लोकमान्य टिळक : भारताचे द्रष्टे नेतृत्व


आज १ ऑगस्ट २०२१ लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!


रँडच्या खुनामुळे हिंदुस्थानातले इंग्रज लोक हादरून आणि खवळून गेले. Lokmanya Tilak : visionary leadership of Akhand Bharat


मुंबईतल्या इंग्रजी वृत्तपत्राने एकच थयथयाट सुरू केला. राजद्रोही चळवळी आणि भाषणे करणाऱ्यांवर खटले भरावे असा त्यांनी आग्रह धरला.या सगळ्या भीतीच्या आणि संशयाच्या वातावरणात एकाच माणसाने धीर सोडला नव्हता. तो म्हणजे बळवंतराव टिळक! त्यांनी ६ जुलैच्या ‘केसरी’त अग्रलेख लिहिला.त्याचे शीर्षक होते, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?”

या खटल्यात लोकमान्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली. तुरुंगात कष्टाची कामे दिली गेली. तेथील अन्न त्यांना मानवत नसे. त्यांचे वजन १३० पौंडांवरून १०४ पौंड झाले. बळवंतरावांना झालेल्या शिक्षेबद्दल बाहेर बराच गवगवा चालला होता. अमरावतीच्या काँग्रेसमध्ये बळवंतरावांवर ठराव झाला नाही.पण जे म्हणायचे ते सगळे पुढाऱ्यांनी भाषणात बोलून घेतले.सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणाले,”मी शरीराने येथे असलो तरी माझा आत्मा टिळकांबरोबर तुरुंगात आहे.”

रँडच्या खुनाबद्दल चाफेकर फाशी गेल्यावर सरकारची सुडाची भावना पुष्कळशी संपली. शिवाय मॅक्समुल्लर साहेबांनी आधीच बळवंतरावबद्दल सरकारकडे रदबदली करून आपली ऋग्वेदाची प्रत त्यांना भेट म्हणून पाठवली.
अखेर सत्काराच्या समारंभात भाग घ्यायचा नाही एवढ्याच अटीवर ६ सप्टेंबर १८९८ रोजी बळवंतरावांची सुटका झाली.

बळवंतरावांची सुटका झाल्यानंतर घरी आल्यावर समस्त पुणेकरांनी त्यांचे प्रचंड स्वागत केले. पुण्यात घंटानाद झाला. नारळ- गूळ -खोबरे वाटण्यात आले. बायकांनी देखील पणत्या काढल्या आणि त्या पेटवून दाराबाहेर तेवत ठेवल्या. पुण्यातील ती काळोखी विषण्ण रात्र एकाएकी उत्स्फूर्त आनंदोत्सवाने उजळून निघाली.


लोकमान्य टिळक, महात्मा गांधींविरोधात वापरलेला राजद्रोहाचा कायदा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही हवाच कशाला??; सुप्रिम कोर्टाचा खडा सवाल


बळवंतरावांना नाना प्रकारची माणसे भेटायला येत होती. त्यात एक प्रतिष्ठित आणि आढ्यताखोर गृहस्थ होते. बळवंतरावपर्यंत पोहोचायला त्यांना बराच वेळ लागला आणि धक्काबुक्की देखील बरीच सहन करावी लागली. त्यामुळे ते चीडल्यासारखे झाले होते.

बळवंतराव जवळ पोचल्यावर ते म्हणाले,”का हो बळवंतराव, तुम्ही तुरुंगात जाऊन मोठे कष्ट सोसून आलात हे खरं. पण तुमच्या या राजकारणापासून देशाचा कोणता फायदा झाला आहे? सरकारचे नवे नवे कायदे लोकांची अधिकाधिक गळचेपी मात्र करीत आहेत.”

हे ऐकून बळवंतरावांचा सौम्यपणा एकदम वितळून गेला. त्यांच्या डोळ्यांत ठिणग्या फुलल्या.
ते म्हणाले, “माझं राजकारण तुम्हाला अद्यापि समजलेले दिसत नाही. नाहीतर हा बाळबोध हिशोब तुम्ही मांडून दाखवला नसतात. अहो,एरवी पन्नास वर्षांनी या देशात जी परिस्थिती निर्माण झाली असती आणि प्रजेला जे प्रश्न सोडावे लागले असते, ती परिस्थिती आणि ते प्रश्न मी आज निर्माण केले आहेत. परतंत्र समाज चलनवलन करू लागला म्हणजे राज्यकर्ते अधिक कडक कायदे करणारच. पण हे परागतीचं लक्षण नसून प्रगतीचे लक्षण आहे. पांडव दुर्बल असते तर दुर्योधनाने त्यांना पाच गावे सहज तोडून दिली असती. पण ते प्रबळ होते म्हणूनच तो त्यांना सुईच्या अग्राएवढीदेखील भूमी द्यायला तयार नव्हता.” ते गृहस्थ वरमुन निघून गेले.

तेवढ्यात भिकाजीपंत हर्डीकर तावातावाने पुढे सरसावले, “या गृहस्थांना बोलायला काय होतं? दुसरं काही नाही तरी या खटल्यामुळे किती लोकजागृती झाली ते तरी त्यांनी बघायला हवं होतं. खटला चालू होता तेव्हा कोर्टाच्या बाहेर माणसांची ही झिम्मड व्हायची आणि तेथे फक्त आपले हिंदू लोकच असत असे नव्हे हो. मुसलमान, ख्रिश्चन, पारशी हे सगळे तिथे जमत असत. फेरीवाले, खाटीक, खलाशी, कोणत्या प्रकारचा माणूस तेथे नाही अशातला भाग नव्हता. मी मुद्दाम एका खिरिस्ताव पावरोटीवाल्याला प्रश्न केला, “तू रे कशाला आलास?” तर तो म्हणतो, “टिळक काय तुमचोच आसा? आमचो न्हाय?”
भिकाजीपंतांनी त्याचे उद्गार त्याचेच हेल काढून बोलून दाखवले तेव्हा सगळ्या मंडळीत एकच हशा पिकला. बळवंतरावांच्या चेहऱ्यावरदेखील सुरकुटी उमटली. ते सौम्यपणे म्हणाले,” तीदेखील आपलीच माणसं आहेत. त्यांना बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे.” दाजीसाहेब थट्टेने म्हणाले, “वा बळवंतराव, तुम्ही अगदी सुधारकांची भाषा बोलू लागलात.” बळवंतरावांनी चटकन उत्तर दिले, “छे, छे, ही भाषा आमच्या सनातन हिंदू धर्माची आहे. औदार्य आणि सहिष्णुता या गोष्टी आम्हाला साहेबांकडून शिकायला नकोत.”

“दुर्दम्य” कादंबरी-
पॉप्युलर प्रकाशन,मुंबई
लेखक : गंगाधर गाडगीळ
(पृष्ठ क्र. ३३४,३५,४५ व ३४६ वरून संक्षिप्त) वरून साभार

– संकलन : दिलीप क्षीरसागर

Lokmanya Tilak : visionary leadership of Akhand Bharat

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण