विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा बातम्या येत असतील तर ते संतापजनक असून शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ बाकी असल्याने ते निवृत्त कसे होतील आणि कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
निवृत्तीचा कथित फॉर्म्युला आणि पंतप्रधान मोदींच्या फोनवरील संभाषणाची चर्चा
येत्या 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होत असलेल्या शरद पवार यांनी स्वतः भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेला छेद जाईल; त्यामुळे पवार यांनी निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे व ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जावे, अशी चर्चा पक्षात सुरू असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना पुणे आणि मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन करून “आपण विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,” असे म्हटले होते; प्रकृतीच्या काळजीपोटी बोलल्या गेलेल्या या वाक्यातून राजकीय वर्तुळात निवृत्तीचे संकेत शोधले गेल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली.
‘ज्यांनी तुम्हाला मोठे केले, त्यांनाच आराम करण्याचा सल्ला देताय?’; संजय राऊतांचा घणाघात
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही अत्यंत तिखट शब्दांत संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांचे संपूर्ण आयुष्य धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात गेले असून सत्तेत जाण्याची घाई झालेल्या काहींकडून हे विचार गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले. ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठे केले आणि मदत केली, त्यांचाच पक्ष फोडून आता त्यांनाच ‘तुम्ही आराम करा’ असा सल्ला देताय याची लाज वाटली पाहिजे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच, सुप्रिया सुळे या प्रखर फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या असल्याने त्या कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App