शक्ती “तोळा मासा”; प्रदर्शनात “बडा मासा”

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ इच्छिणाऱ्या एकाही राजकीय नेत्याची पोहोच राष्ट्रीय पातळीवरची नाही. त्यांचे “पक्ष छोटे, आव मोठे” ही त्यांची अवस्था आहे. शक्ती कमी आणि प्रदर्शन जास्त ही त्यांची राजकीय सवय राहिली आहे. “अंगापेक्षा बोंगा मोठा” ही मराठी म्हण ममता बॅनर्जी शरद पवार आणि नितीश कुमार यांना चपखल लागू होते.


काही लोकांचे असेच असते… आपण कोण आहोत?… आपला “राजकीय साईज” काय?… आपल्याला कोण विचारतो? याचा विचार अजिबात न करता आपल्या आवाक्याबाहेरचे शक्तिप्रदर्शन करत राहायचे. काही लोकांना ते आवडते पण बहुतेक वेळा अशा लोकांचे फसगे होते.Political Challengers of PM narendra modi always remain short as non of them have guts to increase their own political Clouet at national level

नेमके हेच राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमधून दिसते. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल जिंकून दिल्लीच्या स्वारीवर आल्या होत्या. पाच दिवस पश्चिम बंगालला वाऱ्यावर सोडून त्या दिल्लीत तळ ठोकून बसल्या होत्या.

आपल्या राष्ट्रीय नेतृत्वावर सर्व विरोधी पक्षांकडून मोहर उमटवली जावी यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेसची काँग्रेसशी सूत जुळवण्याचा प्रयत्न देखील केला. बाकीच्या पक्षांच्या नेत्यांना देखील त्या भेटल्या. शरद पवारांना भेटल्या नाहीत पण त्यांच्याशी त्या बोलल्या. ल्यूटन्स दिल्लीतल्या मीडियाने त्यांना जणू भावी पंतप्रधानच राजधानीत आल्याची प्रसिद्धी दिली.पण ल्यूटन्स दिल्लीतल्या एकाही पत्रकाराने त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. राज्यातला कायद्याची आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची आहे, हे लक्षात घेऊन त्यांना प्रश्नच विचारले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराने टोक गाठले आहे. तरीदेखील त्याबद्दल पत्रकारांनी ममता बॅनर्जी यांना जाब विचारला नाही. उलट राष्ट्रीय पातळीवर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची कशी स्पर्धा करू शकतात?, याचेच ढोल मिडीयाने पिटले. ते ममतांना हवेच होते.

त्यांनी पश्चिम बंगाल जिंकला हे खरेच पण म्हणून ममता बॅनर्जींचा “राजकीय साईज” पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर टक्कर देण्याएवढा मोठा झालाय असे मानण्याचे कारण नाही. आव्हाने त्यांच्यासमोर बंगालमधले जास्त आहेत. मग त्या राष्ट्रीय पातळीवरचा खऱ्या अर्थाने विचार करू शकतात. परंतु मीडियाने एकदा फुग्यात हवा भरली की मागेपुढे पाहायचे नाही. स्वतःला राष्ट्रीय नेता मानूनच पुढे चालायचे असे ठरवले की मग त्यावर प्रश्न कुणी विचारायचे नाहीत.

जे ममता बॅनर्जींचे, तेच गेल्या तीस वर्षांपासून शरद पवारांचे चालू आहे. मराठी माध्यमे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या आणि न मिळणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या पुड्या सोडत राहतात आणि पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा फुगा दिल्लीतल्या नाही पण मुंबईतल्या हवेत उंच उंच उडत राहतो. पवारांच्या राष्ट्रवादीचा साईज काय?, त्यांचे निवडणुकीतले यशाचे प्रमाण काय? लोकसभेत त्यांना मिळालेल्या सर्वोच्च जागा किती? याविषयी माध्यमे चर्चा देखील करत नाहीत. राष्ट्रवादीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते या माध्यमांच्या हवेवरच पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा पतंग उंच उंच उडवत राहतात.

त्यात आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भर पडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष 42 आमदारांवर आला. भाजप त्यांच्या दुपटीने पुढे गेला. केवळ निवडणुकीच्या आधी शब्द दिल्याने तसेच केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनू दिले. पण आता नितीश कुमार यांचीही राष्ट्रीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे. त्यांनी स्वतः तसे जाहीर केले नसले त्यांचे निकटवर्ती नेते जेडीयू म्हणजे संयुक्त जनता दल पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमारांची पंतप्रधानपदाचे मटेरियल म्हणून भलामण केली आहे.

जेडीयू पक्ष बिहार मध्ये 42 आमदार घेऊन सत्तेवर आहे. पण पक्ष “राष्ट्रीय पातळी”वरचा असल्याचा दावा करतो आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडण्यात आला. लल्लन यादव हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. कारण आर. आर. पी. सिंग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोदींनी स्थान दिल्याने एक पद एक व्यक्ती हा भाजपचा फॉर्मुला नितीश कुमारांनी अमलात आणला आहे. पक्ष बिहार पुरता मर्यादित त्यातही ४० – ५० आमदारांच्या रेंजमध्ये राहतो. आव मात्र राष्ट्रीय पक्षाचा.

त्यातूनच उपेंद्र कुशवाहांसारख्या नेत्यांनी नितीश कुमारांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला हवा दिली नाही तरच नवल…!! दोन दिवसात नितीश कुमारांनी दिल्लीत राजकीय हवा तापवून बघितली. त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, जे १० वर्षांचा तुरुंगवास भोगून आलेत अशा ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेऊन “मोठे राजकारण” साधण्याचा प्रयत्न केला. पण एवढे सगळे करून त्यांचा फायदा काय…?? प्रश्नचिन्ह तितकेच ठळक आहे.

ममता बॅनर्जी काय, शरद पवार काय किंवा नितीश कुमार काय आहे या तीनही नेत्यांची राजकीय कारकीर्द प्रादेशिक पक्षांचे नेते म्हणूनच राहिली आहे. आपापल्या प्रदेशातले ते मोठे नेते आहेत. परंतु राष्ट्रीय पातळीवर त्यांचे राजकीय मोठे कर्तृत्व दिसलेले नाही. त्यांचे पक्ष तर कधीच राष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडू शकलेले नाहीत. त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांचे फुगे मीडिया आणि त्यांच्याच पक्षाचे नेते यांच्याखेरीज दुसरे कोणीही उंच उडवत नाही.

पक्षसंघटना व्यापक – विस्तृत करण्याचा विचार त्यांच्या गावीही नाही. पक्ष संघटनेचा विस्तार तर सोडा, हे तीनही नेते प्रचारासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्याची किरकोळ अपवाद वगळता दुसरी उदाहरणेही सापडत नाहीत. क्वचित एखाद्या प्रादेशिक नेत्याने विरोधकांचा सर्वपक्षीय मेळावा भरवला किंवा त्याने जाहीर सभेला बोलवले तर तिथे हजेरी लावायची. एकमेकांचे हात धरून उंचावायचे प्रेस फोटोला पोज द्यायची. संधी मिळाली तर सभेत किरकोळ भाषण करायचे आणि परत आपल्या राज्यात येऊन राजकारण सुरु करायचे हा या नेत्यांचा खाक्या राहिला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय मतदार संमिश्र कौल देतील. कोणत्याही एका पक्षाला बहुमत देणार नाहीत. मग आपण “राजकीय जुगाड” करून नेतेपद पटकवू म्हणजे पंतप्रधान होऊ ही या तीनही नेत्यांच्या “महत्त्वाकांक्षेची परमावधी” आहे. आपल्या पक्षाचा संपूर्ण देशभर विस्तार करण्याची त्यांची कुवत आणि महत्त्वाकांक्षा दोन्हीही नाही. तरीही त्यांना मोदींशी स्पर्धा करायची आहे. ही स्पर्धा ते स्वबळावर नव्हे तर दुसऱ्याच्या बळावर तिसऱ्याने उभे राहण्यासारखी करायची आहे.

…आणि इथेच त्यांच्या राजकीय ठळक अपयशाची मेख आहे या तीनही नेत्यांची राजकीय शक्ती “तोळामासा” आहे पण प्रदर्शन मात्र “बडा मासा” असल्याचे आहे. म्हणूनच ते भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पातळीवरील पक्षांच्या नेतृत्वाशी खऱ्या अर्थाने कधीच स्पर्धा करू शकत नाहीत.

Political Challengers of PM narendra modi always remain short as non of them have guts to increase their own political Clouet at national level

महत्त्वाच्या बातम्या