नागपुरातील न्यू एरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; २,४०० आजारांचा योजनेत समावेश
विशेष प्रतिनिधी
नागपूर, : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील वर्धमान नगर परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या न्यू एरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती, न्यू एरा हॉस्पिटलचे प्रमुख आनंद संचेती, उज्ज्वल पगारिया, डॉ. निलेश अग्रवाल, हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंटच्या प्रियंका सावंत, विधिरा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर मेडिकल हब म्हणून उदयास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जात आहे. राज्यात तसेच देशात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. विविध देशांतील नागरिकही आधुनिक उपचारांसाठी भारताला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार उपचार आणि सक्षम वैद्यकीय सुविधांचे महत्त्व वाढले आहे.
२,४०० आजारांचा जन आरोग्य योजनेत समावेश
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत २,४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, ही योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आरोग्यसेवा मिळविताना अडचणी येऊ नयेत आणि गरजू रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी योजनेच्या अंमलबजावणीला अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा
वर्धमान नगर परिसरातील न्यू एरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३०० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने रुग्णालयात विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयात एआय तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मॅमोग्राफी तसेच तातडीने एमआरआय तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांमुळे विशेषतः कर्करोगाचे निदान आणि रुग्णांच्या तपासणी प्रक्रियेला मदत होणार असून, कर्करोगग्रस्त रुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
भविष्यात रुग्णसेवेसाठी नवे प्रकल्प
रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत असून, भविष्यात रुग्णसेवा अधिक व्यापक करण्यासाठी आणखी काही प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार होत असताना न्यू एरा हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. निलेश अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App