विशेष प्रतिनिधी
मुंबई : विशेष तपास पथकाने शुक्रवारी 23 ऑक्टोबर 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणातील 13 व्या आरोपीला अटक केली आहे. औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी फरार असिस्टंट रूम ऑफिसर रोहित कोलटक्के याला नवी मुंबईतून अटक केली आहे. पोलील उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित कोलटक्केने ही प्रश्नपत्रिका या प्रकरणातील मुख्य आरोपी, एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्याकडून मिळवली होती. हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन संवर्गातील औषध निरीक्षक (गट ब) च्या 154 पदांच्या भरतीसाठी 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेसंबंधित आहे. ही चाचणी महाराष्ट्रातील 6 केंद्रांवर घेण्यात आली होती. तपासात असे उघड झाले आहे की, परीक्षेपूर्वी एका गुप्त खोलीतून प्रश्नपत्रिका फुटली होती. असा आरोप आहे की, काही सरकारी अधिकाऱ्यांनी पैशाच्या मोहाने आपल्या पदाचा आणि जबाबदाऱ्यांचा गैरवापर करून परीक्षेची गोपनीयता भंग केली.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, 25 ऑगस्ट रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान, फरार दलाल मयूर ठाकरे याला 12 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून रोहित कोलटक्के याची भूमिका उघड झाली, ज्याला नंतर एसआयटीने नवी मुंबईतून अटक केली आहे.
या प्रकरणात एसआयटीने यापूर्वी एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे, गोपनीय कक्षाचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकाटे आणि गोपाल मराठे यांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त, कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, दलाल अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील, संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांनाही अटक करण्यात आली आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका विकत घेऊन परीक्षा दिल्याप्रकरणी ऋतुजा पाटील, साजिद सांडे आणि विजय किंगर यांना अटक करण्यात आली आहे.
एसआयटी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या नेटवर्कची जुळवाजुळव करत आहे. प्रश्नपत्रिका गोपनीय खोलीतून बाहेर कशी पडली आणि ती फुटण्यासाठी झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार कसे हाताळले गेले, हे निश्चित करण्यावर आता तपासाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App