70 वर्षात खान्देशचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही हे खरेच; पण अन्याय कोणी आणि कसा केला??


गेल्या 70 वर्षात खान्देशाचा एकही माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ती अक्षरशः खरी आहे. महाराष्ट्रात फक्त उत्तर महाराष्ट्र किंवा खान्देश हा एकमेव भाग असा शिल्लक राहिला आहे की जिथून महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री मिळालेला नाही. किंबहुना कोणत्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातल्या नेत्याला ती संधी दिली नाही. It is true that the man of Khandesh has not become the Chief Minister in 70 years; But who did injustice and how ??

एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात बोलताना हीच खंत व्यक्त केली आहे. ते स्वतः मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. परंतु त्यांना बाजूला करण्यात आले, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्या देखील तथ्य जरूर आहे. पण उत्तर महाराष्ट्र – खान्देश यांच्यावर फक्त भाजपनेच असा अन्याय केला आहे, असे समजण्याचे कारण नाही. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी घरोबा केला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी देखील अशाच प्रकारे उत्तर महाराष्ट्र – खान्देशाचे नेतृत्वाला दाबले होते, हा इतिहास आहे.

एकनाथ खडसे हे 2014 च्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. पण त्याही आधी त्यांच्यापेक्षाही एक बडे नेते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिले होते, भाऊसाहेब हिरे असे त्यांचे नाव आहे…!! भाऊसाहेब हे काँग्रेसचे बडे नेते होते. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांशी त्यांची राजकीय दृष्ट्या अतिशय जवळीक होती. 1950 आणि 60 च्या दशकात महाराष्ट्रातले ते अत्यंत प्रभावी नेते होते. पंडित नेहरू यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि त्याही आधी मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रीपदाची संधी भाऊसाहेब हिरे यांनाच मिळणार, अशी त्यावेळी खात्री वाटत होती. परंतु भाऊसाहेब हिरे यांना त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्याशी सामना करावा लागला. यशवंतरावांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या प्रांतांमधील आमदारांची जुळवाजुळव करत भाऊसाहेब हिरे यांच्यावर मात केली होती.संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी 1957 च्या निवडणुकीत भाऊसाहेब हिरे आणि बाळासाहेब देसाई या काँग्रेसच्या दोन दिग्गज पुढाऱ्यांचा पराभव घडवून आणण्यात आला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व आपोआपच पुढे सरकले. त्यानंतर 1962 मध्ये यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाले आणि लोकसभेत निवडून येण्यासाठी त्यांनी नाशिकची निवड केली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रावर यशवंतराव चव्हाण यांचा बरीच वर्षे प्रभाव राहिला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेतृत्व खऱ्या अर्थाने फुलले आणि फळलेच नाही. ते कायम यशवंतराव चव्हाण यांच्या अंकित राहिले. एक प्रकारे यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या चेल्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नेतृत्वाला कायम आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवले. हा इतिहास कटू असला तरी वास्तववादी आहे. हे झाले काँग्रेसचे…!!

इतकेच काय पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील नेतृत्व मोठे करण्याऐवजी राज ठाकरे यांना मुंबईतून उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करायला पाठवले. छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये उडी मारल्यानंतर आपली राजकीय भूमी म्हणून मुंबई – माझगाव सोडून नाशिकची निवड केली. त्यामुळे त्यांचे देखील बाहेरचे नेतृत्व असताना ते नाशिकमध्ये येऊन फुलले. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र – खानदेशातले स्थानिक नेतृत्व दबले गेले.

हा राजकीय इतिहास यासाठी सांगितला की उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वानेही या अर्थाने स्वत:ला कधी फुलू आणि फळू दिले नाही. राजकीय दृष्ट्या त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील पुढार्‍यांवर मात करता आली नाही. ती मात केली असती तर खरेच उत्तर महाराष्ट्र – खान्देशातील भाऊसाहेब हिरे यांच्यासारखे दिग्गज नेते केव्हाच मुख्यमंत्री होऊन गेले असते किंवा कदाचित एकनाथ खडसे यांना देखील संधी मिळाली असती…!!

त्यामुळे एकनाथ खडसे यांची खंत कितीही खरी असली तरी नुसती खंत व्यक्त करून उपयोगाचे नाही. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र – खान्देशातले स्थानिक नेतृत्वच बळकट हवे आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वावर मात करता आली पाहिजे हेच खरे…!!

It is true that the man of Khandesh has not become the Chief Minister in 70 years; But who did injustice and how ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर