“भाकरी फिरवली”, “डाव टाकला” अशी कुठलीही नाही भाषा; तरी पहिल्या झटक्यात 99 आकडा गाठला!! याच शब्दांमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपच्या पहिल्या यादीचे वर्णन करता येईल. एरवी शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात कुठला दौरा केला, की मराठी माध्यमांची भाषा “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी भाकरी फिरवली”, अशी सुरू होते. त्या दौऱ्यांमध्ये पवारांनी दोन-चार भेटीगाठी आणि एक दोन तिकिटे वाटप किंवा काटप केले असले, तरी त्याची वर्णने “डाव टाकला”, “भाकरी फिरवली”, याच शब्दांनी करायची माध्यमांची सवय आहे.
मात्र भाजपने पहिल्याच झटक्यात महाराष्ट्रातल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये दोन-तीन जणांची तिकिटे कापली. त्यापलीकडे कुठलीही “भाकरी फिरवली” नाही, की “डाव टाकला” नाही. शांतपणे स्क्रीनिंग कमिटीतल्या बैठकीत नावे फायनल केली आणि महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाचे आकडे जाहीर होण्यापूर्वी आपली उमेदवार यादी जाहीर करून टाकली.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने किमान अंतर्गत तीन सर्वेक्षणे केली. ती सर्वेक्षणे मर्यादित जागांची नव्हती, तर सगळ्या 288 जागांची होती. त्या सर्वेक्षणाच्या चाळणीतून जी नावे तावून सुलाखून निघाली, तीच नावे पहिल्या यादीत पक्षाने जाहीर केली. ज्या स्क्रीनिंग कमिटी मधून ही नावे बाहेर आली, त्या स्क्रीनिंग कमिटी मध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर महाराष्ट्रातले निवडक नेते होते. त्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकांच्या बातम्या आल्या, पण त्या बैठकांमधून एकही नाव “बाहेर” काढण्याची क्षमता कुठल्या माध्यमांना दाखविता आली नाही. त्यामुळे भाजपच्या यादीवर बातम्यांची कुठली पतंगबाजी करता आली नाही.
एरवी हीच माध्यमे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नावांबद्दल अशी काही पतंगबाजी करतात की जणू काही हे दोन्ही पक्ष माध्यमांनी पतंगबाजी केलेल्या नावांवरच खेळत बसतात की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करतात. भाजपच्या बाबतीत ही संधीच माध्यमांना मिळत नाही.
Chandrachud : सरन्यायाधीश म्हणाले- ज्युनियरसोबतही विनम्रपणे वागा; मी सर्वोच्च न्यायालयाला लोक न्यायालय बनवण्याचा प्रयत्न केला
लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजप त्यावेळी बॅकफूटवर गेला होता. कारण 23 आकड्यावरून भाजप 9 आकड्यावर आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप बॅकफूटवरच राहील. इतर सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सावधपणे आपले उमेदवार जाहीर करेल आणि प्रचारात देखील “डिफेन्सिव्ह मोड” मध्ये राहील, अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या होत्या. त्यातच जरांगे नावाच्या फॅक्टरने बाकी कुठल्याही पक्षापेक्षा भाजपलाच टार्गेट करायचे ठरविल्याने भाजप आणखी “डिफेन्सिव्ह मोड”मध्ये जाईल, असे अंदाज माध्यमांनी बांधले होते. पण प्रत्यक्षात घडले उलटेच. भाजपने गेल्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर होमवर्क पक्के केले. किमान तीन ते चार सर्वेक्षणे महाराष्ट्रात करून मगच उमेदवार यादीला हात घातला. वादग्रस्त नसलेल्या जागांवरचे उमेदवार पहिल्यांदा जाहीर होतात, तो पायंडा भाजपने पाळला, पण तो आकडाच 99 एवढा मोठा निघाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जागावाटपाची आकडेवारी पाहिली, तर शरद पवारांच्या वाट्याला देखील महाविकास आघाडीत 99 एवढा मोठा आकडा येणार नसल्याची स्थिती आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 85 पर्यंत जागा येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवारी यादीचा अर्थ एवढाच की भाजप आता “डिफेन्सिव्ह मोड” मधून बाहेर आला असून “जरांगे फॅक्टर”ला तोंड कसे द्यायचे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक कशी हाताळायची, याचे “होमवर्क” पक्के करून टप्प्याटप्प्याने आक्रमकतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. याचा अर्थ भाजपच्या आत्मविश्वासाची पातळी वाढली आहे. प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचे कसे प्रतिबिंब पडेल, हे आगामी काळ सांगेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App