. आजचे काँग्रेस श्रेष्ठी म्हणजे काही इंदिरा गांधी नव्हेत की नुसत्या नजरेच्या जरबेत ते राज्यातल्या नेत्यांना ठेवू शकतील किंबहुना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी जाता जाता उघडपणे जे सांगितले आहे, त्यातूनच काँग्रेसच्या सध्याच्या श्रेष्ठींचे राजकीय तोकडे पण उघड्यावर आलेले दिसते आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App