बॉलिवूड पळवून नेताहेत… पळा पळा पळा… “लोहचुंबक महाराष्ट्रा”ची पटकथा


यूपीवाल्या योगींचा दौरा महाराष्ट्राच्या नेत्यांनी जेवढा गाजवला ना… तेवढा यूपीतल्या भाजपवाल्यांनाही नसता गाजवता आला… बरोबर आहे, पिकते तिथे विकत नाही… म्हणून मग यूपीवाल्या योगींची चर्चा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि चॅनेलवाल्यांनी महाराष्ट्रात “विकून” दाखविली… लोहचुंबक महाराष्ट्र परिषदेपेक्षा जास्त…!!


विनायक ढेरे

एक योगी बॉलिवूड दौऱ्यावर आले काय आणि काल दिवसभर “डोंगराला आग लागली पळा पळा पळा”च्या धरतीवर “बॉलिवूडला पळवून नेताहेत… पळा पळा पळा”चे गाणे वाजले काय… मराठी आणि हिंदी चॅनेलवाल्यांनी तर “लांडगा आला रे आला”ची त्याला चाल लावून साप समजून चर्चेची भुई धोपटून घेतली… शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस यांनी योगींच्या नावाने बोटे मोडून घेतली… योगींच्या विरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई पोलिसांशी हुज्जत घालून घेतली…

पण “बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी” या म्हणीपेक्षा यातून काही साध्य झाले नाही… मनसेने त्यांना ठग म्हटलेच आहे… त्यामुळे बाजारात तुरी… म्हणीला कोणी आक्षेप घेणार नाही, असे वाटते आणि घेणार तरी कसे? कारण योगींच्या फिल्म सिटीचे काम आता कुठे कागदावर सुरू झालेय. ती जमिनीवर उभारायला सुरवात होणार कधी? तिथे जाणार कोण आणि कधी? हे अजून सगळेच ठरायचेय.

पण दुसरे कोणते सोयीचे मुद्दे नसल्याने महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी योगींना राजकीय अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. पण हाय रे… योगी त्यांना पाहिजे तसे अंगावर आलेच नाहीत. ते आले. ते काही निवडक लोकांना भेटले. पत्रकार परिषद घेतली आणि निघून गेले.

ते जाता जाता चॅनेलवाल्यांनी विषय शोधून काढला… मराठी चॅनेलवाल्यांनी बॉलिवूड पळवून नेताहेत… पळा… पळा…पळा या चर्चेचा कार्यक्रम उरकून घेतला. आणि चर्चेत सहभागी कोण? तर प्रादेशिक पक्षांचे लोकल प्रवक्ते आणि ज्यांचा बॉलिवूडशी दूरूनही संबंध नाही, असे मराठी सिनेमातले नट आणि छोटे इव्हेंट निर्माते. फेसबुक पोस्ट लिहिणारे. जे कधी सिनेमा निर्मिती करणार नाहीत आणि त्यांनी निर्माण केला तर कोणी पाहणार नाही, अशांची चर्चा घडवून आणली.

वर बॉलिवूडमधले कोणी काही बोललेच नाही किंवा चॅनेलवर प्रतिक्रिया द्यायला आलेच नाही, म्हणून मग आपणच प्रश्न विचारणा करते झाले, “इतना सन्नाटा क्यू है भाई?”… व्वा… रे विशेष चर्चा…!! नाही म्हणायला महाराष्ट्राचे काही मंत्री, खासदार यांनी प्रतिक्रिया दिल्या चॅनेलवाल्यांना… पण काही म्हणा… यूपीवाल्या योगींचा बॉलिवूड दौरा महाराष्ट्राच्या नेत्यांनी जेवढा गाजवला ना… तेवढा यूपीतल्या भाजपवाल्यांनाही नाही गाजवता आला… बरोबर आहे, “पिकते तिथे विकत नाही ना”…!! म्हणून यूपीवाल्या योगींची चर्चा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात “विकून” दाखविली. नाही म्हणायला योगींनी पण यूपीतून एक मंत्री या चर्चेत ऑनलाइन धाडून दिले, मोहसिन रझा.

इकडे फेसबुक लाईव्ह फेम मुख्यमंत्र्यांनी “लोहचुंबक महाराष्ट्र परिषदे”ला संबोधित करून महाराष्ट्रापेक्षा लोहचुंबकाची महती जास्त गायली… वर आमच्याकडून तिकडे कोणी निघून जाणार नाही. आले तर तिकडूनच कोणी इकडे येतील. कारण आमच्याकडे “लोहचुंबकाची शक्ती” आहे, अशी ऑनलाइन बैठकीत मखलाशीही करून घेतली. ही “लोहचुंबक महाराष्ट्राची” बैठक आयोजित केली होती, इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सने मुंबईत… मुख्यमंत्री यात सहभागी झाले होते, मातोश्रीतून ऑनलाइन. योगी मुंबईत आले होते, लखनौतून.

त्यांनी बॉलिवूडमधल्या मोजक्या कलावंतांची भेट घेतली, हॉटेल ट्रायडंटमध्ये प्रत्यक्ष…. पत्रकार परिषदेत बॉलिवूडबद्दल त्यांनी उत्तर दिले…. ३ मिनिटांत…. मुंबईत मराठी – हिंदी चॅनेलवर रिपोर्टिंग आणि चर्चा चालली… साधारण ३ तास. “लोहचुंबक महाराष्ट्र परिषदेची” बैठक चालली साधारण ४५ मिनिटे…. त्याचे रिपोर्टिंग झाले… १५ ते २० मिनिटे… ते देखील मराठी चॅनेलवर… हिंदी चॅनेलवाल्यांनी २ ते ३ मिनिटांचा मुख्यमंत्र्यांचा फक्त बॉलिवूड बाईट दाखविला. बाकीच्या परिषदेचे रिपोर्टिंगही हिंदी चॅनेलने केलेले दिसले नाही… याला म्हणतात “लोहचुंबक महाराष्ट्र”!! …

मराठी चॅनेलवाल्यांसकट हिंदी चॅनेलवाल्यांनी चर्चा बॉलिवूडवर केंद्रीत ठेवली… पण या सगळ्यात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर चालणारे दोन प्रादेशिक पक्ष आणि मराठी चॅनेल मराठी फिल्म इंडस्ट्रीवर बोललेच नाहीत… मराठी फिल्म इंडस्ट्री यांच्या “लोहचुंबक महाराष्ट्राचा” भाग नसावी बहुतेक…!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात